Skip to content

वयाकडून सुंदर क्षण मागून घ्या, कारण जबाबदाऱ्या कधीच वेळ देत नाहीत.

वयाकडून सुंदर क्षण मागून घ्या, कारण जबाबदाऱ्या कधीच वेळ देत नाहीत.


हर्षदा पिंपळे


मला ‘वय’ ही खरं तर आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट वाटते.कारण या वयाकडून खूप काही शिकायला मिळालं आणि अजूनही मिळतय.माझ्या शेवटच्या श्वासांच्या वेळी माझं वय कदाचित मला स्वतःला माहीत नसेल पण माझ्या वयाने मला जगण्याची संधी दिली,जगायला नवी उमेद दिली, आयुष्यातील विविध क्षण दिले याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर नक्कीच असेल.कारण वय म्हणजे आयुष्यात सातत्याने येणारा एक महत्वपूर्ण टप्पाच आहे.वय नावाची संकल्पनाच नसती तर माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांच वयही मला समोजलं नसतं.ते सुंदर सोनेरी क्षण उतारवयात आलेत की अजूनही तारूण्याच्या उंबरठ्यावर कुणाची वाट पाहत उभे आहेत याची कल्पनाच आली नसती. कदाचित !

असो…सगळ्यांनाच वयाच फार अप्रूप असावं असं वाटत नाही. कित्येकजणांना या वयाचा आनंद वाटण्याऐवजी तिटकाराच जास्त वाटतो.मुद्दाम तिटकारा नाही वाटणार तसा कुणाला परंतु तो वाटतो याचीच खंत वाटते.कारण वयाने केवळ सगळं हिसकावून घेतलेलं नसतं…खरं तर वयच असतं जे सुंदर क्षणांसोबत आपली नाळ हक्काने जोडत असतं.पण त्याचा तिटकारा वाटतो तेव्हा माणूस हे सगळं बहुधा विसरलेला असतो.

वयाची पंधरावी जरी ओलांडली नं तरी
“आता तु लहान नाहीस”असं म्हणून कितीदा
मनाचं खच्चीकरण करते ही दुनिया.
खूप सलते ही गोष्ट मनाला……यार…!!

म्हंटलं तर अगदी खरं आहे. दिवसागणिक वय वाढत जातं.आणि वाढत्या वयानुसार सगळं काही अकरितपणे बदललं जातं.अनेकदा सगळं काही माणसाच्या मनाविरुद्ध घडतं.म्हणून काहीजणांना या वयाचा तिटकारा वाटतो.जबाबदारी ही अशी गोष्ट जी केव्हाही येऊ शकते. जबाबदारी कधीच पूर्वकल्पना देऊन येत नाही.कदाचित याचीच जाणीव करून देण्यासाठी वयाचा छोटा टप्पा जरी ओलांडला तरी ही दुनिया “तु आता लहान नाही” असं म्हणून एका क्षणात बालपणच हिरावून घेते.सगळी भांडीकुंडी एका कोपऱ्यात जाऊन धुळीचे थर साचेपर्यंत तशीच पडून राहतात. आपल्या वयाबरोबर त्यांच आपल्यासोबत भटकणंही थांबतं.आपण वयानुसार वाढत जातो पण ती तशीच अडगळीच्या खोलीत निपचित पडून राहतात. आपली वाट पाहत…!

वाढत्या वयानुसार समजदार व्हावं लागतं
जबाबदारी स्वीकारावी लागते,
हळूहळू का होईना जगणं शिकावं लागतं..!!

हळुहळू जबाबदाऱ्या वाढायला लागतात. त्यांची जाणीव व्हायला लागते. हट्टाला पेटून चालत नाही.एक पाऊल पुढे टाकून एक पाऊल मागे टाकून समजदार व्हावं लागतं.हातातील चॉकलेट गोळ्या जाणीवपूर्वक विसराव्या लागतात. वय विसरून हसावं,वय विसरून बागडावं असं म्हणतात. पण ते सहसा शक्यच होत नाही. “हसण्याच वय राहिलं नाही आता ” असं म्हणून आपणच कधी कधी ते सुंदर क्षण कळत नकळतपणे गमावतो.

पण एक लक्षात घ्या,वय वाढतच जातं आणि जबाबदाऱ्या सुद्धा वाढतच जातात. आज ही जबाबदारी संपली तर उद्या दुसरी जबाबदारी तुमच्या समोर असणारच आहे हे विसरू नका.आणि वाढत्या जबाबदाऱ्या कधी स्वतःला वेळच देत नाहीत. जबाबदाऱ्या पार पाडता पाडता आपण थकून जातो.जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वयाला चिरडून टाकतो.म्हणून ज्या कोणत्या वयात असाल त्या त्या वयाकडून सुंदर क्षण मागून घ्यायला हवे.जबाबदाऱ्या काय शेवटच्या श्वासापर्यंत वाढतच जाणार आहे.पण वय वाढलं तरी एका वयातले सुंदर क्षण पुन्हा परत मिळतील याची काही शाश्वती नाही.

