Skip to content

‘मानसिक ताण’ हे पाचवीला पुजल्यासारखे आपल्याच मागे का लागतात?

‘मानसिक ताण’ हे पाचवीला पुजल्यासारखे आपल्याच मागे का लागतात?


गीतांजली जगदाळे

(मानसशास्त्र विद्यार्थिनी)


मानसिक ताण हा दोन प्रकारचा असू शकतो. पहिला, ज्याने आपण क्रिया करण्यासाठी motivate होतो. जस की, परीक्षा जवळ आली की त्याचा ताण येऊन आपण अभ्यासाला लागतो. त्यामुळे पहिल्या प्रकारचा ताण हा सकारात्मक आहे. दुसरा प्रकार, ज्याने आपल्याला काय करू आणि काय नको हे समजत नाही, ताण इतका वाढतो की त्याने आपली चिडचिड, रागराग होतो पण उपाय मात्र कळत नाही. त्यामुळे दुसरा प्रकार हा नकारात्मक आहे, ज्याने आपलं शारीरिक आणि मानसिक नुकसान होतं.

त्याच प्रमाणे, पहिल्या प्रकारचा ताण हा काही काळापुरताच असतो. एकदा का परीक्षा संपली की ताण ही निघून जातो. पण दुसऱ्या प्रकारचा ताण हा ती परिस्थिती संपली की, जातो पण परत पुढच्या परिस्थितीला हजर असतो. मग परिस्थिती ताण घेण्यासारखी असो किंवा नसो ,ताण काय आपली पाठ सोडत नाही.

पण हा ताण आपली पाठ का सोडत नाही त्याच कारण लक्षात घ्यायला हवं. छोट्या-छोट्या गोष्टींवर राग येणं, चिडचिड करणं, स्वतःला त्रास करून घेणं, आणि त्याचबरोबर इतरांना ही त्रास देणं हे आपल्याकडून हल्ली का होतं? याचा विचार आपण कधी केला का? विनाकारण किंवा शुल्लक गोष्टींवरून चिडचिड होण्याचं कारणंच आपल्याला सहन होत नसलेला आणि टाळता ही येतं नसलेला ताण होय.ताणतणाव कसे हाताळले म्हणजे त्याचे रूपांतर आजारात होणार नाही, परिस्थितीला तोंड देताना आपण तर दमून जात नाही ना याची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे ठरते.

आज कालची जीवनपद्धती ही अतिशय वेगवान व फास्टफूड कल्चर आहे. इथे कुणालाही शांत वेळ मिळत नाही (मिळत नाही म्हणण्यापेक्षा आपण तो वेळ काढण्यासाठी खरंच किती प्रयत्न करतो बरं?) इन्स्टंट results अपेक्षित असतात त्यामुळे साहजिक या शर्यतीमध्ये दमछाक होते व काम पूर्ण न करता आल्यास साहजिक मनावर व शरीरावर ताण येतो.

मागच्या काही पिढ्यांच्या मानसिक ताणतणावाचा विचार केला असता असं लक्षात येईल की, त्यांच्यापेक्षा आपल्या आयुष्यात असणारा मानसिक ताण हा खूपच जास्त आहे. आणि तसं बघायला गेलं तर त्यांच्यापेक्षा सुखसोयींनी भरलेलं आपलं आयुष्य आहे. असं असताना आयुष्य सोप्प आणि तणावमुक्त होण्यापेक्षा ते अधिक तणावाने व्यापलेलं कसं बरं आहे? त्याचं कारण म्हणजे सुखसोयी, तंत्रज्ञान यांच्या प्रगतीने आपली कामं नक्कीच सोप्पी झाली.

पण त्याचबरोबर आपण आपल्या बऱ्याच सवयी, आणि जीवनशैली अशा पद्धतीने नकळत आणि कधी कळत बदलल्या की, त्याचे परिणाम म्हणून आपल्याला या मानसिक ताणातून जावं लागतं. आता कामात येणारी संकटं,आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स याने तात्पुरता येणारा ताण हा सगळ्यांनाच येतो. पण कधीकधी तर असं होत की, प्रॉब्लेम, संकटं नसताना देखील आपण मानसिक ताणातून वावरत असल्याचं लक्षात येतं.

