“दुःख रोखण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे, या जगात आपलं पर्मनंट असं काहीच नाही.”
मधुश्री देशपांडे गानू
जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम
वो फिर नही आते, वो फिर नही आते…
जीवनाचं कालचक्र अव्याहत चालूच आहे. “आज” हा उद्या “काल” होणार. शिळा होणार. गेलेला क्षण कधीच परत येत नाही. वाचकांनी हा लेख वाचतानाच विचार करावा, की फक्त आज आत्ताचा क्षण माझ्या हातात आहे. आज आत्ता माझ्या सोबत असणारी माणसे माझी आहेत. माझ्या पंचेंद्रियांना आत्ताच जाणवणाऱ्या गोष्टीच फक्त खर्या आहेत. उद्या त्या असतीलच याची कोणतीच खात्री देता येत नाही. गेलेला काल आजच्या सारखा होता का?? तर नाही. म्हणजेच या जगात, आपल्या जीवनात कायमस्वरूपी असं काहीच नसतं ना! ना वस्तू, ना घटना, ना माणसं……
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा आयुष्यरुपी प्रवास असतो इथे प्रत्येकाचा. या प्रवासात अनेक प्रवासी भेटतात. काही कायमस्वरूपी दूर जातात. फक्त काहीच आपली कायम सोबत करतात. या प्रवासात अनेक आनंदी, दुःखद घटना, क्षण आपण अनुभवतो. चांगले-वाईट अनुभव घेऊन समृद्ध होतो. येणारा प्रत्येक क्षण काहीतरी नवीन घेऊन येतो. काही नवीन देऊन जातो. आनंदाचे क्षण जसे कायम राहत नाहीत तसेच दुःखाचे क्षणही कायम नसतात. प्रत्येक क्षणाला आपल्याला सामोरं जावं लागतं.
तरीही आपण दुःखी प्रसंग, घटना यांना धरून ठेवतो. दुःख कुरवाळत बसण्याची माणसाची सहज प्रवृत्ती असते. प्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यूने आपण पुरते खचतो. कोलमडतो. आता आयुष्यात काहीच अर्थ नाही असं वाटू लागतं. या दुःखी घटनेत आपण अडकतो. प्रसंग तर अतिशय दुःखद आहेच. यातून सावरायला काही काळ तर जाणारच. तरीही आपलं स्वतःचं जगणं उरतंच ना!! आपला प्रवास सुरूच राहतो.
हा जो आपला स्वतःचा, एकट्याचा असा प्रवास आहे तो आपल्या मानसिकतेवर, विचारधारेवर अवलंबून आहे. या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी ही आपलीच आहे. मग एका दुःखी घटनेपाशी कायम अडकून राहायचं की पुढे चालत नवीन अनुभव घ्यायचे हे आपणच ठरवायचं. कितीही दुःख केलं तरी गेलेली व्यक्ती परत येणार नसते. ही आता भूतकाळातील घटना आहे. याची पुनरावृत्ती ही कधीच होणार नसते. हे एकदा समजलं की आपण हे दुःख तिथेच सोडून देतो. आणि आपला प्रवास आपले येणारे आनंदी, दुःखी ही क्षण पूर्णपणे जगू लागतो.
कितीही जवळची चोवीस तास एकत्र राहणारी माणसं तुमच्या सोबत असली तरीही एका मर्यादेपलीकडे तुम्हीं एकटेच असता. तुमचा प्रवास हा फक्त आणि फक्त तुमचाच असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा प्रवास असतो. हे मान्य करून आपण आनंदी क्षण वेचायचे ठरवलं तर आयुष्य किती सुंदर होतं ना!!
आपलं असं पर्मनंट खरंच या जगात काहीच नसतं. जन्मदाते आई-वडीलही काळानुसार आपल्याला सोडून जातात. तिथे बाकीच्यांची काय कथा!! हे एकदा आपल्या मनाने मान्य केलं, वास्तवाचा पूर्ण स्वीकार केला की जगणं सोपं होतं हो! काही व्यक्ती काही काळापुरती तुमची सोबत करतात, हेही मान्य करायला हवं.
भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा फार विचार न करता आपण आत्ताचा क्षण भरभरून जगणं हेच महत्त्वाचं आहे. फक्त हा क्षणच आपला असतो.
एक छान उदाहरण देते. प्रत्येक मंदिरात कालचक्र कोरलेले असतंच. याचा फार सुंदर अर्थ आहे. या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे आपण. आणि वर्तुळावरील सर्व बिंदू म्हणजे आपले कुटुंबीय, आपले नातलग, परिचित, मित्र-मैत्रिणी, सुहृद. हे कालचक्र अव्याहत गतिमान आहे. बदलत्या काळानुसार, गरजेनुसार, स्वार्थानुसार, प्रेमानुसार, आपली ही नाती बदलत जातात. जे आज प्रेमाचे आहेत ते उद्या सर्वस्वी अनोळखी होतात. हे असंच चालू राहतं. आणि याच कालचक्राचा अजून एक अर्थ असा, सगळ्यांमध्ये असूनही तुम्हीं एकाकी, एकटे असता.
किती चपखल उदाहरण आहे हे, जगात आपलं असं पर्मनंट काहीच नाही याचं! म्हणूनच कोणत्याही दुःखद प्रसंगातही अडकून पडायचं नाही. आपला प्रवास पूर्ण क्षमतेने चालू ठेवायचा. दुःख रोखण्याचा नव्हे तर तिथेच सोडून देण्याचा हाच सर्वोत्तम उपाय आहे. सगळंच तात्पुरतं, क्षणभंगुर आहे. आत्ताचा क्षण संपूर्णपणे मनापासुन आनंदाने जगणं हेच सत्य आहे….
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Heart touching story for those lost near n dear
खूपच छान .. प्रेरणादायी
Very nice.. Heart touching ❤
खूप छान
खूपच छान
खूपच छान