तुम्ही जे नाहीत, त्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या लोकांशी असं deal करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
अग तुला समजल का, नेहाला viva ला पैकीच्या पैकी मार्क आहेत. आपल्या सर्वांना १८,१७ आणि तिला मात्र २०. अस काय करते ग ती? ज्योती आणि प्रिया बोलत होत्या. नुकतीच त्यांची परीक्षा झाली होती व मार्क्स आले होते. वर्गात बोलण्यातून सर्वांना एकमेकांचे मार्क्स समजायचे. आणि त्यावरून बोलण देखील सुरू व्हायचं. कसे मला अजून चांगले मार्क्स पडले असते, कसं त्यावेळी माझा गोंधळ उडाला यावर मुल बोलायची. पण काही जणांच्या तोंडात मात्र एका व्यक्तीचं नाव हमखास असायचं. ती म्हणजे नेहा. वर्गात काहीही झालं आणि तिच्याबद्दल बोललं गेलं नाही अस व्हायचं नाही. वर्गातील सर्वच मुल काही तिच्याबद्दल बोलायची अस नाही. पण मधुच्या तोंडात तिचे नाव मात्र असायचे.
नेहाने स्वतः हुन स्वतःची जितकी ओळख वर्गाला, नवीन मुलांना करून दिली नसेल तेवढी मधूने करून दिली होती. आता देखील ज्योती आणि प्रिया जेव्हा मार्क्सबद्दल बोलत होत्या तेव्हा ती मागून येऊन बोलली, अग तिला असणारच २०मार्क्स. शिक्षकांची लाडकी आहे ना ती! त्यांच्या मागे मागे करून काहीतरी फायदा होणारच की! ज्योती आणि प्रिया याच वर्षी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वर्गातील कोणाबद्दल फारस माहीत नव्हत. त्यांना जे काही सांगितल जाईल त्याच नजरेने त्या सर्वांना पाहत होत्या.
आणि ते काम मधुने बरोबर केले होते. त्या आल्यापासून तिने नेहाबद्दल नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगितल्या होत्या. कशी ती शिक्षकांच्या नेहमी जवळ असते, तिच्या बाबतीत सर्व गोष्टी कश्या सोप्या करून दिल्या जातात.उदा.लायब्ररी मधून बुक मिळणे वैगरे, सरावासाठी प्रश्नपत्रिका मिळणे सर्व गोष्टी तिला मिळतात कारण ती शिक्षकांच्या गुड बुक्स मध्ये राहायचा प्रयत्न करते.
मुळात ती सामान्य स्टुडंट आहे. पण या सर्व गोष्टींमुळे तिला एक्स्ट्रा मार्क्स मिळतात अस मधुने सर्वांना सांगितल होत. त्याचबरोबर ती बाकीच्यांना कमी लेखते. म्हणून तर ती कोणाशी बोलतही नाही आणि मिक्स होत नाही. आता जी पहिल्यापासून वर्गात होती ती नेहाला ओळखत होती. पण जी मुल नवीन होती त्यांना याच सर्व गोष्टी खऱ्या वाटत होत्या. कारण त्यांची नजर तशी बनवण्यात आली होती. त्यांना तस भासवण्यात आल होत आणि नेहा मुळातच वर्गात लेक्चर व्यतिरिक्त जास्त थांबत नसल्याने तिला सुरुवातीला या गोष्टी समजत नव्हत्या आणि क्लिअर करायची संधी नव्हती.
पण हळू हळू तिला ह्या सर्व गोष्टी जाणवू लागल्या. ती वर्गात जात असताना काहीतरी कुजबूज करणे, टोमणे मारणे किंवा तिला पाहून नाराजी दाखवणे. तिला समजत नव्हत हे सर्व कश्यामुळे होत आहे. पण नंतर तिला तिच्या एका मैत्रिणीकडून समजलं की हे सर्व मधुने पसरवलं आहे. तिच्याबद्दल बाकीच्या मुलांची जी चुकीची मत झाली होती त्याच मुख्य कारण मधू होती. नेहा खरी कशी आहे हे समजण्याच्या आतच तिच्याबद्दल मधुने एक इमेज तयार केली होती व तशीच ठसवली होती.
मधु आणि नेहा पहिल्यापासून एकाच वर्गात होत्या. नेहाला मधुचा स्वभाव माहीत होता. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. कारण तिच्यासाठी तिचा अभ्यास महत्त्वाचा होता. तिने मधुला कधी तितकं महत्त्वच दिलं नाही. पण तिच्या दुर्लक्ष करण्याचा, गप्प बसण्याचा मधु असा फायदा उठवेल याची तिला कल्पना नव्हती. ती जी नाही त्याबद्दल अफवा पसरवल्या जात होत्या आणि याच नेहाला खूप वाईट वाटलं. कारण तिला माहीत होत मधु जसं सांगते तशी ती नाही.
खरी गोष्ट ही होती की नेहा खूप मेहनती आणि हुशार मुलगी होती. शिक्षकांशी तिचं बोलणं व्ह्यायच तेही अभ्यासाविषयीच. तिने कधी आपल्याला एस्ट्रा मार्क्स मिळावेत म्हणून कोणाच्या मागे मागे केल नाही. तिची मेहनत आणि अभ्यास पाहून ते मार्क्स दिले जायचे. तसच तिला कोणतही काम दिलं तरी ती जबाबदारीने करायची म्हणून ती शिक्षकांची विश्वासू होती. राहिला प्रश्न इतरांना कमी लेखण्याचा तर नेहा अंतर्मुख स्वभावाची होती.
