तणाव असतानाही चेहऱ्यावरचा आनंद असा जिवंत ठेवा.
मेराज बागवान
ताणतणाव हा आयुष्यातील मूलभूत घटक आहे.खरे पाहता, ताण हा जरी नकारात्मक शब्द वाटला तरी काही प्रमाणातील ताण आयुष्यात गरजेचाच असतो.त्याशिवाय आपण आयुष्यात पुढे सरकू शकत नाही.आज प्रत्येकाला ताण हा आहेच.अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वच जण ह्या ताणतणावाचा मुकाबला करीत आहेत.
कोणाला अभ्यासाचा ताण आहे, तर कोणाला नोकरीतील/व्यवसायातील ताण, कोणावर आर्थिक ताण आहे तर कोणी वारंवार होणाऱ्या आजारपणामुळे तणावमय आहेत. कोणी नातेसंबंधातील ताणामुळे, तर कोणी प्रेमभंग, घटस्फोट यामुळे तणावात आहेत.कोणी अहिंसा, अन्याय, अत्याचार यामुळे तणावग्रस्त आहेत. आज वाढलेली सर्व क्षेत्रांतील स्पर्धा माणसाला आपसूकच तणावग्रस्त बनवत आहे.
ह्या तणावामुळे अनेक चांगले वाईट परिणाम प्रत्येकजण अनुभवत आहे.पण तणाव आहेत म्हणून आयुष्य कुठे एका ठिकाणी थांबत नाही.त्यामुळेच तणाव असतानाही चेहऱ्यावरील आनंद जिवंत ठेवता आला पाहिजे.आणि तो आपण नक्कीच जिवंत ठेवू शकतो. सुखात ,सुखद घटनांमुळे मन आनंदी होते, कोणीही सुखी क्षणांमुळे आनंदिच होते. पण जेव्हा आव्हानात्मक घटना घडत असतात, परिस्थती बिकट असते तेव्हा आपली खरी परीक्षा असते ,ती म्हणजे, त्या परिस्थितीत देखील सुखी,समाधानी राहणे आणि चेहऱ्यावरील आनंद जिवंत ठेवणे.मग हा आनंद जिवंत कसा बरे ठेवता येईल?
१) वर्तमानात जगणे – जेव्हा तणावग्रस्त परिस्थिती असते,तेव्हा मागचा-पुढचा अतिविचार न करता वर्तमानात जगले पाहिजे आणि आलेल्या परिस्थितीला धीराने सामोरे गेले पाहिजे.जे घडते ते चांगले काही तरी होण्यासाठीच हा विश्वास कायम मनात ठेवा.
२) इतरांना मदत करणे – जेव्हा आपण तणावग्रस्त असतो, तेव्हा आपला ताण थोडा बाजूला ठेवून कोणी अडचणीत असेल त्याला मदत करावी.जेणेकरून आपण आपल्या अडी-अडचणी देखील आत्मविश्वासाने सोडवू शकू.
३) छंद जोपासणे – तणावात जेव्हा कधी तुम्ही असाल,तेव्हा तुम्ही थोडा वेळ तुम्हाला आवडणारी गोष्ट केली पहिजे.ती गोष्ट कोणतीही असू शकते.जसे की , गाणे ऐकणे, कविता करणे, कलाकुसरीच्या वस्तू करणे, चित्रकला, इंटरनेट , वाचन, लेखन इत्यादी.यातून तुम्हाला तुमचा ताण योग्य रित्या हाताळता येईल आणि तुम्ही नक्कीच आनंदी राहू शकाल.
४) आत्मविश्वास आणि सिंहावलोकन – प्रत्येकाने तणावात स्वसंवाद साधला पहिजे.मी खरेच अमुक एका गोष्टीचा इतका ताण घेतलाच पाहिजे का? माझी बलस्थाने कोणती आहेत? मी कोणती गोष्ट सर्वात चांगली करू शकतो.हे स्वतःला विचारले पाहिजे.मी हे काम पूर्ण करूनच दाखवेन हा विश्वास स्वतःवर ठेवला पाहिजे.म्हणजे तुमच्या चेहऱयावर नक्कीच आनंद जिवंत राहील.
