आपण अनेकदा नातं टिकवण्यासाठी शांत राहतो. काही गोष्टी मनात येतात, पण आपण त्या व्यक्त करत नाही. “आता बोललो तर समोरचा दुखावेल”, “भांडण नको”, “वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल” असा विचार करून आपण भावना आतच दाबून ठेवतो. सुरुवातीला हे योग्य वाटतं. पण मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की दीर्घकाळ मनातलं न बोलल्याने नात्यांमध्ये सूक्ष्म पण गंभीर बदल घडू लागतात.
भावना दडपण्याला मानसशास्त्रात emotional suppression असं म्हणतात. संशोधनानुसार जे लोक वारंवार भावना दडपतात, त्यांच्यात ताण वाढतो, हृदयाची गती वाढते आणि मेंदू सतत सतर्क अवस्थेत राहतो. म्हणजे बाहेरून शांत दिसत असलो तरी आतून आपण थकलोले असतो. ही थकवा आणि चिडचिड नात्यात हळूहळू उतरू लागते.
सर्वात पहिला परिणाम म्हणजे गैरसमज वाढणे. आपण काहीतरी मनात धरून बसतो, पण समोरच्याला त्याची कल्पना नसते. त्याला वाटतं सगळं ठीक आहे. आपल्या वागण्यात सूक्ष्म बदल होतात, पण आपण कारण सांगत नाही. अशावेळी समोरचा अंदाज बांधू लागतो. अंदाज अनेकदा चुकीचे असतात. अशा प्रकारे संवाद कमी होतो आणि मनात अंतर वाढतं.
दुसरा परिणाम म्हणजे भावनिक अंतर. नातं फक्त एकत्र राहण्याने टिकत नाही, ते भावना शेअर करण्याने टिकतं. आनंद, राग, भीती, असुरक्षितता, अपेक्षा या गोष्टी मोकळेपणाने बोलल्या की जवळीक वाढते. पण जेव्हा आपण सतत स्वतःला रोखतो, तेव्हा आपण सुरक्षित राहतो असं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण स्वतःभोवती भिंत उभी करतो. त्या भिंतीमुळे समोरचा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
तिसरा परिणाम म्हणजे साचलेला राग. सुरुवातीला छोटीशी गोष्ट असते. आपण ती सोडून देतो. पण ती पूर्णपणे संपत नाही. मेंदू नकारात्मक अनुभव जास्त काळ लक्षात ठेवतो. याला negativity bias म्हणतात. त्यामुळे प्रत्येक न बोललेली गोष्ट मनात साठत जाते. एक दिवस एखाद्या किरकोळ प्रसंगावर मोठा स्फोट होतो. समोरच्याला वाटतं, “इतक्या छोट्या गोष्टीवर एवढी प्रतिक्रिया का?” पण आपल्या आत मात्र अनेक जुन्या गोष्टींचा ढीग साचलेला असतो.
चौथा परिणाम म्हणजे आत्ममूल्य कमी होणे. सतत स्वतःच्या भावना दाबून ठेवणाऱ्या व्यक्तीला हळूहळू वाटू लागतं की “माझं बोलणं महत्त्वाचं नाही”, “माझ्या भावना गौण आहेत”. ही भावना आत्मसन्मानाला धक्का देते. नातं टिकवताना आपण स्वतःलाच हरवतो. संशोधन सांगतं की ज्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्यांच्यात नैराश्य आणि चिंता वाढण्याची शक्यता जास्त असते.
पाचवा परिणाम म्हणजे नात्यातील विश्वास कमी होणे. विश्वास फक्त प्रामाणिकपणावर नाही, तर पारदर्शकतेवरही टिकतो. जेव्हा आपण मनातलं लपवतो, तेव्हा समोरच्याला आपल्याबद्दल पूर्ण चित्र दिसत नाही. त्याला जाणवतं की काहीतरी दडलेलं आहे. हा सूक्ष्म संशय नात्यात असुरक्षितता निर्माण करतो.
