Skip to content

या १० प्रकारच्या भीती आपल्याला कायम इतरांपासून मागे ठेवतात.

या १० प्रकारच्या भीती आपल्याला कायम इतरांपासून मागे ठेवतात.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“भित्या पाठी ब्रह्मराक्षस” अशी एक म्हण आहे. म्हणजेच काय खरच ती घटना भीतीदायक असुदे किंवा नसुदे, प्रत्यक्षात ती घटना, तसा प्रसंग घडला असेल की नाही माहीत नाही पण मनातील भीती माणसाला जास्त दुबळा करून टाकते. न घडलेली घटना पण खरी वाटून त्याबद्दल मनात भीती निर्माण होते. भीती ही जरी आपल्या अस्तिवाशी निगडित भावना असली तरी ती आदिम काळात जास्त गरजेची होती.

तिथे आपल्या जिवाला तुलनेने जास्त धोका होता आणि तिथे देखील एका मर्यादे नंतर सामना हा करावाच लागत असे. त्यावेळी भीतीचे कारण जंगली श्वापद असायचे. आता काळ बदलत चालला आहे आणि आपल्या भीतीची कारण देखील. पण अजूनही आपण त्या काळात जशी प्रतिक्रिया द्यायचो तशीच प्रतिक्रिया अजूनही देतो ज्याची काही गरज नाही. कारण आता आपला बऱ्याच प्रमाणात विकास झालेला आहे.

भीती ही भावना जरी आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी गरजेची असली तरी आता माणसाने आपल्या मनात अश्या काही भीती निर्माण केल्या आहेत ज्या त्याच्या विकासाच्या आड येत आहेत, ज्या त्याला इतर लोकांपासून मागे ठेवत आहेत. आताच आपण हे युग स्पर्धेचे आहे. सतत सर्वांच्या पुढे जायची स्पर्धा ही चालूच असते. अश्या परिस्थितीत आपण आपल्याच मनात अश्या काही भीती तयार केल्या आहेत ज्या आपल्याला मागे पाडत आहे.

१. अपयशाची भीती: बऱ्याच जणांमध्ये ही भीती, ही चिंता पाहायला मिळते. कोणतीही गोष्ट करायच्या आधीच मला हे जमणारच नाही, करायला घेतल तरी चुकणार, काहीतरी गडबड गोंधळ होणार अस म्हणून मोकळं होणार. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यासाठी जी एक सुरुवात करण्याची गरज असते तीच केली जात नाही. शाळेत परफॉर्मन्स करणे, नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणे यात बरेचदा समस्या निर्माण होतात त्या याच गोष्टींमुळे. याच अजून एक कारण आहे ते म्हणजे स्वतःला स्वतःचीच माहिती नसणे. मला काय जमत काय नाही जमत हे जर नीट आपल्याला माहीत असल तर आपला आत्मविश्वास वाढतो. तेच कर आपल्याला आपलीच अपुरी माहिती आहे तर ही भीती अजून वाढते. म्हणून स्व जागरूक होण आणि जे काही समोर आहे त्याला सामोरे जाण अस केल तर भीती जाऊ शकते.

२. यशाची भीती: आता अनेक जणांना यश मिळणार नाही अशी भीती असते. तर बऱ्याच जणांना यश मिळालं तर ते पेलवणार नाही, सांभाळता येणार नाही, त्या यशासोबत ज्या नवीन जबाबदाऱ्या येतील त्या झेपणार नाही अशी भीती असते. हा एक चालढकलपणाचा प्रकार आहे. ही भीती मनात असल्यामुळे नवीन काही संधी उपलब्ध होत असतील, नवीन पद मिळत असेल तर ते नाकारलं जात. जे आहे त्यात राहणं अशी वृत्ती तयार झालेली असते. ज्यातून प्रगती खुंटते.

३. फोमो: सध्याच्या काळात सर्वात जास्त दिसून येणारी भीती. तरुणाईमध्ये तर जास्त दिसून येते. ज्याला fear of missing out असं म्हणतात. समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातील आपलं स्थान, आपलं महत्त्व सतत टिकवून ठेवण्याची धडपड, ते कुठेतरी कमी होईल, आपण मागे पडू अशी भीती आज कालच्या मुलांमध्ये दिसून येते. सोशल मीडिया वर सतत लाईक्स आणि कॉमेंट्स चेक करणे, सतत दुसऱ्याच्या आयुष्याशी आपली तुलना करणे या सर्व गोष्टी केल्याने नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. हा दृष्टिकोन सतत आपल्याकडे जे नाही ते पाहायला भाग पाडतो ज्यातून जे चांगल आहे ते दिसत नाही.

४. नाकारलं जाण्याची भीती: आपण कोणाकडून तरी नाकारले जाऊ ही भीती बऱ्याच प्रमाणात आता दिसून येत आहे. आपण, आपले काम नाकारले जाईल अशी भीती माणसाला काही करू देत नाही. उलट मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण करते की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. पण अस काहीही नसत. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. तिची म्हणून काहीतरी कौशल्य असतात. ती ओळखून माणसाने त्यानुसार वागल पाहिजे.

