सी-सॉ
मधुश्री देशपांडे गानू
मला वाटतं प्रत्येकाने लहानपणी एकदा तरी सी-सॉ खेळला असेल. प्रत्येक बागेमध्ये हमखास असतोच आणि या खेळाची ही आपलीच मजा आहे. कधी जमिनीवर तर कधी आभाळात. आठवत असेलच ना!!
आपल्या आयुष्यात असणाऱ्या कोणत्याही नात्याचं असं सी-सॉ सारखंच असतं ना! म्हणजे कोणतंही नातं तयार व्हायला फुलायला दोन माणसे लागतात. नवरा-बायको , आई-मुलगा/मुलगी , वडील-मुलगा/मुलगी , प्रियकर-प्रेयसी , आजी- आजोबा-नातवंड अशी कितीतरी आणि नातं नसूनही सगळ्यात महत्त्वाचं नातं म्हणजे मैत्री.
सी-सॉ वर दोन मुलं बसून खेळतात. त्याचं संतुलन काबू मध्ये ठेवतात. त्याचप्रमाणे नात्याचंही असतं. एकाने समजूतदारपणा दाखवला , थोडं पडतं घेतलं , थोडी आपली उंची अहंकार कमी केला ,आपली मदत , सहवास , भावना , कौतुक , प्रेम , माया , आपुलकी , आदर देऊ केले की दुसरा वरती येतो.
एक माणूस म्हणून त्याची वाढ होते . तो समृद्ध होतो . हीच गोष्ट कधी समोरच्याने करायची . ही देवाणघेवाण म्हणजेच नात्यातला हा सुरेख ताना बाना छान ठेवला कधी एक धागा खाली कधी एक धागा वर तर नात्याची ही गुंफण किती सुरेख , नक्षीदार , मोहक , घट्ट होते…
पण हेच जर एकाने रुक्षपणा दाखवला , दोघांची नात्यातील गुंतवणूक समान नसली तर मात्र संतुलन बिघडतं. ज्याचा जीव गुंतला आहे , ज्याचा सर्व भावना अडकल्या आहेत तो मात्र हे ओझं घेऊन जमिनीवर येतो. हे ओझं त्याला खाली खेचतं. त्याचा अपेक्षाभंग होतो.
नैराश्य ही येऊ शकते. कारण समोरचा त्याची जागा सोडून गेलेला असतो. त्याने त्याची गुंतवणूक काढून घेतलेली असते. ते पारडं हलकं झालं की गुंतलेला दुसरा जीव ओझ्याने कोलमडतो.
कधीकधी नाहीच यशस्वी होत काही नाती. एकाने खुप जपायचा प्रयत्न करूनही दुसऱ्यापर्यंत ते पोहोचतच नाही. तुमचं प्रेम समजून घेण्याची समोरच्या व्यक्तीची कुवतच नसते. अशावेळी मात्र आत्मसन्मान राखून शांतपणे अशा नात्यातून बाहेर पडावे.
कोणाची तरी फरफट करून आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? कितीतरी सहजीवनाचे हेच वास्तव आहे. एकाची होरपळ होताना दिसते. सध्या हेच जास्त प्रमाणात दिसतं…
कोणतंही नातं टाईमपास म्हणून , वेळ जात नाही म्हणून किंवा एकटे आहात म्हणून स्वीकारू नका. नात्यांमध्ये शंभर टक्के द्यायला शिका. नाहीतर लांब राहा. सी-सॉ कायम लक्षात ठेवा.
कोणीही आपल्यापासून दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. मतभेद वाद नक्कीच होणार. पण नातं , माणूस जास्त महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या वाद वेळीच सामोपचाराने मिटवा. तुटेल एवढं ताणू नका. आणि भरभरून आनंदाने नाती टिकवा आणि फुलवा…..



ठीक आहे, या गोष्टी तर सर्वज्ञात आहेत, पण त्या अमलात आणणे च सर्वांना फार कठीण जाते.
ईगो आड येत असेल बहुदा.
सुंदर पध्दतीने संतुलन शिकवले
I read the article and I like thought which is mentioned in the article and relating more because I am went through same situation.