मित्रांनो, आपण कामावर आहोत, समोर काम पूर्ण करण्याचा प्रचंड डोंगर आहे ,पण मन /शरीर साथ देत नाहीय अशा वेळी हतबल होऊन चालत नाही.तणावमुक्तीच्या काही अत्यंत सोप्या पद्धती असतात ज्यामुळे तुम्ही काही मिनिटामध्ये स्वतःला फ्रेश करू शकता .एखादी गोष्ट करण्यास टाळाटाळ केली तर ते काम pending पडते पण कधीतरी करावेच लागते, पण जर दुर्लक्ष जास्त झाले तर मग पुढे ते करण्यासाठी जास्त वेळ लागतो. तेंव्हा जस संत कबीरांनी म्हटलंय, कल करे सो आज कर आज करे सो अब, हे आपल्या आयुष्यात चांगलं लागू पडतं. त्यामुळे काम कसे ही असो जेव्हाचे तेव्हा केलेले अधिक चांगले.परंतु जर आपण आपली दिनचर्या व कामाची पद्धत, योग्य शिस्तबद्धपणे मांडली तर कमी ताण येईल.

खूप छोट्या, अगदी लहानशा सवयी असतात ज्याने आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. लवकर उठणे, व्यायाम करणे, मेडिटेशन करणे इत्यादी. या छोट्या छोट्या सवयीचं पालन केल्याने देखील आपला ताण कमी होऊ शकतो. ज्या शरीराला आपण पौष्टिक आहार देऊ ते शरीर निरोगी राहतं. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याला ही पौष्टिक आहार देणं गरजेचं आहे, जेणेकरून मानसिक आरोग्य देखील निरोगी राहील. ताण हा एक प्रकारचा रोग च म्हणावा लागेल.

आणि जर आपल्याला शारीरिक आणि मानसिक रित्या निरोगी राहायचं असेल तर आपल्याला पौष्टिक आहारासोबत, सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणं गरजेचं आहे. आता सकारात्मक ऊर्जा आपण ३ पद्धतीने ग्रहण करू शकतो. ते म्हणजे सकारात्मक ऐकणे, सकारात्मक बोलणे आणि सकारात्मक बघणे. आपण ज्या नकारत्मक खून, चोरी, किडनॅपिंग इत्यादी चाललेल्या वाईट गोष्टी वर्तमानपत्रात वाचून आपल्या मानसिक आरोग्याला पुरवतो, त्याने नकळत आपल्याही दृष्टिकोनात नकारात्मक फरक पडायला सुरुवात होते.

आणि नकारात्मकता तर ताणासारख्या रोगांसाठीच काम करते. वर्तमानपत्र वाचणं तर आपण टाळू शकत नाही, पण सकाळी उठल्या-उठल्या वाचणं नक्कीच टाळू शकतो. सकाळी उठल्यावर चांगलं वाचन करणे, भजन,अभंग किंवा तुमच्या आवडीचं काहीही मोटिवेशन किंवा सकारात्मक ऐकणे, आणि टीव्ही पाहताना देखील आपण काय पाहतो यावर आपलं नियंत्रण असण्याने आपल्या आयुष्यात अविश्वसनीय फरक पडू शकतो.

आता सकाळी याची काळजी घेण्याचं कारण म्हणजे उठल्यावर आपलं मन फ्रेश असत, आणि आपली ऊर्जा १००% असते. अशावेळी चांगलं खाद्य दिल्याने पचन चांगलं होऊन ते आपल्या सिस्टिम मध्ये जास्त काळ राहण्याची शक्यता असते, आणि म्हणूनच सकाळची वेळ जास्त महत्वाची. या छोट्या-छोट्या गोष्टींचं पालन करणं आणि आपल्या चुकीच्या सवयी बदलणं फार गरजेचं आहे. आजकाल आपण उशिरा उठतो, उशिरा झोपतो, आपण खाल्लेलं अन्न देखील unhealthy असत.

आणि या सगळ्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक ऊर्जा कमी होते. आणि त्यामुळे आयुष्यात येणारे प्रॉब्लेम्स यांच्याशी लढताना आपली ऊर्जा कमी पडते, आपल्याला त्याच्याशी डील करता येतं नाही.आपण कमी ऊर्जा असताना लढू शकत नाही. त्यामुळे मानसिक ताण जास्त जाणवतो आणि सतत जाणवत राहतो, असं वाटत की हा आपला पिच्छा च सोडत नाहीए. कारण आपली ऊर्जा कमी असल्याने आपल्याला लहान-सहान गोष्टींमध्ये चिडचिड होते, राग येतो, आणि शुल्लक प्रॉब्लेम्स सुद्धा स्ट्रेस देऊन जातात. ते म्हणतात ना, कमजोर शरीर अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण देतं. त्याचप्रमाणे मानसिक ऊर्जा कमी असणं, म्हणजे मनाला कमजोरी येणं, त्यामुळे ताणतणाव अशावेळी आपला पिच्छा सोडत नाहीत.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!