तात्पुरतं बरं वाटावं म्हणून लोकांकडून sympathy मिळवणं बंद करा.
अपर्णा कुलकर्णी
व्यक्ती तितक्या प्रकृती हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेक प्रकारची, स्वभावाची लोकं या जगात आहेत. काही लोकांना एकटे राहायला आवडते, काहीना बोलायला, काहींना ऐकायला, काहीना शांतता प्रिय वातावरण, तर काहींना गर्दी गोंगाट आवडतो. आपल्या रोजच्या जगण्यात या सर्वांच्या स्वभावाचा, गुणांचा आपल्याला अनुभव येतो. आपला स्वभाव ज्या कटेरिरत मोडतो त्या त्या स्वभावाच्या लोकांशी आपले जास्त पटते आणि छान मैत्री होते.
पण काही लोक आपले दगडा एवढे दुःख डोंगरा इतके करून सांगणारे असतात. दुःख कुरवाळत बसणे हा जणू त्यांचा छंद असतो. आपले दुःख लोकांना सांगून त्यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याची सवय झालेली असते त्यांना. अशाने होते काय ?? तर समोरची व्यक्ती चांगल्या मूड मध्ये असेल तर तिचाही मुड खराब होतो. त्यामुळेच तर म्हणतात ना दुःख कोणाला सांगू नका पण आनंद मात्र सगळ्यांना सांगून द्विगुणित करा. पण स्वतःचे दुःख कुरवाळत बसणारे लोक स्वतः सतत नकारात्मक विचार करत असतात आणि लोकांना आपले दुःख सांगून त्यांच्याही आयुष्यात नकारात्मकता पसरवत असतात.
अशाच एका स्वभावाच्या मुलीचे उदाहरण पाहूया ….
नम्रता आज ऑफिसमध्ये आली ती तोंड पडूनाच. तणतणत तिने बॅग आपटली आणि कामाला लागली. डोक्यात राग धुसपुसत असल्याने काम पाहिजे त्या अपेक्षेत पूर्ण झाले नाही. पर्यायाने बॉस ओरडले आणि तिच्या दुःखात भर पडली. आता तो त्रास सहन होईना. सतत आपले दुःख समोरच्याकडे व्यक्त करण्याच्या स्वभावाने ती व्यक्त होण्यासाठी धडपडत होती. समोरच्याला ते ऐकून घ्यायचे आहे की नाही इतकाही विचार तिच्या दुःखापुढे तिच्या डोक्यात येत नव्हता. तिने तिच्या मैत्रिणीला रुचिराला गाठले आणि बोलायला सुरुवात केली.
आज सकाळी मला उठायला उशीर झाला त्यात निशिकांतचा आणि माझा डबा इतकेच मी केले. त्यावर सासूबाई मला तासभर बोलत होत्या. मी निशिकांत जवळ तक्रार केली तर तुमचे हे रोजचे झाले आहे, यावर काय आणि कसा मार्ग काढायचा हे तू बघ म्हणून मोकळा झाला. एखादा दिवस उठायला उशीर झाला तर त्यात एवढे बोलण्यासारखे काय होते सांग रुचिरा. त्यात माझे प्रेझेंटेशन जरा चुकले तर बॉस खूप ओरडले. तुम्हाला नोकरी करायची असेल तर घर आणि ऑफिस दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवायला शिका अस बोलले मी काय करू तूच सांग. नम्रताच्या डोक्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते आणि रूचिराला तिला कसे समजून सांगावे कळत नव्हते.
खरतर असे प्रसंग रोजच्या जगण्यात चालतच राहतात. त्यावर उगाच अतिविचार करून डोके आपटून घेण्यापेक्षा काही गोष्टी दुर्लक्ष करायला शिकले तर खूप फरक पडतो. दुःख कुरवाळत बसणाऱ्या लोकांना कोणीतरी श्रोता हवा असतो दुःख ऐकून घ्यायला आणि त्यांना बरे वाटेल असे आधराचे चार शब्द द्यायला. समजा तुमचे दुःख ऐकून एखादा तुमच्या बाजूने बोलला आणि बिचारी ग ती अशा नजरेने किंवा सहानुभूती देऊन बघायला लागला तर तुमचा प्रोब्लेम संपणार आहे का ?? की त्यावर मार्ग सापडणार आहे ?? अजिबातच नाही. पण प्रत्येक वेळी तुम्हाला ऐकून घ्यायला कोणी मिळेलच असे नाही. जर असे झाले नाही तर मला समजून घेणार कोणीच नाही, मी नकोशी झाले आहे सगळ्यांना असाच यांचा समज असतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा आपली परिस्थिती कशीही असो त्यावर मार्ग हा आपला आपल्यालाच काढायला हवा आणि तो ही सकारात्मक पद्धतीनेच. कारण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत असतो मित्रानो. परिस्थिती किंवा असणाऱ्या तक्रारी वेगळ्या स्वरूपाच्या असतील पण दुःख प्रत्येकाला आहे. पण त्याला कुरवाळत बसल्याने असणारा त्रास कमी होत नाही किंवा त्याचे स्वरूप बदलत नाही. उलट ते वाढतच जाते. तुम्ही जितके तुमचे दुःख कुरवाळत रहाल तितकेच ते वाढेल. पण कमी होणार नाही.
तुम्हाला माहित आहे का ?? आपण जसा विचार करतो तसेच आपले आयुष्य घडत असते. आपण जर सकारात्मक राहिलो तर नक्कीच परिणाम सकारात्मक असेल आणि नकारात्मक राहिलो तर आपले आयुष्यही नकारात्मकच असेल. या विश्वात सगळ्याच गोष्टी भरलेल्या आहेत. चांगल्या पण आणि वाईट पण. चांगले मागाल तर चांगलेच मिळेल आणि वाईट मागाल तर वाईटच मिळेल.
त्यामुळे नेहमीच चांगले बोला, चांगले विचार करा.
कोणत्याही परिस्थितीत हसत रहा.
आहे ती परिस्थिती स्वीकारा.
समजा एखाद्याने तुम्हाला विचारले कसा आहेस ?? तर नम्रता सारख्या स्वभावाची माणसे सगळं छान असेल तरीही हा ठीकच आहे असे उदास चेहऱ्याने बोलतील. पण तेच जर आपण हसून म्हणालो मी एकदम मस्त आहे तर आपोआप सगळे मस्तच वाटायला लागेल. कारण आपण सकारात्मक बोललेली असतो. त्याचा परिणाम सकारात्मक होतो.
त्यामुळे नेहमीच चांगले बोला, चांगले विचार करा.
तुम्ही जर तुमचे रड गाणे गातच राहिलात तर तुमचा मित्रपरिवार, तुमची फॅमिली तुमच्या या स्वभावाला कंटाळून कदाचित तुम्हाला इंग्नोर करेल, दूर जाईल.
त्यामुळे तात्पुरतं बरं वाटावं म्हणून लोकांकडून सहानुभूती मिळवणं बंद करा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

खूप छान 👌