तुम्ही जितकं नैसर्गिक राहाल, वागाल तितकं लोकांचे टोमणे जिव्हारी लागणार नाहीत.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
लतिकाच्या आयुष्यातील आज खूप महत्त्वाचा होता. आज ब्युटी काँटेस्टचा निर्णय लागणार होता. यात सिलेक्ट होण खूप गरजेचं होत. यात सिलेक्शन झालेल्या मुलीला पुढे बरेच प्रोजेक्ट्स मिळणार होते जे त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होत. सकाळपासून ती कॉलची वाट पाहत होती. काम करताना पण तीच अर्ध लक्ष फोनकडेच होत. कारण टॉप थ्री मध्ये सिलेक्ट झालेल्या मुलींना बोलवण्यात येणार होत. तिथे गेल्यावरच समजणार होत आपला नंबर कितवा आहे. त्यामुळे तिची उत्सुकता वाढतच होती. तिचं असा अजिबात हट्ट नव्हता की पहिलाच क्रमांक यावा.
पण तिला खात्री होती की तिने अतिशय उत्तम पद्धतीने सर्व राऊंड कव्हर केले होते. त्यामुळे आपण सिलेक्ट होणार आहोत हे तिला माहीत होत. पाहता पाहता ११वाजून गेले. अजून काही फोन आला नव्हता. ती तशीच सर्व काम आवरून बसली होती. तेव्हढ्यात रिंग वाजली. घाई गडबडीत तिने फोन उचलला. फोन तिथूनच आला होता. त्यांनी तिला सांगितलं की ती सिलेक्ट झाली होती फक्त नंबर तिथे समजणार होता. त्यामुळे तिला तिथे जायचं होत. तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला. तिने आईला ही बातमी दिली. आईला पण हे ऐकून खूप आनंद झाला. तिने लतिकाला देवापुढे नेले. तिथे दिवा लावून साखर ठेवली. आणि तिला पाया पडायला लावले. लतिकाने पण देवाला नमस्कार केला व पटापट तयारी करून ती बाहेर पडली.
तिथे गेल्यावरही त्यांना परत तयार व्हायचं होत. वेगळे कपडे परिधान करायचे होते. लातिकाला एक सुंदर असा ड्रेस देण्यात आला. शुभ्र असा रंग, त्यावर मोतिया रंगाचे मणी असा तो फुल गाऊन होता. साधा पण सुरेख. लतीकाला तर तो अजूनच शोभून दिसत होता. तिचे सौंदर्य त्यात अजून खुलत होते. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झाली. आतापर्यंतच्या सर्व स्पर्धक पण तिथे होत्या. पण त्या सर्व खाली बसल्या होत्या. टॉप तीन मध्ये लतिका आणि अजून दोन मुली होत्या. त्याही खूप सुंदर दिसत होत्या. सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती.
शहरातलं खूप मानाचं अस हे ब्युटी काँटेस्ट होत. त्यातला भाग होता येणं हीच मोठी गोष्ट होती. त्यामुळे अश्या या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमाकांत येणं हे एक प्रकारे यश होत. कार्यक्रमाला सुरुवात झाली. जज आले. सुरुवातीला ही स्पर्धा सुरू झाल्यापासून कसा प्रतिसाद मिळाला, प्रत्येक मुलीने कश्या पद्धतीने वेगवेगळे टास्क केल हे सांगितल गेलं आणि बघता बघता आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली होती. आता फक्त कोण आहे ती ब्युटी क्वीन हे पाहायचं राहील होत. या तिघी मागच्या बाजूला बसल्या होत्या. त्यांचं नाव घ्यायला आता सुरुवात झाली. पहिल्या दोघींची नाव घेतली व त्या गेल्या.
आता फक्त लतिका राहिली होती. तिचं पण नाव पुकारल गेलं. धडधडत्या हृदयाने ती बाहेर गेली. स्टेजवर आता त्या तिघी पण आल्या होत्या. तिघी पण एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या, त्यांची पार्श्वभूमी वेगळी होती तरीही त्या आज एका मंचावर होत्या. आता फक्त ते नाव समजायचं बाकी होत ज्याची इतका वेळ सर्व जण वाट पाहत होते. आधी तृतीय क्रमांक समजणार होता. जियाच नाव घेतल गेलं. टाळ्यांचा गजर झाला. तिचा तिसरा नंबर आला होता.
लतिकाची धडधड अजून वाढत होती. जजच्या हातात आता मुकुट होता जो कोणा एकीच्या डोक्यावर सजणार होता. त्यांची मजा घेत जज इकडून तिकडे फेऱ्या मारत होते. आणि शेवटी या वर्षीची ब्युटी क्वीन आहे लतिका अस जोरात पुकारण्यात आला आणि तो मुकुट तिच्या डोक्यावर सजला. लतिकाचे डोळे बंद होते व पाणी वाहत होत. चेहेऱ्यावर हसू होत. त्या तेवढ्या क्षणात मागच्या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
लतिका दिसायला सावळी होती. तसच आपल्या समाजात ज्या सो कॉल्ड सौंदर्याच्या व्याख्या आहेत तशी ती नव्हती. एक सर्व सामान्य साधी मुलगी. पण तिच्या रंगावरून, तिच्या दिसण्यवरून तिला नेहमी काही ना काही ऐकवलं जाई. कशी ती बेढब आहे. मुलींसारख लक्षण तिच्यामध्ये नाही अस तिला म्हटल जाई. अनोळखी म्हणत होतेच पण नातेवाईक पण कसूर सोडत नसत. आणि हे वाढलं कधी जेव्हा लतिका छोट्या मोठ्या स्पर्धामध्ये,डान्स शो मध्ये भाग घ्यायला लागली तेव्हा. तेव्हा तर तिला अजूनच टोमणे मिळायला लागले. लतिकाच्या आईला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटे.