काही लोकांना वाटतं की शांत राहणं म्हणजे समजूतदारपणा. काही प्रसंगी ते खरंही असू शकतं. पण सतत स्वतःला गप्प ठेवणं हे समजूतदारपणाचं लक्षण नाही. ते भीतीचं, नाकारले जाण्याच्या धास्तीचं किंवा संघर्ष टाळण्याच्या सवयीचं लक्षण असू शकतं. मानसशास्त्रात याला conflict avoidance म्हणतात. अशा लोकांना भांडणाची भीती असते, म्हणून ते संवाद टाळतात. पण संवाद टाळल्याने प्रश्न सुटत नाहीत, ते फक्त पुढे ढकलले जातात.
मनातलं न बोलल्याने शरीरावरही परिणाम होतो. दीर्घकाळ भावना दडपल्याने डोकेदुखी, पोटाचे त्रास, झोपेची अडचण अशा समस्या वाढू शकतात. कारण मन आणि शरीर यांचा संबंध घट्ट आहे. जे आपण शब्दात व्यक्त करत नाही, ते शरीर कधी कधी वेदनेतून व्यक्त करतं.
नात्यात मोकळा संवाद असला की दोघांनाही सुरक्षित वाटतं. संशोधनात असे आढळले आहे की ज्या जोडप्यांमध्ये नियमित आणि प्रामाणिक संवाद असतो, त्यांच्यात समाधान आणि स्थैर्य जास्त असतं. ते भांडतात, मतभेद होतात, पण ते विषय टाळत नाहीत. ते एकमेकांचं ऐकतात. ऐकताना बचावात्मक न होता समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
मग उपाय काय? पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं. अनेकदा आपणच गोंधळलेले असतो. नेमकं काय वाटतंय हे स्पष्ट नसतं. थोडा वेळ घेऊन स्वतःला प्रश्न विचारणे उपयुक्त ठरते. “मला नेमकं का वाईट वाटलं?”, “माझी कोणती अपेक्षा पूर्ण झाली नाही?” अशा प्रश्नांनी स्पष्टता येते.
दुसरी गोष्ट म्हणजे योग्य वेळ आणि योग्य पद्धत निवडणे. रागाच्या भरात बोलण्याऐवजी शांत अवस्थेत संवाद साधणे महत्त्वाचे आहे. “तू नेहमी असं करतोस” असं म्हणण्याऐवजी “मला असं झालं की वाईट वाटतं” असं सांगणं अधिक परिणामकारक असतं. याला I statements म्हणतात. यात आरोप नसतो, तर स्वतःची भावना असते.
तिसरी गोष्ट म्हणजे समोरच्याचं ऐकणं. संवाद हा दोन बाजूंनी होतो. आपण मन मोकळं केलं, तर समोरच्यालाही त्याचा दृष्टिकोन मांडू द्यायला हवा. कधी कधी गैरसमज फक्त दृष्टिकोनातील फरकामुळे असतात.
मनातलं सगळंच लगेच बोलायचं असं नाही. पण जे सतत टोचतं, जे वारंवार मनात येतं, जे आपल्या वागण्यात बदल घडवतं, ते नक्की बोलायला हवं. कारण नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. संवाद, प्रामाणिकपणा आणि भावनिक धैर्यही तितकंच आवश्यक असतं.
शेवटी एक साधी गोष्ट लक्षात ठेवावी. नातं वाचवण्यासाठी गप्प राहणं काही काळ चालू शकतं. पण नातं मजबूत करण्यासाठी बोलणं आवश्यक असतं. मनातलं दाबून ठेवणं म्हणजे जखमेवर फक्त पट्टी बांधणं. ती दिसेनाशी होते, पण आतून बरी होत नाही. जखम स्वच्छ करून औषध लावलं कीच ती भरते. तसंच नात्यातील जखमा शब्दांनी, समजुतीने आणि संवादानेच भरतात.
धन्यवाद.
