तुमच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करून वेळ वाया घालवू नका.
हर्षदा पिंपळे
इतरांसाठी स्वतःला सिद्ध करण्यात वारंवार वेळ वाया घालवताय …?
तर हा लेख तुमच्यासाठीच…!
आपण अशा ठिकाणी वास्तव्य करतो जिथे सगळ्या दिशेला माणसांचीच गर्दी आहे.माणसं नाही असं ठिकाण नाही. इतकच नाही तर आपल्या आचार-विचारांमध्येही माणसांचा वावर हा असतोच.आणि सभोवताली माणसं आली म्हणजे संवाद हा आलाच.त्यात प्रत्येकाचा निरनिराळा स्वभाव.सगळ्यांचच एकमेकांशी गोडीगुलाबीने पटतच असं नाही.
कितीतरी लोकांच एकमेकांशी मुळीच पटत नाही. त्यात काही लोकं सतत दुसऱ्याला पाण्यात पाहणारे असतात. त्यांना दुसऱ्यांच चांगलही पाहवत नाही.आणि काही लोकं तर थेट इतरांच्या क्षमतेवरच शंका घेतात.एखाद्याला एखादी गोष्ट जमूही शकते यावर ते विश्वासच ठेवत नाहीत. एखाद्या व्यक्तीला थेट जज करणं यांना सहज जमतं.
एखाद्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचा खरच आपल्याला अधिकार आहे का…?मुळातच इतरांच्या क्षमतेवर शंका घेण्याआधी स्वतःमध्ये तेवढी क्षमता आहे का..? या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. आणि ज्या की अजिबात विचारात घेतल्या जात नाहीत. काही लोकं सरळ सरळ आपल्या क्षमतांवर संशय घेत असतात.
आपल्या क्षमतांवर संशय घेणारे हे कोण…?
खरं तर आपल्या क्षमता आपल्याला माहीत असतात. आपल्यातील क्षमतांची जाणीव कळत नकळतपणे आपल्याला हळुहळू होत असते.आणि एखाद्याला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देण्याचा अधिकार आपल्याला असतो परंतु एखाद्याच्या क्षमतेवर शंका घेण्याचा अधिकार मात्र आपल्याला नसतो.अनेकदा लोकं आपल्या क्षमतांवर शंका घेत राहतात आणि आपण त्या गोष्टीचा खूप विचार करत राहतो.इतका विचार करतो की केवळ त्या लोकांसाठी आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागतो.वारंवार ही लोकं शंका घेत राहतात आणि आपण वारंवार आपला वेळ स्वतःला सिद्ध करण्यात घालवतो.
मित्रांनो,स्वतःला सिद्ध करणं वाईट आहे असं अजिबात नाही. स्वतःला सिद्ध करणं ही अत्यंत चांगली बाब आहे. पण आपण स्वतःला का आणि कोणासाठी सिद्ध करतोय हेही तितकच महत्त्वाच आहे. स्वतःला सिद्ध करायच असेल तर स्वतःच्या नजरेत सिद्ध करा.केवळ इतर लोकं आपल्या क्षमतांवर शंका घेतात म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मागे लागू नका.आपला वेळ त्यातच घालवू नका. आयुष्यात करण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत याचं भान ठेवा.
एखाद्याने तुमच्या चित्रकलेवर संशय घेतला तर ती कला त्या त्या माणसासाठी सिद्ध करून स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करू नका.एक गोष्ट सिद्ध करता करता हातातून दुसरी गोष्ट केव्हा निसटून जाईल कळणारही नाही.
म्हणून जेव्हा कुणी आपल्या क्षमतांवर शंका घेत असेल तर काही गोष्टींचा विचार अवश्य करा.याने आपण खरच काय करतोय आणि काय नाही हे आपल्या लक्षात येईल.
मित्रांनो, आयुष्यात एक एक क्षण महत्त्वाचा असतो.परंतु आजुबाजुला असणाऱ्या अशा लोकांचा आपण विचार करत राहिलो तर आपला अमूल्य वेळ यामुळे वाया जात असतो हे आपण विसरतो.त्याच वेळात इतर दुसऱ्या गोष्टीही करायच्या राहून जातात.
इतरांसाठी स्वतःला सिद्ध करून दाखवण्यात खरं तर काहीच अर्थ नाही. इतरांसाठी स्वतःला सिद्ध करून काय मिळणार ? समाधान/आनंद/सुख…?आणि सतत इतरांसाठी स्वतःला सिद्ध करत राहिलो तर स्वतःमधील कितीतरी गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो याची आपल्याला कल्पनाही नसते.
सो…स्वतःसाठी काय गरजेचं आहे याचा विचार करून आयुष्य जगा.स्वतःच्या नजरेत यशस्वी बनण्याचा प्रयत्न करा.इतरांसाठी स्वतःचा वेळ वाया घालवू नका.आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्यात कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला साध्य करायच्या आहेत. सो त्या गोष्टी साध्य करण्यासाठी पुढे जाणं महत्त्वाच आहे. तुमच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करून वेळ वाया घालवत राहिलात तर आयुष्यातील कितीतरी गोष्टी या अपूर्णच राहतील.
So…think about it and go ahead.आयुष्यातील कितीतरी सुंदर गोष्टी तुमच्या प्रतिक्षेत आहेत.किमान त्यांना साध्य करण्यासाठी तरी अशा लोकांसमोर स्वतःचा अमूल्य वेळ खर्च करू नका. स्वतःच्या क्षमतांवर स्वतः विश्वास ठेवून पुढे जायचा प्रयत्न करा.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
