“कोणाशीही शारीरिक संपर्क ठेवणं आजकाल खूप सोपं झालंय का?”
मधुश्री देशपांडे गानू
“स्पर्शाचे बोल सुखावून जाती,
अंगोपांगी मोहरताना….
शब्दांचे ना कामच येथे,
ही प्रेममय आराधना….”
माझ्याच कवितेतील काही ओळी. खरंय! आपल्या प्रेमाच्या माणसाचा प्रेमळ, आपुलकीचा, विश्वासार्ह स्पर्श किती सुखावह असतो ना! “स्पर्श” पंचेद्रियातील सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय. “शब्दांपेक्षाही स्पर्श बोलका असतो.” “शब्द फसवे असू शकतात पण स्पर्श फसवा नसतो.” तो चांगलं-वाईट नेमकं सांगतो. स्पर्श किती विविध छटा घेऊन येतो.
नवजात बालकाचा कापसासारखा मुलायम स्पर्श, आई-वडिलांचा आश्वासक, उबदार, प्रेमळ स्पर्श, त्यांनी पाठीवर दिलेली शाबासकी, रागाने आईने पाठीत घातलेला धपाटा, आजी-आजोबांचा मऊ सायीसारखा स्पर्श. आपल्या आयुष्यात नातेसंबंध टिकून राहण्यासाठी मनमोकळ्या संवादांबरोबरच हा स्पर्श ही तेवढाच महत्त्वाचा आहे. चांगला प्रेमाचा स्पर्श किंवा वाईट घृणास्पद स्पर्श लगेच ओळखता येतो. यायला हवा. विशेषतः सर्व वयोगटातील स्त्रियांना.
शारीरिक संपर्क म्हणजेच स्पर्श ही एक क्रिया आहे. प्रतिक्रिया आहे. आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग आहे. अगदी प्रेमाचं माणूस, जवळचे नातलग, घनिष्ठ मैत्री असलेल्या मित्र मैत्रिणी, जवळचे कार्यालयीन सहकारी यांना आपण स्पर्शा द्वारे आपल्या भावना पोहोचवतो. आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीला सहजी स्पर्श करत नाही. जेव्हा आपण एखाद्याला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या “personal space” मध्ये प्रवेश करतो. मग हस्तांदोलन, खांद्यावर हात ठेवणे, चुंबन, मिठी असो किंवा अगदी शरीरसंबंध. संवादा पलीकडचं स्पर्शाने सांगता येतं.
भारतीय संस्कृतीत तर स्पर्शाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आपण कोणालाही सहज जाता-येता स्पर्श नाही करत. ओळखीचं कोणीही भेटल्यावर आपण हात जोडून “नमस्कार” करतो. कारण प्रत्येक सजीवाप्रती असलेला आदर आणि प्रत्येक सजीवांमध्ये असलेला “परमेश्वर” याला तो नमस्कार असतो. आपण आपल्या आई वडिलांसमोर अगदी नवरा-बायको असले तरीही एकमेकांना स्पर्श करत नाही. कारण वडीलधार्या माणसांचा आदर. आणि हे अगदीच योग्य वर्तन आहे. बहिण-भाऊ, दिर-वहिनी, नणंद-भावजय, सासू-जावई, सुन-सासरे कितीतरी अशी नाती असतात जिथे फक्त आदराची, मायेची भावना हवी. स्पर्शाचं तिथे काम नाही.
खरं तर आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आणि सोशल मीडियाच्या सुळसुळाटात कुटुंबातील प्रेमळ, आश्वासक, उबदार स्पर्श हरवून गेले आहेत. कुटुंबातील एकोपा कुठेतरी हरवला आहे. असं म्हणतात की, तुमच्या मुलांना दिवसातून किमान दोन ते तीन वेळा तरी तुमचा स्पर्श होणं त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी गरजेचं असतं. किती पालकांना आज वेळ आहे असा?? स्पर्शाची गरज प्रत्येक माणसाला असते. स्पर्शाने ताणतणाव नाहीसे होतात. मन शरीर आनंददायी होते. घरातील व्यक्तींनी छोट्या-छोट्या स्पर्शातून आपलं प्रेम, विश्वास, जिव्हाळा हा दर्शवला पाहिजे. पण आज हे घडताना दिसत नाही. पाश्चात्य देशातही आता “टच थेरपी” उदयास आली आहे.
