तुमच्या जवळची लोक तुम्हाला चुकीची वागवत आहेत हे कसं ओळखाल?
अपर्णा कुलकर्णी
निशा, ऋतुजा,अभय आणि चेतन ही चांडाळ चौकडी कुठेही एकत्रित असायची. अगदी कोणतीही गोष्ट करताना चौघांनी एकमेकांचा हात कधीच सोडला नाही. याचे चौकुट सगळ्या कॉलेजविश्वात खूप फेमस आणि मैत्रीसाठीच काय तर माणुसकीसाठी पण नावाजलेले होते. हे चौघांचे पण लास्ट इयर असल्यामुळे आहे तितका वेळ जास्तीत जास्त एकत्र घालवायचा आणि खूप आठवणी गोळा करायच्या असे ठरले होते.
निशा आणि ऋतुजा हॉस्टेलवर रहात होत्या तर अभय आणि चेतन यांची घरे लांब असली तरीही त्या अंतराने त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नव्हता. पण निशा आणि ऋतुजाला मात्र हे वर्ष संपल्यावर सगळ्यांना सोडून जाणे खूप त्रासदायक वाटत होते. त्यामुळे अभय आणि चेतन मात्र कॉलेज संपल्यावर लगेच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते जेणेकरून पुढेही सगळेच एकत्रित राहतील.
एकदा चेतनला कॉलेजमधील एक मित्र म्हणाला, मला निशा खूप आवडते. तुमची चांगली मैत्री आहे तर तू तिच्यासोबत माझी भेट घडवून आण. त्यावर चेतन तयार झाला आणि त्याने निशाला मला भेटायला ये असे सांगून कॉलेजच्या लायब्ररी बाहेर निशावर प्रेम करणाऱ्या नीरजची आणि तिची भेट घडवून आणली.
पण नीरज मात्र एक नंबरचा वाया गेलेला मुलगा होता. निशाचा कॉलेजमध्ये पहिलाच दिवस असताना नीरजने निशाची छेड काढली होती आणि हे चेतनला माहीत असूनही त्याने नीरजची मदत करून निशा आणि पर्यायाने सगळ्यांचाच विश्वासघात केला होता.
निशाने चेतन ऐवजी नीरजला पाहताच तिला राग अनावर झाला आणि नीरजने तिचा हात पकडल्यावर तिने सरळ त्याला थोबाडीत ठेवून दिली. चेतनच्या या वागण्यावर ऋतुजा,अभय आणि सगळ्यात जास्त निशा खूप दुखावली गेली होती. सगळ्या गोष्टींची कल्पना असतानाही चेतनने असे वागावे याचेच निशाला खूप जास्त वाईट वाटले होते. यावर निशा त्याच्याशी बोलणे कायमचे बंद करून टाकणार होती पण अभयने तिची समजूत काढली आणि तसे न करता तिच्याच वागण्यातून त्याची चूक कशी दाखवून देता येईल हे दाखवून दिले.
निशाला हे समजले आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवसापासून निशा सोबतच ऋतुजा आणि अभयने चेतन सोबत तेवढ्या पुरते तेवढे बोलण्यास सुरुवात केली. बऱ्याच गोष्टीत चेतनला दुर्लक्ष करू लागले. अभ्यास करताना, लायब्ररीत जाताना, फिरायला जाताना, मजा मस्ती करताना, पार्टी करताना प्रत्येक ठिकाणी चेतनला घेऊन तर जात होते पण कोणीच त्याच्याशी नेहेमीप्रमाणे मिळून मिसळून वागत नव्हते. हळू हळू मित्रांच्या वागण्यातील बदल चेतनच्या लक्षात येत होता आणि त्याचे कारणही चांगलेच समजत होते.
म्हणूनच त्याने सगळ्या कॉलेज समोर निशा आणि सगळ्याच ग्रुपची मनापासून माफी मागितली, तुम्हीच माझी फॅमिली आहात, सगळ्यात जवळचे आहात आणि तुम्ही दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. म्हणूनच इथून पुढे कधीही असे न वागण्याचे वचन निशा, ऋतुजा आणि अभय तुम्हा सगळ्यांना देत आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी त्याला झालेला पाचात्तप सगळ्यांना दिसून येत होता त्यामुळे सगळ्यांनीच त्याला एक संधी देण्याचे ठरवले आणि मग पुन्हा चौघांचे चौकुट एकत्रित आले.
मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या हातून अनेक चुका होतात. काही कळत होतात तर काही नकळत. त्यामुळे चुकीची जाणीव करून देण्यासाठी बऱ्याचवेळा आपल्याच लोकांकडून खूप चुकीची वागणूक मिळते आणि त्याचाच जास्त त्रास होतो. कधी कधी आपली चूक नसतानाही आपल्याला दुर्लक्षित केले जाते, परक्यासारखे वागवले जाते आणि खूप अपराधी भावना निर्माण करून दिली जाते. जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल, सतत परक्यासारखे वागवले जात असेल तर ओळखून घ्या की तुमच्या जवळची लोक तुम्हाला चुकीची वागवत आहेत.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