पण ती काही बोलू शकत नव्हती. तिला अजिबात आवडत नसे की तिच्या मुलीला अस कोणी बोलत आहे. म्हणून ती लातिकालाच ओरडायची की ती अश्या गोष्टीत का सहभागी होते ज्यातून तिला असे टोमणे ऐकावे लागत आहेत. पण लतिका समजूतदार होती. तिने कधी लोकांचं बोलण मनावर घेतल नाही. कारण तिला स्वतःवर विश्वास होता. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास होता. ती आईला समजावायची, आई बोलणारे बोलत राहणार, आपण जर त्यांचं बोलण ऐकून घेतलं आणि त्याप्रमाणे वागत राहिलो तर आपलं अस आयुष्य राहील का? ते त्याचंच नाही का होणार?
तुला माहित आहे मी कशी आहे, मला माहित आहे माझ्या क्षमता काय आहेत? लोकांना काहीही वाटू दे. त्याने आपल्याला का फरक पडावा? तिच्या आईला तिचं कौतुक वाटायचं. इतक्या कमी वयात हिच्याकडे कसं काय इतका समजूतदारपणा आला म्हणून. तेव्हापासून मात्र आईने पण सर्वांकडे दुर्लक्ष केलं व लतिकाला तिच्या प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला. जेव्हा तिने या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा तर लोकांच्या बोलण्याला उधाणच आलं. आता काय सौंदर्य स्पर्धेत अश्या लोकांना पण घेतात वाटत? मग आम्ही पण जायला हरकत नाही. अस बोलण तिच्या कानावर पडे. काही लोक मुद्दाम खोटे सल्ले द्यायला येत की तू ही ट्रीटमेंट घे, तसच कर म्हणजे तुझ सिलेक्शन होईल.
आमच्या ओळखीचे एक आहेत त्यांना सांगितलं तर ते तुझी मदत करतील. अर्थात कोणीही चांगल्या हेतूने हे सांगत नव्हते. कसही करून तिचा आत्मविश्वास कसा कमी करता येईल, तिला टोमणे मारत येतील हेच सर्वांना हवं होत. पण अस काही झालं नाही. सर्वांना जशास तस उत्तर देण्याची धमक लतिकामध्ये होती. तिला खोटं वागण्याची अजिबात गरज नव्हती. फक्त यावेळी ती तिच्या वागण्यातून, कामगिरीतून सर्वांना गप्प करणार होती. तेच तिने आज केल. तिने तो मुकुट पटकावला. तिला तो मुकुट मिळण्यामागाच कारणच ते होत की तिने सौंदर्याची व्याख्याच बदलली होती.
त्याचप्रमाणे लोकांना वाटत तस या स्पर्धेत फक्त सुंदर चेहरा महत्त्वाचं नसून, बुद्धिमत्ता, आपला आत्मविश्वास, बाकीची कौशल्य हे पण महत्त्वाचं होत. तेच तिने तिच्या मुलाखतीतून आणि दिलेल्या टास्क मधून दाखवून दिले. तिला जेव्हा विचारलं गेलं की सौंदर्य म्हणजे काय? अतिशय वेगळी अशी व्याख्या तिने सांगितली. “वेळ बदलेल, काळ बदलेल, हे बाह्य शरीर पण हळू हळू बदलेल पण माझ्या आतल जे तेज आहे, जे मला इथपर्यंत घेऊन आल आहे जे मला शेवटपर्यंत काम करायला प्रेरित करेल तेच ते आंतरिक तेज म्हणजेच माझ सौंदर्य असेल.” सर्वांना आज नव्याने काहीतरी उमगल होत. अश्याच पद्धतीने तिने जजच्या प्रश्नांची उत्तरे अतिशय प्रामाणिकपणे, सच्चे पणाने आणि आत्मविश्वासने दिली होती. ज्याचं फळ तिला मिळालं.
आपणही जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक लोक आपल्याला भेटतात जी आपलं खच्चीकरण करायला पाहतात, आपला आत्मविश्वास घालवू पाहतात. पण जर आपण आपल्याशी ठाम राहिली, जसे आहोत तसे राहिलो तरी आपल्यावर त्यांच्या बोलण्याचा फारसा परिणाम होत नाही. आणि हीच आपली जीत असते. आपल्याला आपल्या क्षमता, आपण काय करू शकतो हे माहीत असल तर आपण दुसऱ्यांच्या बोलण्याने खाली पडत नाही. जर आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागलो, बदललो तर आपलं अस वेगळं अस अस्तित्वच राहणार नाही. म्हणून स्वतःशी एकनिष्ठ राहील, आपला स्व जागृत ठेवला तरी कोणी कसही वागल, आपल्याला जे सध्या करायचं आहे ते आपण करणार.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