इतर सगळ्या संवेदना एक माणूस म्हणून कमी झाल्यात, मात्र स्पर्शाचं ज्ञानेन्द्रिय एकदम तीक्ष्ण झालं आहे. याला सोशल मीडिया ही कारणीभूत असेलच. हा स्पर्श आपण बाहेर अनोळखी जगात आज शोधत आहोत. सहज कोणालाही मिठी मारणे हे casual/cool झालं आहे. अशातूनच शारीरिक आकर्षण वाढीस लागते. अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा स्पर्श आज बाहेर अनोळखी लोकांमध्ये शोधू लागला आहे. मग सोशल मीडिया वरून ओळख, भेटीगाठी, चोरून स्पर्श यापासून ते शारीरिक संबंध सहज सोपे झाले आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे विश्व आहे. कुटुंबातील सदस्य कोणाच्या संपर्कात आहेत याची एकमेकांना माहिती नसते. यातूनच पुढे जाऊन विनयभंग, बलात्कारासारखे, खुनासारखे गुन्हे घडताना दिसत आहेत.
पाश्चिमात्य देशांचं अंधानुकरण करताना आज शारीरिक संपर्क सोपा झालाय. फसवी प्रेमप्रकरणं, शारीरिक संबंध या स्टेटस च्या गोष्टी झाल्या आहेत. सोशल मीडियामुळे सगळे उपलब्ध आहे. “त्यामुळे स्पर्श या सुंदर संवेदनेचा ही सुळसुळाट झाला आहे.”
खरंतर एखाद्या मित्राच्या खांद्यावरचा आश्वासक हात, खूप वर्षांनी मैत्रिणीला भेटल्यावर होणारा आनंद शब्दात मांडता न आल्यामुळे मारलेली घट्ट मिठी, आईने प्रेमाने कुशीत घेणे, वडिलांचा कधीतरी डोक्यावरून फिरणारा हात, नवरा बायको मधील प्रेम वृद्धिंगत करणारा वेळी अवेळी होणारा निर्हेतुक सहेतुक स्पर्श आणि शरीरसंबंधतील अवीट गोडी, लहान बाळाचा मुलायम स्पर्श. कितीतरी हवेहवेसे, सकारात्मक, प्रेमळ , उबदार, विश्वासार्ह स्पर्श आपल्या आयुष्याला सुखावणारे, फुलवणारे असतात.
पण गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना सहन करावे लागणारे गचाळ, घ्रृणास्पद, किळसवाणे, ओंगळवाणे स्पर्श, सहज कोणीही येता-जाता करू पाहणारा विनयभंग, बलात्कारासारख्या निर्घृण, निर्मम अत्याचाराला धजावलेले पुरुष या सगळ्यामुळे स्पर्शाची घ्रृणा वाटू लागली तर नवल नाही.
सहज शारीरिक संपर्क आज सोपे, उपलब्ध झाले आहेत. याला स्त्री-पुरुष दोघेही तितकेच जबाबदार आहेत. नात्यांची बुज आज राखली जात नाहीये. आपली आब, आपला मान आपणच राखायचा असतो. आपली “personal space” आपणच जपायची असते. फक्त आणि फक्त प्रेमाच्या, विश्वासाच्या मोजक्या माणसांनाच इथे प्रवेश असावा. अगदी मुका प्राण्यांनाही स्पर्श कळतो. स्पर्श ही मौल्यवान देणगी आहे. अशी ही “जादू की झप्पी” आपल्या प्रेमाच्या, विश्वासाच्या माणसांसाठी जपून ठेवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!



लेख खुप सुंदर आहे
Nice 👍