५) कोणतीच परिस्थिती कायम नसते हे स्वीकारणे – आपण अनेकदा एकाच गोष्टीचा इतका ताण घेतो की जणू आयुष्यात त्या गोष्टीशिवाय दुसरे काहीच नाही, असा समज करून आपण जगत असतो. पण बदल हा निसर्गाचा नियम आहे.आणि कोणतीच गोष्ट, परिस्थिती कायम नसते,मात्र बदल कायम असतो.म्हणूनच ही ही परिस्थिती बदलेल.ही परिस्थिती म्हणजे आयुष्याचा शेवट नाही हे एकदा का स्वीकारले की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदीच दिसाल.
६) स्मितहास्य- चेहऱयावर खरेखुरे स्मितहास्य नेहमी ठेवावे. स्मितहास्य तुम्हाला एक प्रकारे सकारात्मक प्रेरणा देत असते.आणि यामुळे ताण लवकर कमी व्हायला मदत होते.
७) जवळच्या व्यक्तीशी संवाद साधणे – जेव्हा तुम्हाला वाटते की मला खूपच ताण जाणवत आहे, त्याक्षणी तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मुक्तपणे संवाद साधला पाहिजे.ती व्यक्ती कोणीही असू शकते.ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तींशी बोलल्याने समस्या, ताण निघून जातोच असे नाही, पण तणावाचा सामना करण्यासाठी खूप मोठे हत्यार मिळते, पाठिंबा मिळतो.
८) विधात्यावर विश्वास – कितीही तणाव असेल तरी देवाला, विधात्याच्या, त्या अदृश्य शक्तीला, निसर्गाला दोष देण्याऐवजी त्याचे तणावग्रस्त परिस्थितीत देखील धन्यवाद देता आले पाहिजे.यामुळे ती अदृश्य शक्ती कायम तुमच्यासोबत कोणत्या ना कोणत्या रुपात कायम असेल.आणि हळूहळू का होईना तुम्हाला ती शक्ती तणावातून बाहेर येण्यासाठी पूर्ण मदत करेल.फक्त तुमचा त्या शक्तीवर पूर्ण विश्वास हवा.
९) आभार मानणे – आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मदत करीत असतो.तणावात असताना देखील आपण त्या मदतीची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या त्या त्या व्यक्तीचे आभार मानावेत म्हणजे मनावरील ताण हलका होईल आणि चेहऱयावर हासू उमटेल.
१०) अपेक्षाविरहित जीवन – प्रत्येक वेळी अपेक्षा ठेवणे गरजेचे नसते.किंबहुना इतर कोणाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःकडून च अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. म्हणजे तणाव जरी असेल तरी तुम्ही निवांत राहू शकता.आणि एकदा का तुम्ही जगाकडून अपेक्षा ठेवणे बंद केले की आपसूकच तुम्हाला जे वाटते तेच घडू लागेल.
११) संयम आणि सकारात्मकता – संयम हा गुण आयुष्य शिकवून जातो.संयम ठेवणे म्हणजे, स्वतःच्या भावनांवर, विचारांवर आणि इतरांशी असलेली तुमची वागणूक यावर नियंत्रण असणे. आपल्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सर्व काही छान , सुंदर आहेच हा विचार मनात कायम जिवंत ठेवावा.काळ खूप शक्तीवान असतो.म्हणून थोडा संयम ठेवून , शांत डोके आणि मन ठेवून फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा निर्माण केली पाहिजे.यामुळे तुमच्या चेहऱयावरील आनंद कायम जिवंत राहील.
१२) स्वतःला बदलणे – आपण स्वतःच आपल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो.त्यामुळे जेव्हा जेव्हा तणाव असतो तेव्हा नक्कीच स्वतःमध्ये बदल केले पाहिजे.परिस्थिती सर्व काही शिकविते.पण त्या साठी आपण देखील स्वतःला बदलत ठेवले पाहिजे.आणि याचा फायदा आपल्यालाच होणार असतो.जर तुम्ही स्वतःला बदलण्यात यशस्वी झालात तर तणावात देखील तुम्ही खळखळून हसाल हे नक्की.
खळखळून जगा , मुक्तपणे जगा आणि आनंद जीवनात कायम जिवंत ठेवा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

लेख खुप छान आहे
छान. सुरेख
एक सूचना करावीशी वाटते की , या पोस्ट मध्ये प्रत्येक वाक्य लिहिले जात असताना दोन वाक्याच्या मध्ये स्पेस सोडणे आवश्यक आहे ती कुठे ही दिसत नाही . लेख लिहिला जात असताना ह्या चूका टाळायला हव्यात …. साहेबराव माने . पुणे