Skip to content

त्रासदायक अपेक्षा न ठेवता एक दिलखुलास आनंदी आयुष्य कसे जगावे??

त्रासदायक अपेक्षा न ठेवता एक दिलखुलास आनंदी आयुष्य कसे जगावे??


अपर्णा कुलकर्णी


वनिता ताई नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी फिरायला बाहेर पडल्या आणि त्यांच्या नेहमीच्या निवांत जागी आल्या. ही जागा जरा शहारापासून लांब अंतरावर होती पण खूप प्रसन्न आणि शांत होती. आजूबाजूला हिरवागार निसर्ग,डोंगरदऱ्या आणि त्यात एक जुने प्राचीन महादेवाचे मंदिर. लोक मंदिरात दर्शनासाठी येत पण त्यामुळे शांतता भंग होत नसे उलट सतत होणारा घंटानाद मन प्रसन्न करून जात असे.

वनिता ताई रोजच्याप्रमाणे आजही बाकड्यावर निवांत बसून शांतता अनुभवत होत्या. त्यांच्या शेजारच्या बाकड्यावर एक मुलगी बसली होती. गळ्यातले मंगळसूत्र दातात दाबत ती मंदिराकडे बघत होती. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली पण त्यावरील नाव बघून तिने सरळ मोबाईल बंद केला आणि तशीच बसून राहिली.

तिच्या चेहऱ्यावरून ती खूप वैतागली आहे हे जाणवले होते वनिता ताईना पण त्या काहीच बोलल्या नाहीत कारण असे अनोळखी असताना एखाद्याला उठून काहीतरी सांगणे त्या मुलीला आवडेल की नाही याच विचाराने त्या तिथेच थांबल्या.

दुसऱ्या दिवशी वनिता ताईनी पुन्हा त्याच मुलीला पाहिले. आज ती कालपेक्षा जास्तच त्रासलेली वाटली. वनिता ताई दर्शनासाठी निघून गेल्या आणि दर्शन घेऊन बाहेर आल्या तेंव्हा त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडणार इतक्यात कोणीतरी त्यांना सावरले.त्यांनी वर पहिले तर ती हीच मुलगी होती जी त्यांना त्रासलेली वाटली होती.

तुम्ही ठीक आहात ना आजी ?? तुम्हाला लागलं तर नाही ना ?? तिने विचारले. तसे वनिता ताई म्हणाल्या, तू सावरलंसना मला मग मला कसे काय होईल ?? आजीच्या या उत्तराने त्या मुलीच्या चेहऱ्यावर गोड हसू आले. किती छान दिसतेस ग हसल्यावर ?? वनिता ताई म्हणाल्या. तसे तिचा चेहरा पुन्हा कोमेजला.

वनिता ताई बाकड्यावर बसत म्हणाल्या, ये ना जरा वेळ असेल तर बोलूया. ती बसली तेंव्हा त्यांनी विचारले नाव काय आहे तुझे आणि घर कुठे आहे तुझे ?? ती मुलगी म्हणाली, मी नित्या. नित्या देशमुख. माज घर फार लांब नाही दहा मिनिटांच्या अंतरावर आहे इथून. तेवढ्यात नित्याचा फोन वाजला आणि आजही तिने फोन न उचलता कट केला.

वनिता ताई म्हणाल्या,पोरी तू माझ्या नातीसारखी आहेस मला. तुझी हरकत नसेल तर तुला काय अडचण आहे ते मला संगाशिल ?? त्यावर उपाय देता येईल की नाही माहीत नाही मला पण तुला बोलून हलकं वाटेल हे नक्की.

तशी नित्या रडायला लागली, वनिता ताई तिच्या पाठीवरून हात फिरवत तिचे सांत्वन करत होत्या. थोड्या वेळाने नित्या जरा शांत झाली तेंव्हा वनिता ताईनी त्यांच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढून तिला दिली आणि म्हणाल्या काय झाले सांगतेस का आता ?? आजी माज लग्न होऊन दोन वर्षे झाली.

माझा प्रेम विवाह झाला आहे. निनाद लग्नाच्या आधी खूप वेगळा वाटत होता पण लग्न झाल्यावर टिपिकल नवऱ्यासारखा वागायला लागला आहे. त्याच्या घरचे चांगले उच्चशिक्षित आहेत पण अलीकडे त्यांच्याशी पण सतत वाद होत आहेत.

