कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं ?? वाचा या लेखात!
गीतांजली जगदाळे
कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं इतकं कळलं तर आयुष्य किती सोप्प होईल नाही? कारण चुकीच्या ठिकाणी व्यक्त होण्याने सुद्धा नुकसान होऊ शकतं, आणि न व्यक्त होण्याने देखील. तसेच आयुष्यभर प्रत्येकाला समजून घेत राहिलो तर आपल्याला समजून घेण्याबद्दल तर लोक विसरूनच जातील.
आपल्या भावना व्यक्त करणं, स्वतःची मते व्यक्त करणं आणि ते करता येणं हे एक प्रकारचं कौशल्यचं आहे. व्यक्त होताना बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या चुका कळतात, कधी कधी एक नवीन दिशा मिळून जाते, आणि कधी कधी तर बोलता बोलता प्रश्न सुटतो देखील, आणि व्यक्त झाल्याने हलकं वाटत ते वेगळंच! म्हणजेच व्यक्त होणं फार महत्वाचं आहे.
ज्या व्यक्तीकडे आपल्याला व्यक्त होता येईल अशी व्यक्ती आयुष्यात असणं हे पण भाग्यच म्हणावं लागेल.पण व्यक्त व्हायला आपल्याला माणसांचीच गरज असते असं नाहीए. कितीतरी लोक डायरी लिहितात, चित्र काढतात, म्युझिक ऐकतात, डान्स करतात, काही लोक मांजर, पोपट ,मासे, कुत्रा असे प्राणी किंवा पक्षी पाळतात, आणि त्यांना जीव लावतात, त्यांच्यासोबत मैत्री करतात, झाडे लावतात.
अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यातून ते व्यक्त होतात. कधी-कधी कोणी आपलं ऐकून घ्यावं असं वाटणं साहजिक आहे, पण नेहमी त्याचीच गरज असते असं नाही. आणि नेहमी आपल्याला कोणी तसं मिळेलच याची ही खात्री देता येत नाही. कधी-कधी व्यक्त होणं, आपलं मन मोकळं करणं एवढंच आपल्याला हवं असत, आणि आपलं मन मोकळं केल्यानंतर आपल्याला कोणी judge करू नये असं देखील आपल्याला बऱ्याचदा वाटत असत.
त्यामुळे आपण जेव्हा डायरी लिहितो, पेंटिंग करतो, डान्स करतो , आपल्याला आवडते आणि ज्यातून व्यक्त व्हायला जमते अशी एखादी activity करतो तेव्हा अशा गोष्टी कधीच आपल्याला judge करत नाहीत, आणि आपलं मन देखील मोकळं होऊन जातं. त्यामुळे इथे व्यक्त होणं कधीही चांगलंच.
अशा गोष्टींमधून व्यक्त होत असताना त्या-त्या क्षेत्रात देखील आपण काही इम्प्रोव्हमेंट्स करत असतो. त्यामुळे तो एक वेगळाच फायदा आपल्याला होतो. त्याचबरोबर आपण स्वतःशी मैत्री करू शकतो. मानसशास्त्र असं सांगत की, दिवसातून एकदा तरी आपण स्वतःशी बोलणं गरजेचं असत, स्वतः सोबतचा संवाद महत्वाचा असतो. त्यामुळे आपण स्वतःकडे आपल्याच काही गोष्टी व्यक्त केल्या तर एक म्हणजे आपल्याला बोलायला कोणीतरी मिळेल, आणि त्याचबरोबर आपले secrets देखील सुरक्षित राहतील.
समजून घेणं इतकं सोप्प नसत. पण काही लोकांमध्ये तो गुण मुळातच असतो. समजून घेणारी व्यक्ती समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघत असते, त्यामुळे तिला ती situation चांगली समजते. आणि त्या व्यक्तीच्या भावना नीट कळल्याने त्या व्यक्तीला मदत करणं ही सोप्प होतं. पण समजून नक्की कुठे घेतलं पाहिजे?
कारणं आजकाल प्रत्येकालाच आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं असं vatta, त्यामुळे समजून अशाच ठिकाणी घ्यावं जिथे त्या माणसाला त्याची गरज असेल. प्रत्येकाला कितीही वाटत असलं, तरी प्रत्येक माणूस गरजू नसतो. आणि माणसंच निरीक्षण केलं, त्यांचे हवं-भाव, त्यांचं बोलणं या गोष्टी बघितल्या , काही अनुभव घेतले की आपल्याला देखील कुठे समजून घेतलं पाहिजे आणि कुठे नाही हे बरोबर कळून जातं.
प्रत्येकाला आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, पण अशी अपेक्षा ठेवणारा प्रत्येक जण स्वतः मात्र इतरांना समजून घेईल की नाही ही शंकाच असते. आपण जेव्हा इतर माणसांना समजून घेत असतो तेव्हा आपल्याला त्यांचे विचार, अनुभव, हेतू, भावना इत्यादी गोष्टी कळतात, आणि त्यामुळे आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन उमजतो. ज्यामुळे आपल्या आयुष्यात ही त्याचा उपयोग होतो आणि माणसे ही कळू लागतात.
पण इतरांना समजून घेणे याचा अर्थ स्वतःच्या मतांचा , विचारांचा त्याग करणे नक्कीच नाही. इतरांना समजून घेताना त्यांचा दृष्टिकोन कळतो, आणि त्या दृष्टिकोनामागची कारणं देखील लक्षात येतात. आणि त्यामुळे आपल्याला त्या माणसाचा राग न येता तो कोणत्या परिस्थितून आलाय, आणि तो असा ठराविक पद्धतीने का विचार करतो हे कळते.
पण सतत समजून घेण्याने ही आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जिथे गरज वाटते तिथेच समजून घ्यावं आणि जिथे गरज असेल तिथे त्यांच्या गोष्टी समजून घेऊन आपल्याही गोष्टी मांडाव्यात. जेणेकरून समोरच्याला आपला point of view कळतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