५. अनिश्चिततेची भीती: आपण जे काही करत आहोत किंवा करायला घेणार आहोत त्यात काहीही होऊ शकत. आपण कोणतीच गोष्ट निश्चित अशीच होईल अशी खात्री देऊ शकत नाही ही भीती देखील माणसाला थांबवून टाकते. पण ही भीती अतार्किक आहे. कारण आपण जर विचार केला तर निश्चित अस काही नाहीच आहे. प्रत्येक सेकंदाला गोष्ट बदलत राहते. याचा अर्थ आपण थांबून राहायचं, प्रयत्नच करायचे नाहीत अस होत नाही. पुढे जाऊन काहीतरी होऊ शकत म्हणून आपण आपल जगणं थांबवु शकत नाही. म्हणून जे होईल त्याला सामोरे जायची ताकत आपल्यामध्ये पाहिजे.

६. नियंत्रण निघून जाण्याची भीती: आपल्या सर्वांना अस वाटत असत की आपल्या हातात सर्व गोष्टी असल्या पाहिजेत. आपल्या कंट्रोल मध्ये गोष्टी असल्या पाहिजे. तस
होत नाही अस दिसल तर आपण घाबरतो, पालकांना जास्त करून आपलं मुल आपल्या नियंत्रणात राहावं अस वाटत असत. त्यामुळे ते जरा काही वेगळं वागल की पालक घाबरतात, प्रसंगी रागावतात. आणि या भीतीतून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडतात. म्हणून आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणालाही कंट्रोल नाही करू शकत. आपण आपला प्रभाव पाडू शकतो. कसा? वेगवेगळ्या पद्धतीने गोष्ट हाताळून. जेणेकरून आपल्याला हवं तस होण्याची शक्यता वाढेल. कंट्रोल करून कोणाची कधी प्रगती होत नाही.

७. बदलाची भीती: सर्वांना आपल्या आयुष्यात स्थिरता हवी असते. बदल कोणाला फार नको असतो. अनेकांना या बदलाची भीती वाटते. काळानुरूप बदलता येत नाही, तो बदल स्वीकारता येत नाही. कारण परिस्थिती स्वीकारण्यासाठीची जी समायोजन क्षमता लागते ती नसते. पण आता सर्व गोष्टी वेगाने बदलत आहेत. सर्व काही डीजीटल होत आहे. अशा मध्ये जर स्वतःला बदललं नाही, येणाऱ्या परिस्थिती मधील बदलाला स्वीकारलं नाही तर आपण नक्कीच मागे पडू.

८. लोक जज करतील याची भीती: आपण काहीही केलं तरी लोक आपल्याला नाव ठेवतील, जज करतील अशी भीती लोकांमध्ये असते. जी नवीन काही करायला देत नाही. ही भीती कुठे दिसते तर काहीतरी वेगळं काही करू पाहणाऱ्या लोकांमध्ये. त्यांच्यामध्ये नसली तरी अनेकदा घरातली माणसं या भीतीने घाबरवून सोडतात. आपला पिढीजात व्यवसाय आहे. तो सोडून तू दुसर काही केल तर लोक काय म्हणतील अस म्हटल जात. ही भीती मनात आली की माणूस नवीन प्रयत्न करत नाही. पण लोक चांगल केल तरी बोलतात आणि वाईट केल तरी. त्यांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे आपल्या हातात आहे.

९. आपल्यात काहीतरी कमी आहे: माझ्यात पुरेश्या क्षमता नाहीत. मी तेव्हढा सक्षम नाही हे आधीच मानलं जात. आणि म्हणून काही केल जात नाही. पण आपली काय क्षमता आहे हे ती गोष्ट केल्याशिवाय कसं कळणार? स्वतः बदल माहीत होण्यासाठी पण गोष्टी करून पाहव्या लागतात. तरच ती भीती जाते.

१०. इतरांकडून दुखावले जाऊ: एक चांगला समाज चांगल्या नाते संबंधामधून तयार होतो. त्यासाठी नाती तयार करायला लागतात. ती जोपासावी लागतात. इथे आपल्या मनात समोरचा माणूस मला दुखावेल,माझ्याशी नीट वागणार नाही अशी भीती असली तरी आपली नाती तयार होणार नाही. समाजाच्या आधी सुधा आपलं आयुष्य हे विविध नात्यांनी भरलेले असत. त्यातून आपण मजबूत होत असतो. इथे अशी भीती मनात ठेवून राहणारी माणसं एकटी पडतात. म्हणून वेळ घ्या, त्या माणसाला समजून घ्या आणि नंतर नात तयार करा.

पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही.तसच भीती कमी करायची असेल तर त्याचा सामना हा करावाच लागतो. तरच त्यावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!