Skip to content

वाईट घटनांना कोसत बसू नका नाहीतर…

वाईट घटनांना कोसत बसू नका नाहीतर…


अनघा म्हेतर


आयुष्य म्हटलं की चांगल्या बरोबर वाईट घटना ही आल्याच. सरळसोट ,साधं – सोपं , गोडगुलाबी ते नसतं आणि असतंच तर काय मजा? वाईट काहीच नसेल तर चांगल्या ची ओळख आणि मजाच नाही उरणार …चांगल्या -वाईटातला फरक तरी कसा करणार! आयुष्यातील चांगल्या घटना तुम्हाला सुखावतात , आनंद देतात ते आपण मस्त एन्जॉय करतो आणि वाईट घटना – प्रसंगी आपला कस लागतो .
काही वाईट घटना माणसाला इतक्या नकोशा वाटतात, त्रासदायक असतात ना की त्या ही आयुष्यातून डिलीट च करता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं असंही वाटतं पण ते शक्य नसतं .मग होतं काय आपण अशा वाईट घटनांना कवटाळून, कोसत बसतो त्यात आपली शक्ती ,शांती आणि वेळही वाया जातो आणि हाती काहीच लागत नाही.

अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ, प्रेरणादायी वक्ता आणि लेखक स्टीफन कॉवे यांनी सुखी आयुष्यासाठी एक भन्नाट सूत्र सांगितले आहे –
“Life is 10% what happens to you and 90% how you react to it.”

“तुमचं आयुष्य हे 10% तुमच्यासोबत काय घडतं आणि 90% तुम्ही त्यावर काय रिॲक्ट होता – प्रतिक्रिया देता यावर अवलंबून असतं.
तर स्टीफन कॉवे म्हणतात की आयुष्यातल्या 10% म्हणजेच आपल्यासोबत काय घडणार ,कोणत्या घटना घडणार यावर आपलं पूर्ण नियंत्रण असू शकत नाही किंबहूना ; नसतंच परंतु त्या घटनेवर आपण काय आणि कशी प्रतिक्रिया देणार यावर आपलं नियंत्रण नक्कीच असु शकतं – असतं. आपण आपली प्रतिक्रिया ठरवू शकतो …आता होतं काय की रिअँक्शन पटकन येते दिली जाते तर आपण यात सुधारणा करून रिॲक्ट होण्याऐवजी रिस्पॉड – प्रतिसाद दिला पाहिजे .

वाईट घटना घडली की रिअँक्शन म्हणून त्या घटनेला कोसत बसण्याऐवजी तिला योग्य रीतीने प्रतिसाद देणं महत्त्वाचं ठरतं .आता या वाईट घटना काहीही असू शकतात व्यक्ती परत्वे वेगळ्या असू शकतात.एखादं आलेलं अपयश , आप्त जवळच्या कुणाचा तरी मृत्यु ,हुकलेली संधी ,झालेलं आर्थिक किंवा इतर स्वरूपाचे नुकसान ,अपघात इत्यादी काहीही वाईट घडलेलं असू शकत आयुष्यात अशा अनेक वाईट घटना घडत असतात पण हे सूत्र हे समजून घ्यायला एक उदाहरण दिलं जातं.

तर इथे 10%म्हणजे घडणारी घटना अशी आहे की एका कुटुंबातील एक व्यक्ती – पुरुष तयार होऊन ऑफिसला जाण्याआधी डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत आहे .तेव्हा त्याची शाळेला जाणारी मुलगी त्याच्या साठी चहा घेऊन येते आणि अनावधानाने तो चहाचा कप निसटून त्या व्यक्तीच्या म्हणजेच तिच्या बाबांच्या अंगावर सांडतो.त्यांचे कपडे खराब होतात. ही आहे घटना आता पहिला प्रसंग ,पहिली रिअँक्शन म्हणजे तो चिडतो आणि मुलीला ओरडतो,”साधा कपही नीट धरता येत नाही वगैरे वगैरे “… मग बायकोला ही ओरडतो की “मुलीला वळण नाही लावलं वगैरे ” मग ती ही नाराज होते आणि मुलगी तर रडायलाच लागते आणि या सगळ्या गोंधळात तिची स्कूल बस ही चुकते

आणि तेवढ्यात ती व्यक्ती शर्ट बदलून येते तर बायको घाबरत विचारते की मुलीला शाळेत सोडणार काय ? तर मुलीला शाळेत सोडून जाताना हिरमुसलेली मुलगी त्याच्याकडे वळून ही न बघता निघून जाते . मग त्याला ऑफिसला जायला वेळ होतो . बॉस ओरडतो वगैरे असा सगळं वाईटच घडत जातं. ही झाली पहिली रीॲक्शन- पहिला प्रसंग.