आयुष्याची वयं सरताना…
बालपण /तारूण्य हरवतं आणि
जगण्यातील किमया हळूहळू
लुप्त होऊ लागते..!!

तुमचं मन फुलपाखराच्या मागे धावायला सांगत असेल तर खुशाल धावा.पावसात कधीतरी चिंब चिंब भिजून घ्या.एखादा लेक्चर बंक करावसं वाटलं तर बिंधास्त करा.कट्ट्यावर जाऊन चहा प्यावासा वाटला तर चहा प्या.कधी एकटच हुंदडावं वाटत असेल तर तेही करून घ्या. शाळा-कॉलेजच्या टप्प्यावर तर अनेक संधी दार ठोठावत असतात. त्या संधीला रिकाम्या हाती पाठवू नका.ते वय असतं त्या वयाकडून सगळं काही घ्यायला शिका.दोन्ही पाय थरथरत जरी कविता सादर करता येत असेल तर ती करा.पण रंगमंचावर त्यावेळी जा.त्या त्या वयाकडून तुमचा हक्काचा क्षण मागून घ्या.

कमीत कमी शंभर किल्ले तरी या या वयात सर करून घ्यायचेत असं म्हणून ट्रेकिंगला निघा.जग एक्स्प्लोर करण्याची संधी तुम्ही वयाकडूनच तर मागून घेऊ शकता.काय आहे उद्या वेळ खूप असेल पण जबाबदारी सोडून सहसा कुठे जाता येणार नाही.त्यामुळे वयाकडून आयुष्यातील सर्वात सुखाचे क्षण मागून घ्यायला हवेच.कारण गेलेला टाईम जसा परत येत नाही तसच एकदा सरून गेलेलं वयही पुन्हा परत येत नाही.आणि मग सरून गेलेल्या वयाकडे सरून गेलेले क्षण पुन्हा नव्याने तरी कसे मागायचे…? म्हणूनच आत्ता या क्षणाला ज्या वयात आहात त्या वयाकडून सुखद क्षण हट्ट करून मागून घ्या. जबाबदारी आली की हट्टही करता येत नाही. बालपण, तारूण्यात जी जादू आपण अनुभवत असतो नं नंतर ती जादू आपण सहसा अनुभवत नाही. एका वयात जादू अनुभवणारे आपण नंतर वाढत्या जबाबदाऱ्यांनुसार कुणाचेतरी जादुगार झालेले असतो.

वयं वाढली की नकोसं वाटतं…खरच लहानपण/बालपण खूप सुंदर असतं… वय वाढली तरी आपल्यातल लहान मुल जिवंत ठेवता आल तर थोडा त्रास कमी होईल… कदाचित…।।

एका टप्प्यावर हे वाढतं वयच नकोसं होतं.सगळ्या जबाबदाऱ्या पेलवणं कठीण होत असतं.अगदी आर्थिक डोलाऱ्यापासून ते लग्न, अपत्य, आजारपण,शिक्षण सगळ्या जबाबदाऱ्या कधी अंगावर येतात कळतच नाही.वैतागून वैतागून आपण वयाला दोष देत असतो.तर नेहमीच वयाला दोष देण्यापेक्षा त्याच वयाकडून चांगले क्षण मागून घेतले तर…?? वयानुसार सुंदर चेहऱ्यावर सुरकुत्या तर पडणारच…पण एकदा हसून पहा तो सुरकुतलेला चेहरा इतरांपेक्षा नक्कीच वेगळा भासेल. त्या चेहऱ्याच सौंदर्य, ते हसण्याच सुख त्या वयाकडून तुम्ही मागून घेतलं तर…??

तर…आयुष्य खरच सुंदर असेल.आयुष्यातील जबाबदाऱ्या कायमस्वरूपी वाढतच रहाणार.त्यातून मुक्तता काही मिळणार नाही. जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता वेळ असाच निघून जाईन. म्हणून वय सरत असताना त्याच्याकडून सुंदर क्षण वेचायला विसरू नका.
आयुष्याच्या टप्प्यावर तुमच्यातील लहान मुल जिवंत ठेवून पहा.जबाबदाऱ्यांचा त्रास तेवढाच कमी होईल.जे क्षण येतील त्यांना सुंदर बनवायचा प्रयत्न करा.आलेले क्षण  वेळीच वेचायला शिका. नाहीतर जबाबदाऱ्यांमध्ये काही क्षण निसटून गेल्याची हुरहूर मनाला लागेल…

So…Go and catch a falling star..(John Donne) बाकी काही नाही…!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!