वाद होतील म्हणून सतत टाळू नका, नाहीतर तुम्हाला चुकीचे घोषित केले जाईल.
मेराज बागवान
संवाद, संभाषण यामुळे आपले आयुष्य खऱ्या अर्थाने जिवंत असते.आपण एकमेकांशी बोलतो, हितगुज साधतो, विचारांची देवाणघेवाण करतो.आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.कधी कधी ह्या संवादातून भांडणे, कलह , वाद होतात.पण कधी कधी काय होते, हीच भांडणे किंवा वाद होऊ नयेत म्हणून विषय टाळला जातो.पण यामुळे असे देखील होऊ शकते की, तुम्ही इतरांसाठी चुकीचे होऊ लागतात.इतरजण तुम्हाला चुकीचे घोषित करून टाकतात.
कोणतेही ठिकाण असो, नाते असो किंवा प्रसंग असो , प्रत्येक बाबतीत हे लागू आहे. प्रत्येक माणसाची मते वेगवेगळी असतात.एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील वेगवेगळा असतो.मग ह्याच वेगळेपणातून वाद होतात.मग हळूहळू हाच वाद टाळण्यासाठी तुम्ही तो विषयच टाळू लागतात.आणि मग दुसऱ्या व्यक्तीला असे वाटू लागते की , ही व्यक्ती काही तरी लपवत आहे आपल्यापासुन किंवा काहीतरी खोटे बोलत आहे.अशी एक मानसिकता आज सर्वत्र पहावयास मिळते.
म्हणूनज हेच गैरसमज टाळण्यासाठी तो विषय व्यवस्थितरीत्या हाताळता आला पाहिजे.त्यावर समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलता आले पाहिजे.जर मला अमुक एक गोष्ट पटत नाहीये ,तर ती का पटत नाही हे समजून सांगता आले पाहिजे.कारण ह्या बोलण्यामुळेच विषयावर , समस्येवर तोडगा निघतो. अन्यथा फक्त शांत बसून काहीच होत नाही.किंबहुना तुम्हीच चुकीचे आहात असे समजले जाते.
जसे की , काही घरगुती विषय असतात, उदाहरणार्थ , ‘घरातील तरुण मुला-मुलींची लग्ने’.एखादा मुलगा असतो, ज्याला इतक्यात लग्न करायचे नसते, पण घरातील मंडळी स्थळे पाहत असतात.आणि तो मुलगा येईल त्या स्थळाला नकार देत असे.तसेच आई-वडिलांशी स्पष्टपणे बोलत देखील नसे.यामुळे हळूहळू आई-वडील आणि मुलगा दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.मुलगा काही केल्या काहीच लग्नाबद्दल स्पष्ट बोलत नव्हता आणि पालकांना मात्र त्याच्या लग्नाची घाई झाली होती.
सतत वाद होत आहेत म्हणून कालांतराने मुलगा खूप अबोल झाला.मात्र आई-वडिलांना असे वाटू लागले की, आपला मुलगा आपल्यापासून काही तरी लपवत आहे, त्याचा आपल्यावर विश्वास नाही. तो आई-वडिलांना आपले मानत नाही.आणि यामुळेच हळूहळू त्यांचे नाते दुरावू लागले.खरे कारण मात्र वेगळेच होते, मुलाचे असे मत होते की , मी मानसिकरित्या लग्नाला किमान आता तरी तयार नाही.जरी मी माझ्या पायावर उभा असलो तरी माझे मन लग्नासाठी तयार नाही.तसेच अजून लग्नाचे वय निघून गेलेले आहे असेही काही नाही.हे खरे कारण त्या मुलाचे होते, पण तो आपल्या पालकांशी हे सगळे बोलू शकत नव्हता.
असे अनेक प्रसंग घडतात जिथे वादग्रस्त स्थिती असते.नात्यांमध्ये तर आज ही परिस्थिती खूप वाढलेली दिसत आहे. नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, ऑफिस कर्मचारी यांच्यामध्ये विविध कारणांमुळे वाद उत्पन्न होतात. मात्र कोणीच पुढे होऊन त्या विषयावर चर्चा करायला तयार नसते.आणि यामुळेच गैरसमज वाढत जातात.एकमेकांविषयी चुकीचे मत बनवले जाते आणि तीच व्यक्ती कशी नेहमी चुकत आहे हे स्वतःच्या मनाला बजावले जाते.ही मानसिकता सर्रास आहे. पण त्याचे परिणाम खूप नकारात्मक होत आहेत हे कोणाच्याच लक्षात येत नाहीत.
काही वेळेस वाद होतील आणि त्यामुळे ती व्यक्ती आपल्यापासून दुरावली जाईल किंवा नातेच संपुष्टात येईल म्हणून कित्येक जण मनमोकळा संवाद साधत नाहीत आणि मनात कुढत बसतात.यामुळे नाते कदाचित टिकते पण बहरत नाही आणि मग त्या नात्यांना काहीच अर्थ उरत नाही.प्रत्येक माणसाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे.त्यामुळे एखादी गोष्ट जर दोन्ही व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची असेल तर वादग्रस्त विषय असेल तरी देखील आपले म्हणणे स्पष्टपणे मांडता आले पाहिजे. समोरची व्यक्ती तुम्हाला तितकी महत्वाची मानत असेल,तिला तुम्ही तिच्या आयुष्यात कायम हवे असाल तर , तिच्या जीवनात तुमच्यासाठी किंमत असेल तर , काहीही झाले तरी ती तुमच्यापासून दूर जाणार नाही.म्हणूनच आपली बाजू योग्य पद्धतीने मांडता आली पाहिजे.
आयुष्यात घडणारे प्रत्येक प्रसंग खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळेच प्रत्येक प्रसंगाला तोंड देता आले पाहिजे.आज-उद्या करण्यापेक्षा वेळीच त्या त्या विषयात हात घालून तो विषय मार्गी लावता आला पहिजे.जर तुम्ही त्या विषयावर कोणतीच कृती करत नसाल तर तुम्ही जणू आयुष्याला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहात.म्हणूनच थोडा का होईना ‘स्पष्टवक्तेपणा’ स्वभावात हवा.यामुळे आयुष्य सुकर , शांतीमय होते.अन्यथा अनेक मानसिक आजारांना, जसे की नैराश्य, निर्णय घेण्याची क्षमता खुंटणे ,भावनांवर नियंत्रण नसणे, मानसिक गोंधळ, इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
काही वेळेस काही जण ‘नकार’ द्यायला देखील धजावत नाहीत.मनातून त्यांना एखादी गोष्ट नको असते , किंवा ते त्या गोष्टीसाठी तयार नसतात.पण समोरच्याला सांगून काही वाद होतील ह्या भीतीने ते त्या गोष्टी त्यांना सांगत नाहीत.पण मनातून मात्र त्यांना ती गोष्ट जणू काही ‘जबरदस्ती’ आहे असे वाटत असते.आणि समोरच्या व्यक्तीला असे वाटत असते की , तुम्ही त्या गोष्टीसाठी तयारच आहात. म्हणूनच हा भ्रम घालविण्यासाठी बोलणे फार महत्वाचे आहे.
पण आजकाल होत काय आहे , गैरसमज जोपासले जात आहेत आणि विषय पुढे ढकलले जर आहेत.चला तर मग ‘विषय हाताळूयात आणि गैरसमज टाळूयात’.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख खुप छान आहे