Skip to content

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक व्यक्तीला तिचा स्वभाव बदलण्यास भाग पाडतात.

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक व्यक्तीला तिचा स्वभाव बदलण्यास भाग पाडतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आजचा दिवस हा श्रीपादच्या जीवनातील खूप महत्वपूर्ण दिवस होता. आज त्याला बेस्ट एम्प्लॉइ ऑफ दी इयरचा अवॉर्ड मिळणार होता. आरश्यासमोर उभ राहून तयार होताना तो नकळत एक वर्ष मागे गेला. “आई अग लगेच काय तो डबा दे. ऑफिसचा पहिला दिवस आहे आज माझा. पहिल्याच दिवशी उशीर करायला लावणारं का तू?” श्रीपाद घाई करत होता. “अरे देते रे! थांब झालाच. तु तोपर्यंत तुझी सर्व तयारी करून घे. मी आलेच. माझी तयारी झाली ग.” “तु फक्त डबा दे, मी निघतो. “आई डबा घेऊन बाहेर आली. त्याने तो घेतला व निघणारच होता तेव्हढ्यात आईने त्याला थांबवलं.

“थांब थांब दही साखर राहीलच.” लगेच ती आत जाऊन दही साखरेची वाटी घेऊन आली. तिने श्रीपादला दही साखर हातावर दिले. श्रीपाद पण ते घेऊन आईच्या पाया पडला. “आजचा तुझा नोकरीचा पहिला दिवस आहे तो चांगला जाऊदे आणि तुझी प्रगती होऊदे.” अस म्हणत आईने त्याला आशीर्वाद दिला. तो पण तिच्याकडे पाहून हसला व बाहेर पडला.

श्रीपाद ज्या कंपनी मध्ये कामाला लागला होता ती advertising company होती. बऱ्याच मोठ मोठ्या ब्रँडच्या advertise त्यांच्याकडे येत. अश्या कंपनीमध्ये काम करायला मिळणं हे त्याच्यासाठी एखाद्या स्वप्नाहून कमी नव्हत. त्यात आज त्याचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे तो खूप excited होता. श्रीपाद वेळेवर ऑफिसला पोहोचला. बॉसशी त्याची भेट झाली. त्यांनी त्याला आताच्या एका प्रोजेक्ट मध्ये घातलं.

हा प्रोजेक्ट ज्याच्याकडे होता त्याचं नाव होतं निमिष. तो त्याचा टीम लीडर होता. बरेच एम्प्लॉइ त्यात होते. बॉसने निमिषला केबिन मध्ये बोलवून घेतलं व त्याची श्रीपादशी ओळख करून दिली आणि त्याला या टीम मध्ये इनव्हॉल्व करून घ्यायला सांगितलं. त्याने त्याप्रमाणे श्रीपादला सोबत घेतले. काहीच वेळात त्यांची मीटिंग होणार होती. त्याने श्रीपादला वेळ सांगितली व मीटिंग रूममध्ये यायला सांगितले.

श्रीपाद त्याच्या डेस्ककडे आला. सर्व सामान तिथे काढून ठेवले व तिथेच बसला. त्याने पूर्ण हॉल वर एक नजर टाकली. खूप मोठं ऑफिस होत आणि असंख्य लोक तिथे काम करत होते. इतक्या मोठ्या ऑफिसला पाहून तो भारावून गेला. थोडावेळ तसच बसून तो मीटिंग रूम मध्ये पोहोचला. तिथे बरेच जण आधी येऊन बसले होते. त्यांच्याकडे एक नजर टाकून तो एका खुर्चीत जाऊन बसला. तिथे बसलेल्या सर्वांनी त्याच्याकडे पाहिले व त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली.

“आजकाल कोणीही कुठेही काम करायला येत नाही?” एक मुलगी तिच्या सोबत बसलेल्या मुलीला म्हणाली. “हो ना! ना क्लास, ना मॅनर्स. गावातली लोक पण आता यायला लागली इथे. आपले बॉस पण ग्रेटच आहेत. कोणाला हायर करतील सांगता येत नाही.” दोघींमध्ये बोलण चालू होत व त्यावर त्या हसत होत्या. श्रीपादला त्यांचं वागणं दिसलं, त्यांचं बोलणं पण थोड थोड कानावर पडत होत. श्रीपाद सर्वसाधारण घरातून आला होता. आतापर्यंत जे काही मिळवलं होत ते कष्ट करून मिळवलं होत. त्याच आयुष्य काही झगमगिने भरलेलं नव्हत.

मन साफ, निरागस तसाच त्याचा पेहराव होता. त्याचे कपडे अगदीच शुल्लक नसले तरी तिथे काम करणाऱ्या बाकीच्या लोकांसारखे डोळ्यात भरणारे देखील नव्हते. तसच तो येताना डोक्याला तिलक लावून आला होता. त्याची त्याची ती श्रद्धा होती ज्याची आता चेष्टा केली जात होती. त्याला त्या दोघींचं बोलण ऐकून वाईट वाटलं. पण तो काही बोलू शकत नव्हता. कारण त्याला याच लोकांसोबत काम करायच होत शिवाय तो नवीन देखील होता.

