विचार आणि भावना मोकळ्या झाल्या नाही तर त्याचे समस्येत रूपांतर होते.
काव्या धनंजय गगनग्रास
शरीरशास्त्रात जसं आपल्या विविध अवयवांना मग ते अंतर्गत असतील किंवा बाह्य, त्यांच्या क्रियांना महत्त्व दिलं दिलं जातं, त्याचप्रमाणे मानसशास्त्रात सर्वात जास्त कश्याला महत्त्व दिलं गेलं असेल किंवा कशावर अभ्यास केला गेला असेल तर तो भावना आणि विचारांवर आहे. अगदी फ्रॉइडपासून एलिस पर्यंत हे आपल्याला दिसून येत. आपल्या मनावर अनेक गोष्टींचा प्रभाव हा पडतच असतो. आनुवंशिकता, समाज, आपली जडणघडण, पण या सर्वातून आपली जी एक विचार पद्धती विकसित होते, जी मानसिकता निर्माण होते आणि जी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा भाग व्यापून टाकते तिचा आपल्यावर मोठा प्रभाव असतो.
Aron Beck ने सांगितल्याप्रमाणे कोणताही प्रसंग आपल्याला कोणती भावना देत नसतो, कृती करायला लावत नसतो तर त्यामागे आपले जे विचार असतात ते आपल्याला तशी भावना व्यक्त करायला, तशी कृती करायला भाग पाडत असतात. एलिस यापुढे जाऊन म्हणतो हे फक्त विचार नसतात तर या आपल्या दृढ श्रद्धा असतात, विश्वास असतात ज्याला irrational beliefs अस म्हणतात त्यातून पुढील गोष्टी निर्माण होतात. आपल्या मनाच्या कारभारात विचारांची भूमिका ही अशी आहे. म्हणूनच हल्ली आपण जिथे तिथे पाहतो. सकारात्मक विचार करा, चांगले विचार करा सर्व चांगल होईल.
आपला दृष्टिकोन चांगला करा जग चांगल भासेल. एकंदरीत काय, तर फिरून सर्व गोष्टी आपल्या विचारांवर येतात. मन मोकळं करा हलक वाटेल अस का बोललं जात? हे मन म्हणजेच नेमक काय आहे, यात नेमक असत काय याचा आपण कधी विचार करतो का? बर जेव्हा आपल्या एखाद्याला सांगतो की तू माझ्याकडे मन मोकळं करू शकतेस किंवा करू शकतोस. त्यावेळी ती व्यक्ती काय करते तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगते, जसं की आता तिला कस वाटत आहे, जे काय झालं असेल त्याबद्दल काय वाटतं आहे, डोक्यात काय चालू आहे हे सर्व ती व्यक्ती आपल्याला सांगत असते.
हे डोक्यात काहीतरी चालू असलेलं सांगणं किंवा काय वाटतं आहे हे बोलून दाखवणं म्हणजेच आपले विचार आणि भावना मोकळे करण. आपण मुद्दाम कोणाला जर अस विचारला की तुझे विचार काय आहे सांग तर त्याला कदाचित सांगता येणार नाही, तुझ्या मनात कोण कोणत्या भावना यावेळी येत आहेत तर तेही सांगता येणार नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये बऱ्याचदा गफलत होईल. पण तेच डोक्यात काय चालू आहे, तुला काय वाटत कसं वाटतं विचारलं तर शक्यता आहे व्यक्तीने ते सांगण्याची. आपल्या मानसिक आरोग्यात विचारांचे किती महत्त्व आहे हे समजले असेल. एका चांगल्या मानसिक आरोग्यात तसच बिघडलेल्या मानसिक आरोग्यात, दोन्ही बाबिंमध्ये विचार हे केंद्रस्थानी असतात.
असे हे विचार, या भावना व्यक्त करण्यासाठी, किंवा व्यक्तीला तस करायला सांगण्यासाठी इतका आटापिटा का केला जातो. का ते व्यक्त होणं गरजेचं आहे? साधी गोष्ट आहे. आपल्या घरातलं अन्न ते कितीही उच्च दर्जाचं असुदे न वापरता जर तसच हवाबंद डब्यात ठेवून दिलं अगदी नावलादेखील त्याला उघडून पाहिलं नाही तर काय होईल त्या अन्नाच? खराब होणार ना ते! दुर्गंधी येणार त्यातून. हे तरी चांगल्या अन्नाबद्दल झालं, आपली कचऱ्याची टोपली ज्यात आपण उरलं सुरलेले अन्न, कचरा या सर्व गोष्टी टाकतो. कितीतरी दिवस तो तसाच पडून राहिला तर आपल्याला त्या बाजूला जायची पण इच्छा होत नाही.