म्हणजे नक्की काय कशावरून वाद होत आहेत नित्या ?? वनिता ताईंनी विचारले. नित्या बोलायला लागली, मी रोज ऑफिसला जाते, कधी कधी मला उठायला उशीर होतो त्यामुळे कामे तशीच राहतात. मग मला वाटते माझ्या सासूबाईंनी मला मदत करावी, पण त्या काहीच करत नाहीत.

निनाद मला ऑफिसमध्ये सोडत नाही कारण त्याला उलट सुलट होते म्हणून तुझ तू जा असे म्हणतो. हेच लग्नाआधी मात्र रोज मला ऑफिसमध्ये भेटायला येत होता आणि म्हणत होता तुझ्या शिवाय एक क्षण राहू वाटत नाही मला.

पण आता माझे बोलणे पण त्रासदायक झाले आहे त्याच्यासाठी. मी सासूबाई बद्दल काही बोलायला गेले की मलाच म्हणतो, तुझे बोलून तोंड दुखत नाही का नित्या ??

कधी काही दुखत खुपत असले तरीही मीच उठून सगळी कामे करते . सासरे फक्त खुर्चीत बसून सगळे बघत बसतात पण कधीच कोणाला काही बोलत नाहीत. इतके सगळे करून मलाही थकून जायला होते त्यामुळे रात्री पटकन झोपण्याची इच्छा होते तर निनाद म्हणतो कधीही तुझ्या जवळ यावं म्हटलं तर तुझ्या चेहऱ्यावर बाराच वाजलेले असतात.

कधीच उत्साही नसतेस तू. मला सांगा आजी दिवसभर घरातली आणि ऑफिसची कामे करून मला कसा उत्साह राहील ?? त्यानेही जरा समजून घ्यायला हवे ना ?? त्यात सासूबाईंना वाटते आता लग्नाला दोन वर्षे झाली त्यामुळे घरात पाळणा हलयला हवा. आधीच माझी इतकी धावपळ होते आहे, सासूबाई कसलीही मदत करत नाहीत आणि त्यात अजून एका जीवाची जबाबदारी कुठे घेऊ ?? मला काहीच समजेना झालं आहे असे म्हणून दोन्ही हात तोंडाला लावून नित्या रडायला लागली.

तेंव्हा वनिता ताई म्हणाल्या, नित्या जरा शांत हो. पण तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का ?? तू जे काही म्हणत आहेस ते एका दृष्टीने बरोबर आहे. पण या सगळ्यांचा तुला इतका त्रास का होतो माहीत आहे ?? कारण तू त्रास करून घेतेस आणि हा त्रास तुझ्या अपेक्षेतून निर्माण होत आहे बाळा.

म्हणजे मला नाही समजले नित्या डोळे पुसत म्हणाली. अग म्हणजे असं की तुला वाटत की सासूने कामात मदत करावी, सासर्याने बघत बसण्यापेक्षा काही बोलावे, नवऱ्याने तुला समजून घ्यावे, तुझे म्हणणे ऐकावे बरोबर ??आजीनी विचारले. हो बरोबर नित्या म्हणाली. पण मला वाटणं चुकीचं आहे का आजी नित्याने विचारले. नाही अजिबातच नाही.

पण अपेक्षा केल्यावर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचा तुझ्या इतका त्रास दुसऱ्या कोणालाही होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी अपेक्षा करण सोड. जरा शांत रहा. जॉब आणि घरकाम यांची धावपळ होत असेल तर तुझ्या पगारातून घरकामाला बाई लाव.

सगळ्यात महत्त्वाचं आई होण्याचा विचार कर. घरात मुल खेळायला लागलं की सगळ्या गोष्टी बदलून जातील. सासूबाई तुझ्यासाठी नाही पण बाळासाठी उठून कामाला लागतील आणि नाहीच लागल्या तर काही दिवस घरात बसून काम कर आणि नंतर मुलाला पाळणा घरात ठेवून नोकरी कर. पण उगाच कोणाकडूनही अपेक्षा ठेवून अपेक्षा भंगाच दुःख करत बसू नकोस.

जे आहे त्याचा हसत खेळत स्वीकार कर. तुला जितके जमेल जसे जमेल तसे काम करत रहा.त्रासदायक अपेक्षा न ठेवता आनंदी आयुष्य कसे जगता येईल याचा विचार कर. आजीचे बोलणे ऐकून नित्याचे दुःख कमी झाले नाही पण जगण्याची वेगळी दिशा नक्कीच मिळाली. निनादचा सतत येणारा फोन कट न करता तिने तो उचलला आणि त्याच्याशी नीट बोलली. यावरूनच वनिता ताईना समजायचे ते समजले होते.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!