मुळातच तिचे कमी मित्र मैत्रिणी होते. आणि लेक्चर चालू असताना किंवा झाल्यावर तिला गप्पा मारत बसणे, उगाच वेळ घालवणे पटत नसे. ती कॉलेजला लेक्चरपुरती येई आणि लगेच निघून जाई. याचाच फायदा मधुने घेतला आणि तिच्याबद्दल अफवा पसरवायला सुरुवात केली. तिला वाटलं नेहाला याबद्दल समजणार नाही. पण तिला समजलं. पण कोणाला जाब विचारणे, झालेल्या गोष्टींवर समोरासमोर बोलणे नेहाने अस कधी केल नसल्याने ती काही मधुशी बोलायला गेली नाही. तिला झाल्या गोष्टीचे वाईट जरूर वाटले पण स्वतःवर विश्वास देखील होता त्यामुळे तिने हा विषय सोडून दिला.
जेव्हा माणूस सरळमार्गी असतो, मेहनतीने काही करत असतो तेव्हा त्यावर, त्याच्या यशावर जळणाऱ्याची कमी नसते. आणि अशी लोक जागोजागी दिसतात. शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणावर. विनाकारण त्या व्यक्तीबद्दल अफवा पसरवल्या जातात आणि आपण कसे चांगले आहोत हे भासवल जात. पण आपण जे वागतोय त्याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होईल याची त्यांना काळजी नसते. तेवढी संवेदनशीलता त्यांच्यामध्ये नसते. आपल्याला पण असा अनुभव कधी ना कधी येतोच. कारण ही लोक सर्वत्र असतात. अश्या वेळी या लोकांशी कसं वागायचं हे बऱ्याचदा समजत नाही. आणि आपण फक्त त्रास करून घेतो. तर या अफवा पसरवणाऱ्या लोकांशी आपला जर रोजचा संबंध येत असेल तर त्यांच्याशी कसं deal करायचं हे पाहू.
१. कमजोर पडायचं नाही. बऱ्याचदा होत अस की आपल्या बद्दल इतकी नकारात्मकता पसरवली गेलेली असते की त्याचा आपल्यावर थोडा तरी का होईना प्रभाव पडतो आणि आपल्या वागण्यात ते दिसत. पण आपण आतून जरी दुखवलो असलो तरी त्या माणसासमोर दाखवून द्यायचं नाही. कारण अस करण त्याची जीत असणार आहे. आपण कोणालाही आपल्या सुखी किंवा दुःखी करायचा अधिकार द्यायचा नाही.
२. त्या माणसाला महत्व द्यायचं नाही. जेव्हा रस्त्यावरून हत्ती जात असतो तेव्हा रस्त्यावर कितीतरी कुत्रे भुंकत असतात. त्यामुळे हत्ती डगमगून गेला तर तिथेच राहील. हेच आपल्या बाबत लागू होत. आपण सरळ मार्गाने पुढे जात असताना अशी लोक येणारच आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण किती अस्थिर व्हायचं हे आपल्या हातात आहे.
३. पूर्णपणे गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आपलं गप्प बसणं समोरच्याला आपली कमजोरी वाटेल इतकं आपण गप्प बसू नये. योग्य ठिकाणी आपण आपली बाजू मांडली पाहिजे. त्या व्यक्तीला महत्त्व द्यायचा नाही याचा अर्थ त्याच्या वागण्याचा नको तितका त्रास करून घ्यायचा नाही. पण याचा अर्थ त्याचा वागणं सहन करायचं अस नाही. त्याच्या या वागण्याने तुमच्या विकासात अडथळे येत असतील तर त्याच्याशी ठामपणे एकदा बोला. ठाम बोलणे म्हणजे वाद घालणे नाही तर दोघांनीही एकमेकांची बाजू समजून घेणे. गोष्टी क्लिअर करून घेणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची बाजू घेऊन बोलणार नाही तुमच्या बाजूने कोणी बोलणार नाही.
४. आपल्याला सिद्ध करण्याचा, स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करू नका. बरेचदा अस होत की जेव्हा अश्या अफवा पसरवल्या जातात तेव्हा आपण विनाकारण आपण अशी व्यक्ती नाही हे दाखवायला आटोकाट प्रयत्न करतो. खरतर याची काही गरज नसते. विशेषतः अश्या माणसाला जी सर्व माहीत असून अस वागत आहे. तुम्ही जसे आहात तसच राहायचा प्रयत्न करा. एका टप्प्यानंतर लोकांना आपला खरेपणा दिसून येतो. तो आपण मुद्दाम सिद्ध करायची गरज नसते.
५. त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग ठेवू नका. आपल्याबद्दल कोणाही काहीही पसरवलं तरी आपण खरे कसे आहोत हे लोकांना समजतच. पण म्हणून त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग ठेवून आपली मानसिकता बिघडवण योग्य नाही. आपलं ध्येय काय आहे हे फक्त लक्षात ठेवा आणि त्या दृष्टीने या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत अश्या किती वाईट आहेत याचा विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं माफ करून टाका. समोरची व्यक्ती जसं वागते ते त्याच व्यक्तित्व आहे. आपण तसच वागलो तर काय फरक उरला? म्हणून आपला खरेपणा टिकवून ठेवा. तरच अश्या लोकांचा सामना करण सोपं जाईल.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
