‘तिने’ आकाशाला गवसणी तर घातली आहे, पण आजही ‘ती’ हुंदके देत आहे.
मेराज बागवान
‘ती’,म्हणजे स्त्री.आज स्त्री कोणत्या क्षेत्रात नाही? पूर्वी फक्त घर सांभाळणारी ती आज अवकाशात भरारी मारत आहे.यशाची एक एक शिखरे मिळवत आहे.क्रीडा,शिक्षण,आरोग्य,कला,तंत्रज्ञान, विज्ञान,सामाजिक क्षेत्र,डिजिटल क्षेत्र,वायुसेना,साहित्य,शासकीय अशा एक ना अनेक क्षेत्रात तिने स्वतःचा ठसा उमटविला आहे.स्वतःचे तसेच कुटुंबाचे,गावचे,राज्याचे,देशाचे नाव ती उज्वल करीत आहे.पण एवढे असूनही तिचा ‘संघर्ष’ संपलेला नाही.तिचा ‘लढा’ थांबलेला नाही.तिची ‘फरफट’,तिची ‘अवहेलना’ संपलेली नाही.आणि इतके यश संपादन करून देखील ती आजही ‘हुंदके’ देत आहे.कोणत्या मानसिकतेतून ती जात आहे?
‘मुलगी शिकली प्रगती झाली’ असे म्हटले जाते.अगदी खरे आहे ते.घरातील स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते.नवीन पिढी सुशिक्षित बनते.आज स्त्री उच्च शिक्षण घेत आहेत.सुशिक्षित बनत आहेत.स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत.स्वतंत्र बनत आहेत.ही झाली समाजातील एक बाजू.पण दुसरीकडिल परिस्थिती पाहिली तर उदास होते.काही ठिकाणी ,काही घरात आजही मुली,स्त्रिया शिक्षणापासून लांब आहेत. कधी आर्थिक परिस्थितीमुळे,दारिद्र्यामुळे तर कधी जुनाट विचारांच्या पगडा असल्यामुळे तर कधी घरातील अन्याय,अत्याचारामुळे.
शाळेत जाण्याच्या वयात घरची जबाबदारी ती सांभाळत आहे.शिक्षणाचा मागमूसही नाही अशीही अनेक कुटुंबे आहेत,जी हुंदके देत आयुष्य पुढे ढकलत आहेत. तसेच तिसरी परिस्थिती तर ह्याहून भयंकर.चांगली सुशिक्षित असूनही,कोणतेच निर्णय घेण्याचे तिला स्वातंत्र्य नाही.स्वतःच्या पायावर उभी असूनही आर्थिक स्वातंत्र्य नाही.स्वकमाईवर तिचाच हक्क नाही.ती निमूटपणे कुटुंबियाला आधार देण्यासाठी जॉब करते आहे.मात्र मनातून रोज हुंदके देत आहे. आणि ते हुंदके देत देतच आयुष्य निमूटपणे ,काहीही तक्रार न करता जगत आहे.
स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार तर आजही होत आहेत.पूर्वी फक्त शारीरिक अत्याचार,मारहाण अनेक घरात दिसून देत असे.पण आज परिस्थिती त्याहून भीषण आहे.शारीरिक अत्याचार फक्त दारिद्र्य किंवा अशिक्षित कुटुंबात होत नाहीत.तर अगदी उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत देखील आज हे घटताना दिसत आहे.आणि ही समाजातील स्थिती पहिली की एक प्रकारची चीड मनात येते. ‘तीच’ का? तिनेच का सहन कारायचे? हे असे सगळे होत असले तरी स्त्री याविषयी आवाज उठवत आहेत.पोलिसांची मदत घेत आहेत.पण दुसरीकडे काही ठिकाणी तिचा जीव जायची वेळ आली तरी देखील तिचा आवाज दाबला जातोय.
आजकाल स्त्रियांची मानसिक कुचंबणा होण्याच्या अनेक घटना दिसून येत आहेत. कधी घरात ती तिचे मन मोकळे करू शकत नाही.तर कधी कामाच्या ठिकाणी तिला खाली खेचले जात आहे,तिचा आवाज आतल्या आत दाबला जातोय.प्रत्येक वेळा तिला गृहीत धरले जात आहे.सर्वांसाठी ती नेहमी ती झिजत आहे,पण त्या प्रमाणात तिला तो आदर,सन्मान मिळत आहेच असे नाही.तिची किंमत प्रत्येकजण ठेवतोय असे नाही.तिचे कौतुक ,तिच्या कामाची दखल होतेच असे नाही.आणि ह्या सगळ्याचा तिच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे.तिचे मानसिक आरोग्य ,तसेच शारीरिक आरोग्य बिघडते.आणि एवढे होऊन देखील दोष तिलाच दिला जातो .’ही अशी का वागते आहे’? मग ती निशब्द होते आणि फक्त हुंदक्यांबरोबर जगत राहते,ती देखील कायम इतरांसाठी.
अशी ही स्त्री.प्रत्येकाला कळतेच असे नाही.पण सगळेच असे आहेत असे देखील नाही.तिला कायम पाठिंबा देणारा ,तिची दखल घेणारा, तिला भरभरून प्रेम देणारा,तिची साथ न सोडणारे अवलिया देखील आज जगात आहेत.पण हे प्रत्येकीच्या नशिबी नाही.ह्याला कोण जबाबदार ? कुटुंब? सामाजिक व्यवस्था? मागासलेपण? की आणखीन काही? स्त्री हक्कांविषयी ,स्त्री शिक्षणाविषयी अनेक समाजसुधारकांनी काम केले आहे,आजही होत आहेत.पण तरी देखील तिचा हुंदका काही थांबत नाही.
प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाला ‘समजून’ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री ला समजून घेणे तर प्रत्येकाला जमेलच असे नाही.निसर्गाने तिला खूप शक्ती दिली आहे.’जीव जन्माला घालण्याचे वरदान तिला लाभले आहे’.नवीन जीव जन्माला घालताना स्वतःचा पुनर्जन्म ती घेत आहे. तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती तुम्हाला वेगवेगळी भेटेल. पण तिला उपजत असणारी माया,प्रेम आणि काळजी ही कायम असेल.फक्त तिचे मन जाणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रथम एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला गृहीत न धरता समजून घ्यायला शिकले पाहिजे. प्रत्येकाने तिच्या विचारांना महत्व दिले पाहिजे.तिला व्यक्त होऊ दिले पाहिजे.तिचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वीकार केला पाहिजे.तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. कौतुकाचे दोन शब्द दिला दिले पाहिजेत.तिला एक साथ दिली पाहिजे.बहुतांशी स्त्रियांना फक्त ह्याच गोष्टी हव्या असतात बाकी काहीच नाही.
स्त्रियांवर होणारे शारीरिक मानसिक अन्याय आपल्याला प्रत्यक्षपणे थांबविता येतीलच असे नाही. पण किमान आपल्या कुटुंबापासून, स्वतःपासून आपण ही सुरवात नक्की करू शकतो.यासाठी गरज आहे ती आत्मपरीक्षण करण्याची.थोडा ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्याची आणि अंतिमतः शांतपणे समजून घेण्याची.स्त्री समाज निर्मितीत खूप मोलाची भूमिका बजावते.मग आपण ‘फुल ना फुलाची पाकळी’ तर करूच शकतो ना?
गरज आहे एका विचाराची……
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

