त्यांना भूतकाळाची सारखी आठवण करून देऊ नका,जे स्वतःला सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत.
हर्षदा पिंपळे
आठवणी कधीच सुखद नसतात. त्या दुःखाच्या असोत वा आनंदाच्या. दुःखाच्या असतील तर वाया गेलेला भूतकाळ आठवतो म्हणून त्रास होतो आणि त्या सुखाच्या असतील तर ते क्षण सुटले म्हणून त्रास होतो. (व.पु.काळे)
व.पु.काळेंनी म्हंटल्याप्रमाणे सगळ्यांच्या बाबतीत असं घडत असणार यात काही शंकाच नाही.या भूतकाळातून माणूस बरच काही शिकलेला असतो.अगदी पुढील आयुष्यासाठी त्याने त्या भूतकाळाकडून चांगलेच धडे घेतलेले असतात.एक अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो.आणि याच भूतकाळातून माणूस अनेकदा पुढील आयुष्याची भिंत भक्कमपणे बांधत असतो.
प्रत्येकाला एक वर्तमान एक भविष्य आणि एक भूतकाळ हा असतोच. फरक इतकाच की कुणाचा भूतकाळ हा वाईट असतो तर कुणाचा भूतकाळ हा चांगला असतो. कुणी गेलेल्या आठवणी विसरायच खूप प्रयत्न करतो तर कुणी त्या आठवणी सहसा विसरतच नाही.सतत त्या भूतकाळामध्ये अडकून पडणारी लोकं आपण आपल्या आजुबाजुला बघत असतो.आणि काही अशी लोकही आपण आजूबाजूला पाहतो जी भूतकाळाला सोडून देऊन वर्तमानात जगायचा प्रयत्न करत असतात.
त्यांच्याकडे पाहून “इतकं सगळं झालं तरी कसं काय ही हसत-खेळत जगते…?”असा प्रश्न कित्येकांना सहज पडतो.काही लोकं मनातून खरच कौतुक करतात पण काही लोकांना सवयच असते एखाद्याला त्रास देण्याची, एखाद्याच्या जखमा नव्याने ओल्या करण्याची.अशा लोकांना एखादी व्यक्ती पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय ते बघवत नाही.काही लोकं पुढे जाऊ पहाणाऱ्या व्यक्तीला मुद्दाम त्याच्या भूतकाळाची आठवण करून देतात.आणि मग अशाने ती व्यक्ती पुन्हा एकदा नरवस होते.नैराश्याला जवळ करू पाहते.पण खरच हे असं करणं कितपत योग्य आहे…?
एखादी व्यक्ती जर सुधारत असेन,तर त्याला त्याच्या वाईट भूतकाळाची आठवण करून देणं गरजेचं आहे का..?
तर मुळीच नाही..त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींची आठवण करून देऊ नये.कारण,भूतकाळ विसरणं एखाद्या माणसाला सहज शक्य होत नाही. भूतकाळातून बाहेर पडण्यासाठी मनाची प्रचंड तयारी असावी लागते.भूतकाळात झालेला त्रास विसरणं काही सहज शक्य नाही. त्याला थोडा वेळ तर निश्चितच लागतो.पण एखादी व्यक्ती स्वतःहून स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करत असेल तर ते चांगलच आहे. म्हणून एखादी व्यक्ती स्वतःचा भूतकाळ विसरायचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला तो भूतकाळ विसरू द्यावा.आपणच त्या व्यक्तीला चार आशेचे पंख लावून नव्याने उडण्यासाठी बळ निर्माण करायला हवं.
“छान वाटतय, तु भूतकाळ विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करतोय तर…असाच पुढे जात रहा.” असं बोलून त्यांच्या मनात नवी आशा निर्माण करा.त्यांना मोटीवेट करा.त्यामुळे ती व्यक्ती अधिक उत्साहाने भविष्याकडे वाटचाल करायला सुरुवात करेन.वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करेन. वर्तमानातील एक एक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेन.पुन्हा एकदा नवीन आयुष्य जगण्यासाठी एक उंच भरारी घेईन.आणि अशाच व्यक्तीमुळे भूतकाळात अडकून पडलेल्या चार लोकांवरही त्याचा प्रभाव पडेल.त्या व्यक्तींनाही एक वेगळीच प्रेरणा मिळेल.नाहीतर एखाद्याला पुन्हा जुन्या जखमांची आठवण करून दिली तर त्याचं आयुष्य पुन्हा उभं रहायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही.
कारण सगळं चांगल चाललं असताना मध्येच हा भूतकाळ समोर आला तर काय होतं नी काय नाही हे कुणाला वेगळं सांगायला नको.इथे प्रत्येक जण असेल जो अशा भूतकाळातून गेला असेल.म्हणून जो सुधारतोय त्याला सुधारूद्या.त्याला भूतकाळाच्या टाचण्या टोचून बिघडवण्याचा प्रयत्न करू नका.
कारण,शेवटी प्रत्येकाच असं आयुष्य आहे आणि ते जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे.आणि ते आयुष्य केवळ भूतकाळात जगायच की त्यातून बाहेर पडून उरलेलं आयुष्य मोकळेपणाने जगायच हे ठरवण्याचाही प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहे.आपल्यावरही ही वेळ कधीतरी येऊ शकते हे लक्षात घेऊन एखाद्याला डीमोटीवेट करण्यापेक्षा मोटीवेट करण्याचा प्रयत्न करा.
भूतकाळात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.वर्तमानात जगायला त्याला मदत करा.त्याचं भविष्य सुंदर करण्यासाठी मनापासून त्याला पुढे जाण्यासाठी अडथळ्यांपेक्षा नव्या मोकळ्या वाटा खुल्या करा.
स्वतःबरोबर दुसऱ्याचही आयुष्य सुंदर करा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
