तुम्ही सुद्धा कोणाची तरी Priority आहात हे माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे.
बहुतेकदा अस होताना आपण ऐकल असेल.. अनुभवलं सुद्धा असेल की आपण कोणावर प्रेम करतोय आणि तीच व्यक्ती आपल्यावर प्रेम करते ..आणि आपल्याला तीच व्यक्ती महत्वाची वाटते.. आपल्यावर इतर सुद्धा प्रेम करतात पण प्रेमात असल्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त त्याच व्यक्तीचं प्रेम दिसते आणि कळते सुद्धा.. पण कधी अशी सुद्धा वेळ येते जेव्हा आपल्याला आपल मन समजून घेणारी आपली अशी जवळची माणस हवी असतात मग त्यावेळी ती माणस आपल्याला सावरायला.. समजवायला मदत करतात..का करत असतील ती आपली माणसं आपल्याला मदत.. का आपल्याला ते आपल्या अडलेल्या वेळी सुद्धा समजून घेतात..
कारण त्या व्यक्तींच्या आयुष्यात आपण महत्वाचे आहोत.. पण आपण जीच्यावर प्रेम करतो त्याच व्यक्तीला इतकं महत्त्व देतो आणि सर्वश्रेष्ठ समजतो की आजूबाजूची काळजी.. आपल्यावर प्रेम करणारी इतर माणसं आपल्याला दिसेनासे होतात..
कित्येक उदाहरण तर असे आहेत जे माझं कोणी नाही म्हणून दुःख करतात.. मुळात असतात सगळेजण पण आपल्याला हवे असणारे आपल्याजवळ नसतात म्हणून त्याच दुःख..
सांगायचं काय तर आपली priority काय आहे… कोण आहे हे आपण सतत बघत आलो आहोत आणि आजही तेच आपण करतोय.. आणि आपल्याला त्यांच्याकडून तेवढच महत्व नाही मिळालं की त्यावेळी आपण दुसऱ्यांचा आधार शोधतो..
असो ज्याच त्याच्याकडे पण यामध्ये सुद्धा अशी माणसं आपल्याला भेटतात ज्यांना त्यांनी महत्त्व मानलेले असते ती व्यक्ती आयुष्यात नाही भेटली की ते आयुष्य जगायचं सोडून देतात.. कोणी स्वतःच्या जिवाचं बरवाईट करून घेत तर कोणी सगळी हौस मौज करणं सोडून देत..
मग त्यामध्ये इतके अडकून पडतात की सतत नाराज राहणं.. सतत हाच विचार डोक्यात असणं की बघ मी त्या व्यक्तीला इतका जीव लावते पण तरीही ती व्यक्ती मला महत्वाची समजत नाही..
आणि इथेच चूक होते.. आपण कोणावर जेव्हा जीव लावतो .. कोणाला महत्व देत असतो त्यावेळी आपल्याला सुद्धा कोणी महत्वाचे समजत असते पण आपल मात्र तिथे अजिबात लक्ष जात नाही…
मी ज्यांना माझी priority समजतो त्या व्यक्तीने मला स्वतःची priority समजल नाही तर सर्वच संपते अस होत नाहीना .. अशावेळी आपण आजूबाजूला पाहिलं तर अशी माणस नक्कीच असतील जी आपल्याला त्यांची priority समजतात.. मग जगायचं असेल तर अशाच व्यक्तींकडे बघून जगायचं जे आपल्यासाठी जगतात…
कोणीतरी आपल्यावर सुद्धा अवलंबून असते.. कोणाचं आयुष्य आपल्यामुळे सुरळीत होणार असते.. कोणाच्या आयुष्यात आपल्यामुळे आनंद निर्माण होतो .. कोणी आपल्याही नकळत आपल्याला आपल समजून आपली जीवापाड काळजी घेत असतं.. मग आपण अशा व्यक्तींसोबत आपल आयुष्याचं एक सुंदर वळण घ्यावं..
सतत माझं माझं करण्यापेक्षा आपल्यालाही कोणी महत्वाचं मानते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण आपण जर त्यांनाही टाळू तर आपण एकटे पडणार..
जगणं सोडण्यापेक्षा त्या व्यक्तींसाठी जगायचं ज्यांच्या आयुष्याला आपल्या अस्तित्वाने अर्थ मिळणार असतो… माझ्यासाठी कोण महत्वाचं आहे यापेक्षा कोणासाठी तरी मी महत्वाची आहे हा सुद्धा विचार मनाला आनंद देऊन जातो.
लेखिका – मिनल वरपे
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.


Excellent 👌