आता प्रसंग दुसरा … घटना तीच मुलीच्या हातून चहाचा कप सांडला शर्ट खराब झाला , पण आता रिॲक्शन मात्र वेगळी . आपण चुकलो म्हणून ओरडा बसणार या भीतीने रडकुंडीला आलेल्या त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून तिचे बाबा तिला म्हणतात ,”इट्स ओके बाळा! चुकून झालं असेल पुढच्या वेळी कप नीट पकड !” हसून निघून जातात .काही क्षणातच शर्ट बदलून पुन्हा टेबलवर ती व्यक्ती चहा घेते. बाबा रागावले नाहीत हे बघून खुश झालेली मुलगी छान सॉरी म्हणून बाय करून बस मदे चढते.

आपल्या नवऱ्याचा सकाळी सकाळी मूड खराब नाही झाला हे पाहून बायको ही सुखावते व ऑफिस साठी निरोप देते आणि पुढचा दिवस डिस्टर्ब न होता हे चक्र तिथंच थांबतं . लक्षात येतोय फरक? लक्षात येतंय ना सुत्र? …पहिल्या प्रसंगी पटकन आलेली रीॲक्शन तर दुसऱ्या प्रसंगी घटनेला शांतपणे दिलेला प्रतिसाद होता.

अर्थात आयुष्यातील सर्व घटना या चहा सांडण्याइतक्या किरकोळ साध्या नसतात हे मान्यच . कधी कधी त्या अत्यंत वाईट , दुःखद, दुर्दैवी ही असतात. त्या आपल्याला त्रस्त करतात ,निराश करतात , एकटे पाडतात आणि मग आपण त्यांना कोसत बसून काहीच होणार नाही .आयुष्यात पुढे कसं जाणार ? नकारात्मक भावनांमध्ये अडकून तुम्ही फारशा सकारात्मक कार्याची – परिणामांची अपेक्षा कशी ठेवणार ?म्हणून वाईट घटनेला कोसण्याऐवजी , तेच घेऊन बसण्याऐवजी त्यातून बाहेर पडायला आयुष्याकडे आशावादी – सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

असा सकारात्मक प्रतिसाद देताना वाईट घटनेला सामोरे जाणे हे तेवढं सोप्प नसेल आणि नेहमी कुणीतरी साथ देईल असंही नाही. पण या सगळ्यात पहिली पायरी म्हणजे जे घडलं आहे ते , ती घटना कितीही वाईट असली तरी घडलेय हे स्वीकारणं ! त्याला काही पर्याय नसेल ही …मग एकदा का घटना स्वीकारली की त्यातून निर्माण झालेल्या दुःख,त्रास,वेदना , मनस्ताप इत्यादी भावनाही प्रामाणिकपणे स्वीकारा. स्वतःशी घटना आणि त्यातून निर्माण झालेल्या भावनांचा स्वीकार केला की मग गोष्टी थोड्या का होईना सोप्या होतील .

‘ स्वीकारणं’ गोष्टी थोड्या का असेना सोप्या करतं. आणि स्वीकारलं की मग तुम्ही स्वतःला सकारात्मक बदलायला तयार होता , करू शकता …हळू हळू तुम्हीच स्वतःला बदला साठी तयार करा …स्वतःला समजावा , समजून घ्या , समजून घेणाऱ्या आपल्या माणसासोबत बोला ,व्यक्त व्हा ,मन मोकळं करा , स्वतःही स्वतःशी सकारात्मक बोलत रहा (पॉसिटिव्ह सेल्फ टॉक) . धीराने – संयमाने वाईट घटना – संकटांना सामोरे जा आणि पार करा !

