पाऊस पुन्हा पडतोच, कोणाचाही उन्हाळा नेहमीसाठी सोबत राहत नाही.
गीतांजली जगदाळे
पाऊस म्हणजे सगळीकडे हिरवंगार होऊन जातं . वातावरणाचा आपल्या मनावर केवढा परिणाम होतो . मस्त फ्रेश वाटायला लागतं, उत्साही वाटायला लागतं. आपलं मन ही झाडा-झुडपांसारखं टवटवीत होऊन जातं . पाऊस म्हणल, की पहिल्या पावसाच्या सरीत भिजून येणारी मजा , गरम -गरम चहा , भजी किती काय-काय आठवतं .
पण तेच उन्हाळा म्हणजे हैराण करून सोडणारा उकाडा , झाडे , वेली, पाने, फुले पण अशी सुकून गेल्यासारखी होऊन जातात आणि मनाला पण एक मरगळ येते. जेव्हा हा उन्हाळा उच्चांक गाठतो तेव्हा आपण आतुरतेने पावसाची वाट पाहू लागतो . सुख-दुःखाचं ही अगदी तसंच असतं . पाऊस रुपी सुख, आनंद आपण असा एन्जॉय करत असतो आणि जेव्हा उन्हाळारूपी दुःख आपल्यावर येत तेव्हा असाच गुदमरून जायला होतं, सहन होईनास होतं. कधी कधी तर पाऊस पडणारच नाही अशीही भीती वाटते , कधी-कधी दुःखामुळे , त्या दुःखाचा मनावर झालेल्या परिणामामुळे आयुष्यात काही चांगलं होईल , आपण परत आनंदी होऊ शकू ही आशाच लोप पावते ..
Conquest of Happiness पुस्तकात विचार व विवेकाने सुख जिंकावे, असे म्हटले आहे. आपली Concept of Happiness जरा तपासून पहावी. मानवी जीवन अपूर्ण आहे. एक आहे तर एक नाही, असे असणारच. हे सत्य पटले तर आपल्या जीवनातील उणिवांचे दुःख हलके होईल. उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. पदवी, पैसा, प्रतिष्ठा, भौतिक जीवनातली प्राप्ती संपूर्ण सुख किंवा सर्वसुख या प्राप्तीपासून दूरच राहते.
निसर्गाचं चक्र फिरत राहतं ते कोणासाठीही कधीही थांबत नाही. तसेच ऋतू ही बदलत असतात . उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा आणि परत उन्हाळा असे अविरत चक्र चालू असते . त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात देखील सुख -दुःखाचे अविरत चक्र चालू असते . दुःख आणि सुख याचा अनुभव सर्वांना येतो फक्त कोणाचे जगाला दिसते तर कोणाचे अंधारात राहते . हे सगळं आपल्याला माहित असून देखील कधी कधी आयुष्यात काही अशी परिस्थिती येते की परत आनंद येईल असं वाटेनासं व्हायला लागतं.
सुख आणि दुःख ह्या दोनच गोष्टींनी मानवी आयुष्य ओतप्रोत भरलेल आहे. क्षणभर सुखासाठी धावणारा जीव किती अतोनात दुःख, क्लेश, ताण, तणाव स्वतःहून ओढून घेत असतो. काय तर दोन क्षण सुखाचे घालवता यावे म्हणून. विचार केला तर लक्षात येईल त्या वणवण भटकण्यात , त्या काबाड-कष्टात ही एक गंमत लपलेली आहे . बऱ्याच वेळा दुःखाचा काळ मोठा आणि सुखाचे क्षण कमी आहेत असे आपल्याला वाटते .
आपण दुःख हे नेहमी काळाच्या आणि सुख हे नेहमी क्षणाच्या परिमाणात मोजत असतो .जी गोष्ट प्रिय ती किती मिळाली तरी कमीच भासते . आणि जी गोष्ट अप्रिय आहे ती किती कमी मिळाली तरी डोइजडच वाटते . चांगले मार्क्स मिळवण्यासाठी एक विद्यार्थी किती मेहनत करतो ! वर्षभर अभ्यास केल्या नंतर result लागतो त्या result चे ते दोन क्षण त्याला आनंद देऊन जातात . पण ते दोन क्षण मिळवण्यासाठी त्याला वर्षभर कष्ट करावे लागतात , संकटांना सामोरं जावं लागतं.
एक गोष्ट तर आपल्याला मान्य करावीच लागेल, ती म्हणजे उन्हाळा आल्याशिवाय पावसाची खरी मजा अनुभवताच येणार नाही. ते हिरवेगार निसर्गाचे मनमोहक रूप , तो थंडगार वारा अंगावर शहारे आणणारा तरी हवाहवासा वाटणारा , तो गरमा-गरम वाफाळता चहा , आणि ती चटपटीत भजीची मजा, उन्हाळा येऊन गेल्यानंतरच जास्त छान वाटते . त्याचप्रमाणे हे दुःख येऊन गेल्याशिवाय सुखाची चवच चाखता येणार नाही, आणि त्याची मजा तर त्याहून येणार नाही. या चक्रामध्ये सुख आहे म्हणून दुःखाला किंमत आहे आणि दुःख आहे म्हणून सुखाची मजा अनुभवता येते. मानवी जीवन या दोन्हीमुळे अर्थपूर्ण आहे . या चक्रातील एक जरी गोष्ट अस्तित्वात नसेल तर त्या आयुष्याला मुळीच मजा येणार नाही.
मृत्यू जसे जगातले शाश्वत सत्य आहे तसेच सुख आणि दुःख हे प्रत्येक प्राणिमात्राच्या आयुष्यातील सत्यच आहे आणि ते आपण नाकारू शकतच नाही. भुकेसाठी, मायेसाठी, मानासाठी, प्रत्येक प्राणिमात्र ह्या जगात वण वण हिंडत असतो, पण तृप्ती होईपर्यंतच.. एकदा का तृप्तीचे जे काय आहे ते क्षण संपले की पुन्हा त्याच्यासाठी वण वण ही आहेच.
मानवाला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान असुनही माणुस हे सत्य स्वीकारायला का तयार होत नाही? हेच कळत नाही. उन्हाळा पावसाळा हे नैसर्गिक ऋतूचे चक्र आपण जसे स्वीकारले तसेच जर आपण जीवनातील सुख-दुःखाचे चक्र स्वीकारले तर आयुष्याला वेगळी कलाटणी मिळेल .
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूपच छान 👌👌