इतकी घाण त्यात तयार होते. ज्यातून परत आपल्या आरोग्याला समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. बाहेरच्या गोष्टी कश्याला अगदी आपल्या शरीराची यंत्रणा पाहिली तरी हे आपल्या लक्षात येईल. शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी मलमुत्र विसर्जन किती गरजेचं आहे हे आपल्याला माहीत आहे. ते नाही झालं तर आपल्या शरीराला किती समस्या, किती धोके होऊ शकतात याची पण आपल्याला कल्पना असते.
जर या सर्व गोष्टींमुळे आपल्या आरोग्याला हानी होऊ शकते तर आपल्या मनात येणारे विचार, जाणवणाऱ्या भावना दाबून टाकल्या, अव्यक्त ठेवल्या तर त्याने आपल्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्याला किती समस्या होतील? जेव्हा आपण आपल्या भावना विचार दाबून टाकतो तेव्हा आपली अवस्था पण त्या बंद डब्यासारखीच होते. जे बाहेर यायला हवं ते योग्य मार्गाने तर येत नाही मग काय तर मार्गच बदलू. काय परिणाम होतात याचे? तर सतत जाणवणारी चिंता, अचानक आलेल नैराश्य.
आता हे नैराश्य अचानक कसं आला अस वाटत पण याच्या मागे याच गोष्टी असतात. मनात असलेल्या गोष्टी दाबून टाकलेल्या असतात. झोप नीट लागत नाही, पचन संस्थेवर परिणाम होतो कारण प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. आपण बरेचदा म्हणतो तुझ्याशी बोलू बर वाटल, मन कसं हलक झालं. पण हेच मन जेव्हा व्यक्त होत नाही तेव्हा आतल्या आत घुसमट सुरू होते. अनेकांच्या तोंडात हे येतही की मला आतल्या आत घुसमटल्यासारखं होत आहे, छातीत घुसमट होते आहे, अस्वस्थता जाणवत आहे. लोक दारूच्या, विविध व्यसनाच्या आहारी जातात त्याच्या मागे देखील या अव्यक्त भावना विचार असतात.
मन मोकळं करायला, दुःख, आनंद व्यक्त करायला कोण नाही तर आपण या व्यसनातून हे सर्व विसरून जाऊ. ही आतल्या आत होणारी घुसमट माणसाच्या आयुष्यात अश्या प्रकारच्या किंबहुना याहून अधिक समस्या निर्माण करते. बोलायला जवळच कोणी नाही, समजून घेणार कोणी नाही, आपण एकटे आहोत कारण काहीही असोत आपल्या मनात जे काही असेल ते मोकळ करायला शिका. त्याची माध्यम शोधा. त्यासाठी दर वेळी माणूसच पाहिजे अस नाही, विशेषतः जवळचाच माणूस पाहिजे अस नाही.
बऱ्याचदा अनोळखी व्यक्ती जितकं छान समजावून घेते, जितकी योग्य प्रकारे मदत करते तितके जवळचे करत नाहीत, त्यांना ते जमत नाही. कारण अनोळखी व्यक्ती आपल्याकडे फक्त एक माणूस म्हणूनच पाहत असते. त्यामागे कोणतही नात नसत, त्यातून पर्यायाने निर्माण झालेले पूर्वग्रह नसतात. जर आपले विचार आणि भावना व्यक्त करायचे असतील तर कलेशिवाय प्रभावी असा मार्ग असू शकत नाही. कोणतीही कला असुदे, नाट्य, संगीत, लिखाण, चित्र कलाकार आपल्या अव्यक्त भावना विचार तर मांडत असतो. अश्याच पद्धतीचे माध्यम शोधून काढा तरच आपलं मानसिक आरोग्य निर्मळ आणि सुवासिक राहील.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