अशाच वेळी आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते. आपल्यातील नवीन क्षमता , कौशल्य,गुण गवसतात. संयम आणि आयुष्याचे धडे ही गिरवले जातात . आव्हानांना सामोरे जाण्याची पेलण्याची एक शक्ती आपल्यात येते. आपण घडत जातो आणि आयुष्य साकारत जातं. म्हणूनच कदाचित आजवर चिखलात उमललेल्या कमलाप्रमाणे वाईट घटना – परिस्थितींतून पार करून आलेल्या माणसांनी आपली यशोगाथा लिहून स्वतःचीच कहाणी लिहलेली दिसते.

अशा व्यक्तीकडून प्रेरणा घेत आपण ही कोणत्या वाईट घटनेला सामोरे जात असाल – तोंड देत असाल तर नुसतंच कोसत , कवटाळत बसून अडकून पडू नका ,थांबू नका कारण आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालतच राहत. सो कधी थकल , एकटे पडाल अगदी हरून ही जाल पण थांबु मात्र नका , अडकून पडू नका . सकारात्मकतेने ,धीराने , आसोशीने जगत रहा ,चालत रहा. बाकी चांगल्या – वाईट घटना घडतच राहतील आणि तुमच्या आयुष्यातील अनुभवाची शिदोरी बांधत राहतील .


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

14 thoughts on “वाईट घटनांना कोसत बसू नका नाहीतर…”

  1. कुणीतरी कॉमेंट केली आहे की जर काही लोक वाईट घटना किंवा गोष्टी आठवून स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास देतात तेव्हा काय करावे तर अशा व्यक्ती जवळच्या असतील तर तुम्ही त्यांना धीर द्या त्यांचा त्यांना वेळ घेऊ देत कारण वेळेसोबत माणूस सावरतो आणि काही घटना साठी तो द्यावा लागतो …आणि वेळ दिल्या नंतर ही त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा जस की त्यांच्या शी संवाद साधणे त्यांचे ऐकून घ्यावे यामुळे एकदा मनातील त्रास कमी होत गेला n heal झाले की मग आपोआप त्यांचा त्रास कमी होत जाईल …मग हळू हळू त्यांना त्याची अप्रत्यक्ष जाणीव करून द्या की त्याचा त्यांनाच आणि पर्यायाने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो …वेळ हेच सर्वोत्तम औषध म्हणता येईल.

  2. कुणीतरी कॉमेंट केली आहे की जर काही लोक वाईट घटना किंवा गोष्टी आठवून स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास देतात तेव्हा काय करावे तर अशा व्यक्ती जवळच्या असतील तर तुम्ही त्यांना धीर द्या त्यांचा त्यांना वेळ घेऊ देत कारण वेळेसोबत माणूस सावरतो आणि काही घटना साठी तो द्यावा लागतो …आणि वेळ दिल्या नंतर ही त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा जस की त्यांच्या शी संवाद साधणे त्यांचे ऐकून घ्यावे यामुळे एकदा मनातील त्रास कमी होत गेला n heal झाले की मग आपोआप त्यांचा त्रास कमी होत जाईल …मग हळू हळू त्यांना त्याची अप्रत्यक्ष जाणीव करून द्या की त्याचा त्यांनाच आणि पर्यायाने दुसऱ्याला त्रास होऊ शकतो …वेळ हेच सर्वोत्तम औषध म्हणता येईल.

  3. खूप छान परंतु काही लोकांना आपल्या आयुष्यात घडलेली प्रसंगे विसरायची नसतात पण त्या सारख्या कडून स्वतःला आणि दुसऱ्यांना सुद्धा त्रास देत बसतात. अशावेळी काय करावे.

  4. Swati taralekar

    अगदी बरोबर आणि खर आहे.लेख खुप छान आहे.

  5. बेस्ट लेख काही तरी घेण्यासारखं आहे .👌👌👍

  6. Aniket Hirdekar

    खरंच खूप सुंदर लेख आहे अनघा… Keep it up 👍🏻👍🏻

  7. अमिता शामकुवर

    खूप प्रेरणा देणारा लेख आहे.आयुष्यातल्या काही घटना विसरता येत नाही.वेळच दु:खावर फुंकर घालू शकते.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!