Skip to content

तुम्ही बरोबर ला बरोबर आणि चूक ला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही अडाणी आहात.

तुम्ही बरोबर ला बरोबर आणि चूक ला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही अडाणी आहात.


मेराज बागवान


शिक्षण माणसाला सुज्ञ बनवते.सारासार विचार करण्याची क्षमता देते.चांगल्या-वाईटाची पारख करून देते.काय बरोबर आणि काय चूक हे शिक्षणामुळे समजते.एकंदरीत माणूस विचारी,प्रगल्भ बनतो.समाजात कसे वागावे, बोलावे याचे भान शिक्षण माणसाला देत असते.ही झाली शिक्षणाविषयीची पायाभूत संकल्पना. आजकाल शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. उचच शिक्षण घेण्याचे प्रमाण देखील वाढलेले दिसते.पण एवढे शिक्षण घेऊन देखील काही जणांना निर्णय घेण्याची क्षमता नसते. किंबहुना बरोबर आणि चूक ह्यातील फरक देखील अनेक सुशिक्षित लोकांना समजत नाही.आणि हेच जर का अनेकांना समजत नसेल तर ते शिकून देखील अडाणीच असतात.

जसे की ,कुटुंबात राहत असताना,अनेकदा घरातील स्त्रियांची घरातील सर्वांचे करत करत खूप दमछाक होते.प्रत्येक जण बिचारीला जणू कामालाच लावत असतो आणि गृहीत धरत असतो.कधी कधी तर सगळा बाहेरचा राग तिच्यावरच निघत असतो.कधी कोणी तिची विचारपूस करत नाही की तिला ‘थँक्स’ म्हणत नाही.आणि हा सगळा एक प्रकारचा तिच्यावर होत असलेला अन्याय च असतो.घरातील सगळे बाहेर जाऊन नोकरी करीत असतात,अगदी मोठे साहेब असतात.पण घरातील स्त्री चा सन्मान मात्र राखणे त्यांच्याकडून होत नाही.असे सर्वच नाही, पण बऱ्याच घरात दिसून येते.

आजकाल कामाचे तास वाढलेले आहेत.कामाचा व्याप आणि ताण दिवसेंदिवस वाढतोय.पैसा अमाप मिळतोय,पण मनःशांती नाही.कॉर्पोरेट क्षेत्रांत राहून व्यसनाधीनतेचे प्रमाण देखील वाढले आहे.मग याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे.नैराश्य,राग,एकाकिपणा यांसारख्या समस्या वाढत आहेत.तसेच यामुळे घरातील वातावरण बिघडते आहे.कामाचा राग घरातील व्यक्तींवर निघतो आहे.मग यातून कौटुंबिक हिंसाचार वाढत आहे.अगदी सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित स्त्री-पुरुष यातून जात आहेत.फक्त स्त्रियांवरच हिंसाचार होत आहे असे नाही.तर,पुरुषांवर देखील खून,अत्याचार अशा गोष्टी होत आहेत. मग हे सर्व होत असताना,तुमचे शिक्षण कुठे जाते? काय बरोबर काय चूक? काय चांगलं काय वाईट? हे कोणी समजून घेतच नाही.आणि मग ते शिक्षण फक्त एक ‘कागदाचा तुकडा’ बनून राहते.

नातेसंबंधांमध्ये देखील अनेक सुशिक्षित जोडपे अगदी टोक च गाठतात.काही वाद झाले की सामंजस्याने सोडविण्याऐवजी एकमेकांवर दोषारोप केले जातात.माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे ह्याचा ‘क्वॉमनसेन्स’ देखील दोघांपैकी एकाकडे सुद्धा दिसून येत नाही.आणि मग ते नाते तुटते.आजकाल सुशिक्षित जोडप्यांचे घटस्फोट होण्याचे कारण देखील हेच आहे.मग आपण एवढे शिकून कसे जीवन जगायचे हे समजू शकत नसू तर मग अडाणी माणसच बरी. नाही का? भांडण करत करत का होईना ,कसे का होईना, शेवटपर्यंत एकमेकांशी एकनिष्ट राहून ,एकमेकांची साथ देत असतात.

कार्यालयीन जीवनात देखील लोक एकमेकांशी असभय भाषेत बोलत असतात. अगदी शिव्या ,अपशब्द देखील वापरत असतात.सामाजिक जीवनात देखील ,नियम पाळणे सुशिक्षित माणसाला नको वाटत असते.जो तो आपली मनमानी करायला बघत असतो.जे लोक गरीब आहेत,हलाखीत जीवन जगत आहेत त्यांना आधार पटकन कोणी देत आहे. उलट तो माणूस ‘व्यसनीच असेल’,’चोऱ्या करणारा असेल’ अशी ‘लेबल्स’ देखील अनेक शिकलेले लोक लावतात.त्यांचं शिक्षण त्यांना सर्वप्रथम नकारात्मक विचार च करायला लावतं. स्त्रियांना सन्मान द्यावा,त्यांचा आदर करावा हे तर ‘सो कॉल्ड शिकलेल्या’ लोकांना देखील समजत नाही.उलट,स्त्री त्यांच्या चेष्टेचा विषय असतात.महिला बॉस असेल तर तिचं काम ऐकणं अनेकांना कमीपणाच वाटतं.

अशी ही आपली सामाजिक व्यवस्था आणि सुशिक्षित लोकांची मानसिकता. सगळेच नाही,परंतु असे अनेक महाभाग आहेत ज्यांना आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करता येत नाही.त्यांच्याकडे डिग्रीचा कागदाचा तुकडा असतो. पण माणूसपण नसते.गरजूंना मदत करणे,त्यांचा आधार बनणे हे तर त्यांच्या गावीच नसते.’मी,माझी नोकरी,माझं करिअर’ ह्यातच त्यांचे विश्व सामावलेले असते.खरे शिक्षण हे नव्हते.

खरे शिक्षण ते असते जे माणसाला शहाणपण देते.चांगल्या वाईटची पारख करायला शिकवते. काय बरोबर आणि काय चूक हे जो माणूस खंबीरपणे सांगू शकतो तो खरा शिकलेला माणूस.शिक्षण हे धारधार शस्त्र आहे.जे विना कोणत्या हत्याराचा आधार घेत समाजात क्रांती करीत असते. ह्या लेखाच्या निमित्ताने सुशिक्षित, उच्च विद्याविभूषित मित्र-मैत्रिणींना इतकेच सांगायचे आहे की ,खूप शिका,मोठे व्हा,पण स्वतःच्या शिक्षणाचा वापर स्वतःसाठी करता करता समजुपयोगी,विधायक गोष्टींसाठी करा,स्वतःच्या कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी करा.आणि हे जर प्रत्येक सुशिक्षित व्यक्ती करू शकला ,तर सर्वत्र सुख,शांती,स्थैर नांदेल.आणि हेच तुमच्या शिक्षणाचे यश असेल.

जो माणूस सुशिक्षित असतो तो खूप जबाबदार समजला जातो.म्हणूनच एक जबाबदार ,समंजस व्यक्ती होण्याचा जरूर प्रयत्न करा. स्वतःला एक मानसिक शांतता लाभेल.

काळजी घ्या!


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुम्ही बरोबर ला बरोबर आणि चूक ला चूक म्हणू शकत नसाल तर तुम्ही अडाणी आहात.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *