ते तुम्हाला वेदना देऊन गेले ही एक घटना, तुम्ही त्या वेदनेबरोबर खेळत बसलात हे तुमचं नुकसान.
अपर्णा कुलकर्णी
उत्तमराव आणि दौलतराव यांची मैत्री अख्ख्या सर्जापूरात गाजलेली. सगळं गाव त्यांच्या आदर्श मैत्रीची उदाहरण देत होते. उत्तमराव आणि दौलतराव शेजारी शेजारी रहात होते. फक्त भिंत मध्ये होती ती पण अगदी नावाला. दोघांचा जन्म पण एकाच दिवसाच्या फरकाने झाला होता. त्यांचे कौटुंबिक संबंध खूप जुने आणि घट्ट होते. तेच पुढे उत्तमराव आणि दौलतराव यांनी सांभाळले होते. तसेही म्हणतात ना, सुख दुःखात पहिला वाटेकरी हा शेजारी असतो मग नातेवाईक. तसेच उत्तमराव आणि दौलतराव यांचेही होते.
उत्तमराव आणि दौलतराव दोघेही एकच शाळेत एकाच वर्गात एकाच बेंचवर बसून शिकले होते. दिघे एकमेकांचा डबा मिळून खात असत. एकाला काही त्रास झाला तर पाणी दुसऱ्याच्या डोळ्यातून येत होते. काहीही झालं तरी दोघे मिळून कोणतेही काम करत होते. अभ्यास, मस्ती, शिक्षा, खेळ,घरातील कामे सगळ अगदी सोबत करत होते. एकदा शाळेत मॅडमने अभ्यास पूर्ण करायला सांगितला होता पण त्याच दिवशी दौलतराव आजारी असल्यामुळे अभ्यास करू शकले नाही तर उत्तमरावने स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून दौलतरावचा अभ्यास पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी स्वतः शिक्षा भोगली होती.
दौलतराव नावाप्रमाणेच धनवान होते तर उत्तमराव परिस्थितीने जरा जेमतेम होते. पण त्यांची परिस्थिती मैत्रीच्या आड आली नव्हती म्हणण्यापेक्षा त्या दोघांनी ती येऊ दिली नव्हती.
आज त्यांच्या मैत्रीला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती आणि म्हणूनच दोघेही शेतात बसून मनसोक्त चिकन खात गप्पा मारत होते. आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटनांना उजाळा देत होते. त्यामुळे दोघेही खूप खुश होते. पण त्यांची ही जवळीक गावातील काही लोकांना खटकत होती. त्यांच्या वाईटावर काही लोक होतेच. त्यातील विकास पाटील हा गावचा शेतकरी पहिल्या नंबर वर होता. विकास पाटीलचे शेत उत्तमराव आणि दौलतराव यांच्या शेताला लागूनच होते. पण दोघांची शेती विकासच्या शेतीपेक्षा खूपच चांगली विकसित केलेली होती. त्यामुळे विकास पाटील हा गावचा पाटील असूनही शेताच्या बाबतीत मागेच होता.
उत्तमराव आणि दौलतराव यांच्यामुळे गावचा पहिला बागायतदार हे पद काही त्याला आजवर मिळाले नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात खूप राग होता आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचे गोष्ट म्हणजे उत्तमराव आणि दौलतराव यांच्या मैत्रीत फूट पाडणे ही होती. याच संधीची वाट विकास पाटील पहात होता आणि ती संधी स्वतः दौलतरावने त्याला दिली होती. पन्नास वर्षांच्या मैत्रीचे सेलिब्रेशन करताना दौलतराव आणि उत्तमराव हे दौलतरावच्या खानदानी हाराबद्दल बोलत होते आणि तेच बोलणे विकास पाटीलने ऐकले होते.
झालं काहीच दिवसात सगळे शेतात असताना विकासने काही माणसे पाठवून दौलतरावचा खानदानी हार चोरला आणि उत्तमरावच्या घरात ठेवला. हा हार दौलतरावने त्याच्या खालच्या खोलीत एका पेटीत ठेवला होता आणि रोज झोपताना तो हार व्यवस्थित आहे की नाही हे पाहूनच दौलतराव झोपत असे. त्या दिवशी ते सवईप्रमाणे हार पाहायला गेले आणि तो गायब झाल्याचे पाहून त्यांनी सरळ उत्तमरावला त्याचा जाब विचारला. कारण पूर्ण सर्जापुरमध्ये दौलतरावकडे असा किमती खानदानी हार असल्याचे फक्त उत्तमरावलाच माहीत होते.
पण उत्तमराव मात्र या चोरी प्रकरणाशी अनभिज्ञ होते. शेवटी विकास पाटीलला जे अपेक्षित होते तेच झाले. दौलतरावसाठी तो हार फक्त हार नव्हता तर त्यांच्या खानदानची ओळख होती. जिथे त्याच्या हाराचा प्रश्न येत होता तिथे तो सगळच विसरून जात होता. त्याने उत्तमरावच्या घराची झडती घेतली आणि हार जेंव्हा त्याच्याच घरात सापडला तेंव्हा उत्तमराव सोबत असलेले सगळेच मैत्रीचे संबंध तोडले.
उत्तमराव यांना आपल्या मित्राच्या वागणुकीचा खूप जास्त धक्का बसला होता. या प्रकरणानंतर दौलतरावने घर सोडले होते आणि दुसरीकडे राहायला गेले होते. माझा मित्र मला समजू शकला नाही ही सल त्यांच्या मनात कायम होती. या घटनेनंतर उत्तमराव आणि दौलतराव यांनी एकमेकांचे तोंड ही पाहिले नव्हते. दहा वर्षे उलटून गेली होती पण अजूनही उत्तमराव या धक्क्यातून सावरू शकले नव्हते. ज्याच्या शीवाय जगण्याची कल्पनाही केली नव्हती त्याच्या शिवाय जगणे भाग पडले होते त्यांना. ही घटना उत्तमरावना वेदना देऊन गेली होती हे खरंय पण वारंवार त्याच घटनेचा विचार करून, त्याला कुरवाळून, त्याला खेळून त्यांच आयुष्य त्यांनी बेरंग करून खूप नुकसान करून घेतले होते.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्यामुळे सगळं संपलं असं वाटायला लागतं. जगण्याची उमेद संपून जाते. एखादी अनपेक्षित घटना आयुष्याला खूप वेगळ्या प्रकारे कलाटणी देते आणि होत्याचे नव्हते होते. पण ती घटना किंवा घटनेमुळे दुरावलेल्या व्यक्ती या दुखावून जातात पण सतत त्याच घटनेचा विचार केल्याने किंवा कुरवाळत राहिल्याने दुःख कमी होत नाही उलट वाढते आणि त्याचा जास्त त्रास आपल्यालाच होतो. पर्यायाने आपणच आपले नुकसान करून घेतो. एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीशी असलेले आपले नाते घट्ट असतेच. आयुष्याचा अविभाज्य घटक असते पण काही कारणाने जर असे नाते, ती व्यक्ती दुरावलीच तर ती एक घटना होती जी घडून गेली असे समजून विसरण्याचा प्रमाणिक प्रयत्न करायला हवा. कारण स्वतःला त्रास करून घेऊन झालेलं नुकसान भरून निघत नाही.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
