समोरच्याचं मन सांभाळायचं म्हटलं तर आपलं मन मारावच लागतं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
वर्षा टीव्ही वर तिचा आवडता शो पाहत बसली होती. गाण्याचा शो होता तो. आज खूप दिवसांनी तिला उसंत मिळाली होती. नाहीतर घरातली कामं करण्यात दिवस कसा जायचा समजायचच नाही. आज तिला जरा वेळ मिळाला होता. कारण गौरव तिचा नवरा टूर वर गेलेला आणि मुल शाळेत.
त्यामुळे करायचं अस काही नव्हत. नाहीतर एरवी गौरव घरात असेल तर सर्व वेळेवर करावाच लागत असे. त्याला पसारा, काम पुढे ढकललेली आवडत नसत. पण आज आरामात काम केलं तरी चालणार होत. ती शो पाहत बसलेली तेवढ्यात बेल वाजली. आता या वेळी कोण आल असेल असा विचार करत वर्षा दार उघडायला गेली. दार उघडल्यावर समोर त्या व्यक्तीला पाहून तिला आनंदाचा धक्काच बसला.
कारण ती शर्वरी होती. वर्षाची शाळेतील खूप खास मैत्रीण. खूप वर्षांनी त्या भेटत होत्या. शर्वरीने अस अचानक येऊन तिला धक्काच दिला होता. वर्षा तशीच तिला पाहत राहिली तेव्हा शर्वरिने तिला हलवले व म्हणाली, “अग कितीवेळ अशी पाहत रहाणार आहेस? मला आत घेणार आहेस का नाही?” त्यावर वर्षा हसून म्हणाली, “हो ये आत.”
तिला बसवून वर्षा तिच्यासाठी पाणी घेऊन आली. तिला तर काय करू आणि काय नको असे झाले होते.तिचा तो गोंधळ पाहून शर्वरी म्हणाली, अग मी आज दिवसभर इथेच आहे. त्यामुळे तू आता माझ्याशी गप्पा मार. त्यानंतर तुला पाहिजे ते कर. तिने अस सांगितल्यावर वर्षा निश्चिंत झाली.
दोघांच्याही गप्पा सुरू झाल्या. भेटच इतक्या वर्षांनी झालेली त्यामुळे विषय काही संपत नव्हते. तिने शर्वरीला तिच्या अचानक येण्याचं कारण विचारलं, तेव्हा शर्वरी म्हणाली की ती ज्या कंपनी मध्ये कामाला होती त्यांनी काही कामासाठी तिला पाठवलं होत. ते काम झालं होत आणि आता तिच्याकडे वेळ ही होता. वर्षा इथे राहते हे ही तिला अजून एका मैत्रिणीने सांगितलं होत म्हणून ती मुद्दाम तिला भेटायला आली होती.
अश्याच त्यांच्या गप्पा होता होता वर्षाने मस्त जेवण बनवलं. आज खूप दिवसांनी तिला आपलं जुन माणूस पाहून आनंद झाला होता. वेगळाच उत्साह चेहऱ्यावर दिसत होता. नाहीतर रोज तेच तेच काम करून ती कंटाळून जायची. जेवण झाली पण त्यांचं बोलणं काही संपलं नाही. त्यातच शर्वरिने विचारलं, “मग वर्षा तुझ काम कसं चालू आहे? तेव्हा तर कॉम्प्युटर मधून डोकं काढायची नाहीस. आताही तेच करत असशील.” तिच ऐकून किंचित हसून म्हणाली, “कसला कॉम्प्युटर आणि कसल काय? घर सांभाळून वेळ मिळाला तर ते करेन ना!”
शर्विरला तिच्या बोलण्याचा आश्चर्य वाटलं. कारण तिने पाहिलेली वर्षा अशी नव्हती. ती नेहमी म्हणायची माणसाने काहीतरी करत राहील पाहिजे, आपली स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. आपल्याला मनाला योग्य वाटत तेच केलं पाहिजे आणि तीच वर्षा आज अस म्हणत होती. तिच्या मनाला ही गोष्ट पटेना. तिने याच कारण वर्षाला विचारलं तेव्हा ती म्हणाली, “अग फार काही मोठं कारण नाही ग, लग्न झाल्यावर सुरुवातीला करत होते मी काम. गौरवला पण काही प्रोब्लेम नव्हता.