हे सर्व चालू होत तेवढ्यात निमिष त्यांचा टीम लीडर आत आला. तो आल्याबरोबर सर्व शांत झाले. त्याने प्रोजेक्टर सुरू केला व त्यांची आताच्या प्रोजेक्टवर चर्चा चालू झाली. श्रीपाद सर्व काळजीपूर्वक ऐकत होता. निमिष सर्वांचे पॉइंट ऑफ व्ह्यू जाणून घेत होता. मत समजून घेत होता. त्याने श्रीपादला पण विचारले पण तो सांगू लागताच त्यांच्यामधील एक बोलू लागला. अस दोन तीनदा झालं. कोणीही त्याला त्याची आयडिया शेअर करू देत नव्हत.

शेवटी निमिषने सर्वांना गप्प केलं व त्याला बोलू दिलं. तेव्हा सुद्धा मागे कुजबूज चालू होतीच. मीटिंग संपल्यावर सर्व बाहेर पडले. श्रीपाद पण बाहेर आला तेव्हढ्यात त्याच्या टीम मधले काही जण त्याच्या समोर आले ज्यात त्या दोन मुली देखील होत्या. त्यातला एक जण पुढे येऊन बोलू लागला, “काय नवीनच जॉईन झालास वाटत.” श्रीपाद हो म्हणाला. त्यावर तो मुलगा त्याला मागे ढकलून म्हणाला, “हो ना, मग जास्त शहाणा बनू नकोस. हा प्रोजेक्ट आमचा आहे. तुझ्या आयडिया तुझ्याकडे ठेव. समजलं. आज पुढे पुढे करत होतास तस परत करायची गरज नाही.”

सर्वजण काही ना काही ऐकवतच होते. श्रीपाद हे सर्व ऐकून सुन्न झाला होता. पहिल्याच दिवशी हे अस काही पाहावं लागेल याची त्याला कल्पना नव्हती. तो त्यांना काही बोलूच शकला नाही. लंच ब्रेक मध्ये सारे कॅन्टीन मध्ये गेले. श्रीपादला काही खायची इच्छाच राहिली नव्हती. तो तसाच त्याच्या डेस्ककडे बसून होता. निमिष तिथून जात होता. त्याने त्याला पाहिले व जवळ येऊन म्हणाला, “श्रीपाद असा एकटाच का बसलास? जेवणार नाही?” त्यावर तो त्याच्याकडे पाहून हसला व भूक नाही म्हणाला. निमिष त्याच्या समोर येऊन बसला व त्याला काय झालं अस विचारलं.

तो काहीच बोलत नव्हता पण निमिषला माहीत होतं की काय झालं आहे ते. मीटिंग रूममध्ये त्याने ते पाहिलं होत. तो म्हणाला, “श्रीपाद तू काही सांगितल नाहीस तरी मला माहित आहे. मी स्वतः आज पाहिलं. पण हे असच आहे. कोणीही सहजासहजी दुसऱ्याला पुढे जाऊ देत नसतो. आणि या सर्वांना तू थांबवु शकतं नाहीस. ते तुला जमणार पण नाही. पण तू तुझ्यामध्ये बदल करू शकतो. तुला स्वतःसाठी उभ राहावं लागेल. स्वतः ला डेव्हलप करावं लागेल.

आणि हे फक्त आपल्या कपड्यांवर ठरत नाही. तुला आतून बाहेरून बदलाव लागेल. तर तू यांच्यामध्ये टिकू शकतो. आणि काही लागलच तर मी तुझ्या सोबत आहेच. कामाच्या वेळी मी तुझा लीडर असलो तरी बाकीच्या वेळी मी तुझा मित्र आहे. हक्काने माझी मदत घे.” अस म्हणून तो गेला. जाताना त्याने जेवायला ये अस सांगितलं. श्रीपादने देवाचे आभार मानले. निमिषच्या रूपाने त्याला आधार मिळाला होता. त्याने निमिष ने जे काही सांगितले ते फक्त ऐकलेच नाही तर शब्दशः पाळले.

आपल्या बोलण्यापासून ते पेहेरावापर्यंत सर्व गोष्टींवर त्याने बारकाईने काम केले. आधी कोणी काहीही बोललं तरी ऐकून घ्यायचा त्याचा स्वभाव होता तोही त्याने हळू हळू बदलला. अर्थात हे काही लगेच होणार नव्हत. त्याच्यासाठी ही एक परीक्षाच होती. रोजच्या रोज उलट सुलट बोलणी खाण, त्यांच्या कटांना सामोर जाण हे होतच. पण तो खंबीर राहिला. त्याने त्याच्या कामावर जास्त लक्ष दिलं. त्यातून त्याने सर्वांना दाखवून दिलं की माणूस त्याच्या कपड्यांवरून ओळखला जाऊ शकत नाही. त्याचे कष्ट सर्वांना दिसत होते.

बरेच प्रोजेक्ट त्याच्यामुळे successsful झाले. त्याच्या आयडिया क्लाएंटना आवडल्या. एका वर्षात केवळ मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्याने बेस्ट एम्प्लॉइ ऑफ दी इयरचा अवॉर्ड मिळवला. पहिल्या दिवशी जे कोणी त्याला बोलले होते ते त्याच्या हाताखाली आता काम करणार होते.

आपल्याला वाटत असल की आपण स्वभाव बदलू शकत नाही ना स्वतःचा ना इतरांचा. पण अस नसत. काहीवेळा घटना अश्या घडतात की आपल्याला आपल्यामध्ये बदल हे करावेच लागतात. आणि हा बदल आपल्याला आपल्या प्रगतीच्या दिशेने असावा लागतो तर तो चांगला ठरतो.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!