Skip to content

त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जी तुम्हाला इतरांच्या गोपनीय गोष्टी सांगते.

त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जी तुम्हाला इतरांच्या गोपनीय गोष्टी सांगते.


हर्षदा पिंपळे


“अगं तिने आज नं सोन्याची चैन घेतली. मंगळसूत्रही घेतलं म्हणे.तेही चांगलं चार पाच तोळ्याचं ! सांगू नको हं कुणाला…मी आपलं तुला बोलले बाई.मला काही हाउस नाही गावभर चकाट्या पेटवायची”

“काय त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं म्हणे.आणि लग्न किती थाटामाटात केलं.पण काही राहिलं का आता त्याचं.काय पण लोकं असतात नं ?काही कळालं का तुम्हाला त्यांच्याबद्दल?”

“त्यांची मुलगी पळून गेली. दिसायला काही बरा नाही पोरगा.कमवतो की नाही,काही माहीत नाही बघा.सांगू नका बरं,मी बोलले म्हणून.”

अशी उदाहरणं तुम्हाला काही नवीन नसावीत. असं कित्येकांच गुपीत यांच्याकडे असतं.पण ते गुपित न राहता त्याची केव्हा दवंडी होते कळतच नाही.आता अशा लोकांवर कोणत्याही बाबतीत विश्वास ठेवणं धोकादायकच!अशी लोकं केव्हा काय करतील काहीच सांगता येत नाही.इतरांची अशी प्रत्येक गोष्ट कुणी दवंडीसारखी पिटवतं का?आणि मुळातच अशा गोष्टी करण्याला काय अर्थ आहे..? एखादी आवश्यक अशी गोष्ट सांगणं काही वाईट नाही. परंतु काही लोकं विनाकारण दुसऱ्याच आयुष्य उघड्यावर आणत असतात.पण आपण मात्र कित्येकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.

मला सांगा,

आयुष्यातील प्रत्येक गोष्ट येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगत बसलो तर आपले प्लॅन्स वर्क होतील का?आणि मुळातच आजुबाजुला असणारी माणसं खरच इतकी विश्वासू आहेत का ? आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगण्याची खरच गरज असते का ?

असे प्रश्न आयुष्यात तुम्हाला कधी पडतात का ?

आपण आपल्या आयुष्यातील माणसांवर इतका विश्वास ठेवतो की कधी कधी हाच विश्वास आपला विश्वास या शब्दावरचा विश्वास उडवतो.पण कित्येकदा माती खाऊनही आपण तसेच वागतो.वारंवार त्याच चुका आपण करत राहतो.

अनेकदा बोललं जातं की स्त्रियांच्या पोटात एकही गोष्ट राहत नाही. त्यांना एखादी गोष्ट सांगितली की त्या जगभर करतात म्हणे! म्हणून स्त्रियांना फार काही सांगू नये. पण खरं तर ही गोष्ट केवळ स्त्रियांना लागू होत नाही.पुरूषही याबाबतीत खरं तर मागे नाही. तर सांगायची गोष्ट इतकीच की,आपण आपल्या खाजगी आयुष्यातील वा आयुष्यातील खूप महत्वाच्या गोष्टी काही लोकांना सांगणं जाणीवपूर्वक टाळायला हवं.अशी लोकं जी की सातत्याने दुसऱ्याच्या खाजगी गोष्टी आपल्याला येऊन सांगते.जगाला जाऊन सांगते.अशा लोकांवर आपण विश्वास ठेवणं तसं आपल्यालाच भारी पडू शकतं.

आपण खूप विश्वासाने आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगायला जातो.परंतु ती व्यक्ती मात्र तिच गोष्ट बाहेर जाऊन इतर चार लोकांना सांगून मोकळी होते.”ही व्यक्ती कुणालाही काही सांगणार नाही. ही आपली विश्वासू व्यक्ती आहे. माझा या व्यक्तीवर खूप विश्वास आहे.” या भ्रमात आपण दंग असतो.पण मित्रांनो, अनेकदा हा भ्रमाचा भोपळा फुटतो हो !

म्हणून विश्वास ठेवताना थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कोण केव्हा आणि कसा विश्वासघात करू शकतं काही सांगता येत नाही.त्यामुळे माणसांची पारख करणं शिकायला हवं.नको त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून स्वतःच्या आयुष्याची माती करून घेण्यात काहीच अर्थ नाही.अशा माणसांमुळे आपल्या आयुष्यातील कित्येक नको त्या गोष्टीसुद्धा चव्हाट्यावर यायला वेळ लागत नाही. ईतकच नव्हे तर आपले सिक्रेट्स हे सिक्रेट्स राहत नाही.आपली नियोजनंसुद्धा अनेकदा चुकतात.आणि मग मानसिकता शांतता आणि मानसिकता दोन्ही बिघडत जाते.चांगल्या माणसावर विश्वास ठेवायलाही आपण कचरतो.

म्हणून म्हणते,कोणतीही गोष्ट करताना सावधगिरी बाळगा.आपल्या गोष्टी कमीतकमी लोकांपर्यंत जातील याची काळजी घ्या.अशा लोकांपासून चार हात लांबच रहायचा प्रयत्न करा.कुणी काही इतरांची खाजगी माहिती सांगत असेल तर फार लक्ष देऊ नका.मुळातच जिथे गरज आहे तिथे लक्ष द्यायचा प्रयत्न करा.

कारण कुणाच्याही खाजगी आयुष्यात सातत्याने डोकावण्याचा आपल्यालाही काहीही अधिकार नाही.त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आयुष्यात डोकावलं तर निश्चितच प्रकाश पसरेल यात शंका नाही .

कुणी आपल्याला फसवायला नको आणि आपणही कुणाची फसवणूक करायला नको.कारण विश्वासावर आजही नात्यांच्या कित्येक भिंती भक्कमपणे उभ्या आहेत. फक्त माणसांची पारख करता यायला हवी.

पहा..विचार करा,अशा माणसांपासून जरा लांबच रहायचा प्रयत्न करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!