पण त्याच आधीपासून एक म्हणणं होत की मुलं झाल्यावर त्यांच्याकडे पूर्ण लक्ष असायला पाहिजे. मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मलाही तेच योग्य वाटत होत. पण नंतर जेव्हा मी काम करायचं विचार केला, तस त्याला सांगितलं तेव्हा त्याला ते पटलं नाही. त्याचा म्हणणं, मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांना वेळ देणे हे जास्त गरजेचं आहे आणि राहिला कामाचा विषय तर ते तो करतच आहे. त्यामुळे मी घर सांभाळल तरी खूप आहे.
सुरुवातीला मी त्याला समजावलं की मी दोन्ही गोष्टी सांभाळू शकते. आपण दोघांनी जर मिळून सर्व काम केलं तर गोष्टी नीट होऊ शकतात. पण तो तयार नव्हता. यावरून घरात वाद व्हायला लागले आणि मला हे वाद नको होते. मी विचार केला जर त्याचं मन सांभाळून हे वाद मिटणार असतील तर ठीक आहे. मी माघार घेते. हे खर आहे की मला मन मरावं लागेल पण निदान घरात वाद होणार नाहीत.”
तीच हे बोलण ऐकून शर्वरी तिला म्हणाली, “वर्षा तू जर तुझ्या संसारासाठी, घरासाठी काही पावलं मागे घेत आहेस तर त्यात काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. कारण दर वेळी आपलं ते खर करून पण चालत नाही. कुठेतरी आपल्याला माघार घ्यावी लागते. पण ही गोष्ट त्यालाही लागू होते. अस गरजेचं नाही की तूच तुझ मन मारून जगल पाहिजे. त्याला पण काही गोष्टीत तुझ म्हणणं ऐकल पाहिजे.
तुझी बाजू समजून घेतली पाहिजे आणि मला खात्री आहे तो घेईल समजून. तू परत एकदा त्याच्याशी बोल. कारण संसार हा दोन माणसांचा असतो. त्यामुळे तो दोघांनी मिळून पुढे नेला पाहिजे. एक फक्त सांगतोय आणि दुसरा फक्त ऐकतोय अस करून चालत नाही. कधी तू त्याला सांग, कधी तू तुला समजावेल अस केलं तर तो नीट होईल. माझ्या बोलण्याचा परत एकदा विचार कर.” संध्याकाळ होत आली होती. शर्वरीला परत जायचं होत. तिने जातांना परत एकदा वर्षाला समजावलं आणि ती गेली. तिच्या बोलण्याने खरोखरीच वर्षाला एक उमेद मिळाली होती आणि तिनेही त्यानुसार गौरवशी बोलायचं ठरवल.
अस अनेकदा होत की समोरच्याच मन सांभाळताना आपल्याला आपल मन माराव लागत. आपल्याकडे पर्याय नसतात अस नसत. पण आपल्याला पुढचे वाद, त्रासदायक गोष्टी नको असतात आणि म्हणून आपण माघार घेतो. आपल्या जवळच्या लोकांसाठी, जी खरच आपल्यावर प्रेम करतात, आपल्या आयुष्यात त्यांचं काहीतरी महत्त्व आहे त्यांच्यासाठी जर आपण काहीवेळा आपल्या मनाला बाजूला ठेवत असू किंवा नमती बाजू घेत असू तर त्यात खूप काही चुकीचं आहे अस नाही.
नात सांभाळताना जसा पुढाकार लागतो तशी काहीवेळा माघार पण घ्यावी लागते. पण की किती आणि कोणत्या गोष्टीसाठी, आणि कोणासाठी घ्यावी हेही तितकच महत्त्वाचं आहे. आपण सतत आपल्या मनाला मारून जगत असू तर याला काही अर्थ नाही. आपलं काही अस्तित्वच राहणार नाही. तसच एकसारखं अस वागल्याने समोरचा माणूस पण गृहीत धरू लागतो.
म्हणूनच समोरचा माणूस पाहून तसच आपल्याला स्वप्नांना, अस्तित्वाला खूप धक्का लागणार नाही हे पाहून माघार घ्यावी. नात्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला हे लागू होत. फक्त एकच माणूस मन मारतोय आणि दुसरा त्याला हव तस वागतोय अस करून चालत नाही. दोघांनीही सामंजस्याने वागल पाहिजे. तरच त्या नात्याला अर्थ मिळतो.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
