Skip to content

तुमच्या वागण्याने इतरांची आंतरिक मानसिक शांतता भंग होऊ देऊ नका. 

तुमच्या वागण्याने इतरांची आंतरिक मानसिक शांतता भंग होऊ देऊ नका.


हर्षदा पिंपळे


[“माझी यात काही चुक नाही. मला घराबाहेर काढू नका.मला मारू नका.तुम्ही सांगाल तसच मी करेल.पण मला घराबाहेर काढू नका. माझ्या घरच्यांना बघवणार नाही हे सगळं.प्लीझ्….” अशी विनवण्या मंजु तिच्या सासरच्यांना करत होती.त्यावर सासूने तिला सचनावलं… “अगं तुझी लायकी तरी आहे का आमच्या घरात रहायची?जोपर्यंत नीट वागत नाहीस तोपर्यंत तुला घरातच काय दारात पण उभं करणार नाही. चल ,निघ इथून…” मंजुच्या विनवण्या काही फळाला आल्या नाही. तिचे सासरचे तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते.आणि हे रोजचच झालं होतं.चांगल्या सुसंस्कृत सोसायटीमध्ये राहणारी ही लोकं अशी का वागतात हेच मंजुला कळत नव्हतं.तिलाही रोजच्या भांडणाचा कंटाळा आला होता. रोज यांच्या घरात भांडणं व्हायची. त्यामुळे सोसायटीतील लोकं अक्षरशः चिडली होती.

मंजुचा आणि तिच्या सासरच्यांचा स्वभाव सोसायटीत सगळ्यांनाच माहीत होता. मंजु साधी आणि सरळ मुलगी होती तर तिचा नवरा,सासू सासरे तिच्या साधेपणाचा फायदा घेऊन नेहमी तिला त्रास द्यायचे. सोसायटीने त्याबाबत अनेकदा कम्प्लेंटदेखील केली होती.पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. दिवसेंदिवस मंजुच्या सासरच्यांच वागणं त्रासदायकच होत होतं.सोसायटीतील सगळ्यांना याचा प्रचंड त्रास होत होता.त्यांना थोडी म्हणून शांतता मिळत नव्हती.त्यांची मानसिक शांतता कुठेतरी लोप पावत चालली होती.शेवटी त्यांनी मंजुलाच इथून निघून जाण्याची रिक्वेस्ट केली. आणि मंजुलाही तेच योग्य वाटलं.

मंजु सोसायटीच्या लोकांसाठी, त्यांच्या शांततेसाठी कायमची माहेरी निघून गेली.मंजु निघून गेल्याचा आनंद सासरची लोकं साजरी करत बसली होती. पण कटकट वगैरे सगळं थांबलं होतं.मंजुला लोकांच्या आयुष्याची जास्त काळजी होती म्हणून तीने तो जाण्याचा निर्णय स्वीकारला. सोसायटीत मानसिक शांतता नव्याने आली होती.]

या गोष्टीसारखच आपल्या आयुष्यात असे शांतता भंग करणारे विविध प्रसंग घडत असतात. कधी लोकांमुळे आपली शांतता हरवते तर कधी आपणही लोकांची शांतता कळत नकळतपणे भंग करत असतो.

तर वाचकहो,

गढूळ वातावरणात रहायला कुणाला आवडतं ?

प्रत्येकालाच चांगल्या सकारात्मक वातावरणात,जिथे आंतरिक, मानसिक शांतता असेल अशा वातावरणात रहायला आवडतं.गढूळ आणि नकारात्मक वातावरणात रहायला सहसा कुणालाही आवडत नाही.त्यामुळे प्रत्येकजण आनंदी, सकारात्मक वातावरणात रहायचा प्रयत्न करतो.

आता हे आजुबाजूला असणारं वातावरण सकारात्मक असतं ते आपल्या वागण्यामुळे. आपण ज्याप्रकारे वागतो,बोलतो त्यावर आजुबाजूला असणाऱ्या वातावरणाची सकारात्मकता, नकारात्मकता ठरत असते.आपलं वागणं हे नेहमीच चांगलं असणं गरजेचं असतं.इतरांना त्रास होईल, इतरांची आंतरिक मानसिक शांतता आपल्या वागण्यामुळे भंग होईल असं आपलं वागणं असता कामा नये.आपण कधी कधी कसेही वागतो,बोलतो.अनेकदा तर वेळ ,काळ ,ठिकाण या गोष्टीही आपण पाहत नाही.

भान सोडून मनाला वाटेल तसं बोलत राहतो.नको त्या ठिकाणी मोठमोठ्याने भांडत राहतो.वेगवेगळ्या शिव्या देणं,मारामारी करणं ,आदळआपट करणं अशा अनेक गोष्टी आपण करत राहतो. पण त्यावेळी आपण हा विचार करत नाही की आपल्या या अशा वागण्यामुळे काय काय होऊ शकतं? आपल्यामुळे इतरांना काय त्रास होऊ शकतो?आपल्यामुळे इतरांची आंतरिक मानसिक शांतता भंग होऊ शकते याचा आपण विचारच करत नाही.

अयोग्य शब्द,आवाजाची उंची यामुळे इतरांच्या मनावर,मानसिकतेवर वाईट परिणाम होत असतो.त्यांची आंतरिक शांतता यामुळेच भंग पावत असते.त्यामुळेच इतरांची आंतरिक मानसिक शांतता ही आपल्यावरही अवलंबून असते.आपलं वागणं जर त्रासदायक असेल तर ते त्वरीत बदलणं आपलं काम आहे.कुठलीही शांतता हवी असेल तर त्याआधी आंतरिक मानसिक शांतता असणे आवश्यक असते.ज्यावेळेस आंतरिक शांतता भंग होते तेव्हा आयुष्य जगणं अवघड होत जातं.आयुष्याचा समतोल अशावेळेस बिघडत जातो.आणि ते हानिकारक आहे.

म्हणूनच आपल्या वागण्या बोलण्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवा.इतरांना त्रास होईल असं वर्तन करणं अवश्य टाळा.इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही ही जबाबदारी आपलीच असते.

सो…..

Live and let live…(unknown) हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *