उदासिपणात लहान लेकरांसोबत खेळून पहा, बराचसा त्रास कमी झालेला आढळेल.
‘लहान मुले ,देवाघरची फुले’ असे म्हटले आहे.असतातच अशी ही लहान मुले,मोठ्याच्या आयुष्यात सुगंध पसरवणारी.लहान मूल अगदी निरागस असते.ते कोणत्या गोष्टीला घाबरत देखील नाही.आपणच मोठी माणसे त्यांना ‘भीती’ घालत असतो.पण ही लहान मुले अगदी खरी असतात.मनमोकळेपणाने राहत असतात.ज्यांच्या घरात लहान मुले असतात ,ते घर नेहमी गजबजलेले असते.मुलांच्या मस्तीने,हसण्याने,बागडण्याने अगदी प्रफुल्लित होऊन जाते.आणि ह्या लहान मुलांमुळे,माणसाचा उदासीपणा,ताण खूप हलका होतो.आपल्याला शांत वाटते.म्हणूनच, उदासिपणात लहान लेकरांसोबत खेळून पहा, बराचसा त्रास कमी झालेला आढळेल.
तेजस,एक खूप हुशार ,कर्तबगार ,चांगल्या पोस्ट वर नोकरीस असणारा तरुण होता.नोकरीत चांगला जम बसल्यामुळे,आता त्याच्या घरचे त्याच्या साठी लग्नाचे स्थळ पाहत होती.तेजस असा मुलगा होता की,’आपण बरे आणि आपले काम बरे’.पण त्याच्या ह्या स्वभावामुळे तो सतत एक प्रकारच्या दडपणाखाली असे.कामाचा सतत ताण घेत असे.घरी आल्यानंतर देखील,त्याच्या डोक्यात कामाचेच विषय सुरू असत.तो शांत कधी असतच नसे.
त्या ताणामुळे तो मित्रांसमावेत देखील मिसळत नसे.घरच्यांशी मनमोकळेपणाने बोलत देखील नसे.एकटाच सर्व काही सहन करत असे.त्याला आता ह्या सगळ्याची सवयच झाली होती.त्याच्या जवळच्या लोकांना ,त्याचा जम स्वभाव माहीत होता.तरी देखील ते त्याच्याशी संपर्क ठेवत असत.त्याच्याशी सदैव बोलण्याचा प्रयत्न करीत असत.पण तो काही त्याचा ताणातून मोकळा होत नसे.
कुटुंबीयांनी असा विचार केला की ,ह्याचे लग्न झाले तर त्याच्यात काही बदल होईल.म्हणून ते त्याला लग्नासाठी तयार करीत होते.पण तेजस ,काही केल्या तयार होत नव्हता.मग कालांतराने तो कसाबसा लग्नाला तयार झाला.अंजली सोबत त्याचा विवाह संपन्न झाला.अंजलीच्या रूपाने तेजस ला एक अनुरूप जोडीदार मिळाली.संसार सुरू झाला.काही महिन्यातच बाळाची चाहूल लागली.सगळे आनंदी झाले.तेजस देखील आता पूर्वीपेक्षा प्रफुल्लित दिसत होता.
तेजस-अंजली ला कन्या रत्न प्राप्त झाले.दोघेही खूप खुश होते.बाळाच्या आगमनाने संपूर्ण घर आनंदाने भरले होते.आणि ह्या सगळ्यात सर्वात जास्त आनंदी व्यक्ती होती ,ती म्हणजे ,तेजस…
तेजस,आता मुलीसोबत घरी असला की खेळत असे.तिच्याशी बोबडे बोल बोलत असे.कामावरून आल्यानंतर मुलीसोबतच त्याचा जास्तीत जास्त वेळ जात असे.हळूहळू मुलगी मोठी होत होती.तिला चालायला शिकवताना, तेजस स्वतःला विसरून जात असे.
मुलीचं नाव देखील अगदी साजेसे ठेवले होते..’आनंदी’.जी खऱ्या अर्थाने तेजस च्या आयुष्यात आनंद घेऊन आली होती. तेजस आता पूर्ण बदलला होता,आणि त्याला कारणीभूत होती ती ,’आनंदी’.तो आता माणसात आला होता.गोष्टींचा अति ताण न घेता,त्या सोडून द्यायला शिकला होता.मुली सोबत खेळत खेळत ,तो स्वतःचे एक ‘नवीन व्हर्जन’ बनवत होता.
तेजस आता खूप समाधानी,आनंदी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा अनुभव घेत होता.त्याला त्याची चूक समजली होती.आणि आता त्याने नेहमी आनंदी राहायचे ठरवले होते.
तर अशी किमया आहे,लहान मुलांची.माणसाला बदलवणारी अशी ही लहान मुले असतात.उदासीपणात लहान मुलांसोबत एकदा जरूर वेळ व्यतीत करून पाहा,त्यांच्याशी मुक्तपणे खेळून पाहा.तुम्ही मनापासून खूप हसाल.आणि तुमचा त्रास कुठल्या कुठे पळून गेलेला असेल.
ह्या लहान मुलांच्या रुपात जणू काही देवच आपल्याला कठीण काळात मदत करीत असतो.म्हणून तुम्हाला कधी लहान मुलांसोबत वेळ मिळाला तर नक्की तो त्यांच्यासोबत व्यतीत करा,त्यांच्यासोबत खेळा. तुम्ही स्वतःला त्रासमुक्त अनुभवाल हे नक्की.
लेखिका – मेराज बागवान
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

