त्रास दिलेल्या लोकांना माफ न करणारी माणसं सुद्धा समाधानी नसतात.
मयुरी महाजन
मन, म्हटले तर खूप विशाल, आणि म्हटले तर खूपच लहान असते, परंतु काही वेळेस ते ईतके नाजूक आणि काही वेळेस खूप कठोर व मजबूतही असते, एकदा शरीराला झालेली वेदना ही माणूस विसरूनही जातो, पण ज्या गोष्टी त्याच्या इवल्याच्या मनाला लागलेल्या असतात, त्या तो कधीही विसरू शकत नाही, कारण माणसाचं आपल्या मनाशी अतिशय जवळचं आणि जिव्हाळ्याचं नातं असतं ,
कळत नकळत बरीच माणसं त्रास देऊन जातात, खरं तर माणूस म्हणून आपण जन्माला आलो, तर कुठेतरी असं वाटतं की आपण आपल्या एकमेकांचा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न करायला हवा, आपल्या त्रासाचे वाटेकरी हजारो असले ,तरी आपण मात्र कुणाच्याही त्रासाचे वाटेकरी होऊ नये ,असं मनापासून वाटतं,
मी आवर्जून विषय मांडेल ,माईंचा सिंधुताई सपकाळ स्वतःच्या खऱ्या आयुष्यात कितीतरी वेदना , असह्य दुःख व पराकोटीचा संघर्ष ,यातून जर माईंनी आपले आयुष्य जगले नसते, तर सिंधुताई असणारी व्यक्ती हि माईंच्या रूपात लाखो अनाथांना भेटल्याच नसत्या,
माईंच्या एका भाषणात माई म्हणतात, मी आयुष्यामध्ये जर सर्वात मोठे आणि महत्त्वाचं काम जर काही केलं असेल, तर ते हेच की ज्या नवऱ्याने संशय घेऊन घरातून गर्भवती असताना हाकलून गोठ्यात ठेवले, घरच्यांनीही त्याला विरोध केला नाही ,माहेरच्यांनीही आसरा दिला नाही ,अशा परिस्थितीला सामोरे जाऊन माईंनी आपले आयुष्य घडवलं ,व तरीही खूप मोठ्या मनाने माई सांगतात की माझ्या आयुष्यात जर काही चांगलं काम केलं असेल, तर ते मी माझ्या पतीला व ज्यांच्यामुळे त्यांना त्रास झाला ,त्यांना सर्वांना मी माफ केलं ,कारण त्यांनी मला सोडले नसते, तर अनाथांचे हाल जवळून कळले नसते, त्यांनी सोडले नसते, तर हजारो अनाथांची आई होण्याचे भाग्य लाभले नसते, अनाथांच्या अश्रूंची किंमत कळाली, जेव्हा घराची कवाडे माझ्यासाठी बंद झाली….
खरंतर खूप कठीण आहे, आपल्याला त्रास दिलेला व्यक्तींना माफ करणे, परंतु माईंचा विषय आपल्या समोरच एक ज्वलंत व जिवंत उदाहरण आहे, जे आपल्याला आपल्या खऱ्या समाधानाची जाणीव करून देणार आहे, आपल्या चुकीला माफी मागणं आणि कुणी चुकलं तर त्याला माफ करणे, यासाठी खूप मोठे मन असावं लागतं ,माईंना हे माहिती होतं ,जर आपण यांना माफ केले नाही ,तर आयुष्यभर आपल्याला हीच खंत राहीलं, की आपण आज ज्या त्रासातून आलोय ,त्याला फक्त हिच माणसं जबाबदार होती
या उलट त्यांनी त्या परिस्थितीचे फासे पलटून टाकलेत ,व नव्या ताकदीने आपलेच एक जग निर्माण केले, वेळेने ते दाखवूनही दिले, पण माई म्हणतात प्रवासा कुणाचाचं सोपा नसतो, फक्त आपल्यावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा सोहळा करता यायला हवा ,भविष्याचे फासे पलटतात, फक्त आपल्याकडे जिद्द हवी, त्या प्रत्येक फास्याला तोंड देण्याची ,
“जे का रंगले ,गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणवा,”
गौतम बुद्धांची एक कथा जी आमच्या मॅडमनी आम्हाला सांगितली, ती सांगावीशी वाटते, की गौतम बुद्धांच्या एकाग्रतेला व त्यांच्या साधनेला बघणारी माणसे ही त्यांच्या साधनेत खंड पाडण्यासाठी कितीतरी प्रयत्न करायचे, त्यांच्यासमोर बायकांना नृत्य करायला सांगून आणि अजून काय काय, परंतु त्यांचा स्वतःवर व आपल्या साधने ते इतके गर्क असायचे की त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नसे, शेवटी जेव्हा गौतम बुद्ध भिक्षा मागायला निघालेत, तर वाटते एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर ती थुंकले, तरीही गौतम बुद्ध कुठलीही प्रतिक्रिया न देता ते पुसून ते निघून गेले, ती व्यक्ती स्वतःच विचार करायला लागली अरे मी थुंकुनही ही व्यक्ती इतकी शांत कशी राहू शकते ,शेवटी त्या व्यक्तीने विचारले ,स्वामी मी चुकलो, परंतु आपण मात्र काहीही बोलले नाहीत ,
तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात ,तू थूंकलास कारण तुला ते योग्य वाटलं, मी बोललो नाही, कारण मला ते योग्य वाटलं ,आपल्यावर झालेले संस्कार आपल्यातील खरी शालिनीता सांगतात,
कदाचित आजच्या घडीला गौतम बुद्धांची कथा आपल्यासारख्यांच्या पचणी पडण्यासारखी नसेलही, परंतु आत्तापर्यंत आपण ज्या काही लोकांविषयी मनात त्रास साठवून ठेवलेला आहे, त्याला घालवण्यासाठी स्वतःसाठी एक प्रयत्न नक्कीच करू शकतो, व समाधानाने आपले आयुष्य जगू शकतो,
याने मला त्रास दिला, त्यांनी मला त्रास दिला, असं करून करून आपणच आपला त्रास वाढवून ठेवलेला असतो ,त्यामुळे त्रास दिलेल्या लोकांना माफ न करणारी माणसं सुद्धा समाधानी नसतात ,जर आपल्याला आपले खरे समाधान अनुभवायचे असेल तर आपल्या स्वतःसाठी आपण एक प्रयत्न नक्की करू या….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
