“मी दुसऱ्यांच्या म्हणण्याचा स्वतःवर नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही.”
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“आई बघ ना, हा नील कसा करतोय! मी कधीपासून रिमोट मागत आहे याच्याकडे पण तो देत नाही. पिया काकुळतीला येऊन बोलत होती.” ही त्यांची रोजचीच गाऱ्हाणी होती. आज रिमोट तर उद्या खेळणी, काही ना काही असायचेच. शाळेला सुट्टी होती त्यामुळे दोघे घरीच आणि मग असा गदारोळ सुरू असायचा. आई नुसती वैतागून जायची. काम करायची का यांच्याकडे लक्ष द्यायचं यांचं भांडण सोडवायच असा तिला प्रश्न पडायचा.
बर त्यांना एकट सोडून कुठे जाण्यात अर्थ पण नव्हता. दोन मिनिटे देखील त्यांचं पटत नसे. संध्याकाळी बाबा घरी आल्यावर पण काही ना तक्रारी असायच्या. सुधा पण म्हणायची, “या मुलांना सांभाळायचं म्हणजे एक दिव्य आहे. एक मिनिट शांत बसत नाहीत.” त्यावर ते हसुन म्हणायचे, “अग असुदे आता मजा करणार नाहीत तर कधी करणार? तेवढं होणारच मुल आहे म्हटल्यावर. तू नको काळजी करू.”
आजपण तेच चाललं होत. पिया काहीतरी पाहत होती तेव्हढ्यात नील ने येऊन तीच्याकडून रिमोट काढून घेतला होता. थोडा वेळ पाहून तुला परत देतो म्हणून तो बसला होता पण अजून काही त्याने रिमोट दिला नाही. म्हणून ती ओरडत होती. आई बाहेर येऊन म्हणाली, “अग का इतका आरडा ओरडा करते आहेस? असेना का त्याच्याकडे रिमोट. तू पण बघ तुला काय पाहायचं ते.” तेव्हा पिया तोंड बारीक करून म्हणाली, “अग कसं बघू त्याच्याकडे रिमोट असताना. जेव्हा तो रिमोट घेतो तेव्हा त्याने जे काय लावलं आहे तेच पाहावं लागतं. माझ्या मनाचं तो काही लावत नाही.
म्हणून मी ओरडत आहे ना! त्याने मी सांगते ते लावलं असत तर मी का बोलवलं असत तुला?” आईने हसुन डोक्यावर हात मारून घेतला व नीलला म्हणाली, “नील एकतर तिच्याकडे रिमोट दे किंवा मग थोडावेळ तिला काय हवं ते लाव.” नील ठीक आहे म्हणाला पण तो काही तस करणार नव्हता. आईसमोर बोलायचं म्हणून तो बोलला. आईने पियाची समजूत घातली की तो लावून देईल आणि ती आत गेली.
इथे पियाचा प्रॉब्लेम नील ने रिमोट घेतला हा नव्हता. तर त्याने रिमोट घेतला तर तो त्याच्या मनाप्रमाणे, त्याला पाहिजे तेच लावणार. आवडत असुदे किंवा नसुदेत तिला तेच पाहावं लागणार होत. समस्या ही होती. इथे तिची मर्जी चालत नव्हती तर नाईलाज होत होता. असच होता जेव्हा आपण आपल्या आयुष्याचा रिमोट कुणा दुसऱ्याच्या हातात देतो. आता प्रश्न पडेल आयुष्याचा रिमोट देतो म्हणजे काय करतो? आता आपलं आयुष्य जे आहे ते पण एकप्रकारचा टीव्हीच आहे. वेगवेगळे प्रसंग, आठवणी, गोष्टी यांचे चित्रपट आपल्या आयुष्यात घडतच असतात.
पण त्यातल्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, कोणाला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कधी जमत जेव्हा आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात असेल. जेव्हा आपण ठरवत असू, की माझ्या आयुष्यात सुख असुदे, सुख असुदे, चढ उतार, अगदी संघर्ष असुदे; हे माझं आयुष्य आहे. यातून बाहेर पडणं, येणाऱ्या गोष्टींचा सामना करण मला जमेल. जेव्हा या गोष्टीची जाणीव आपल्याला असते तेव्हा आपण अस म्हणू शकतो की हा याचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात आहे.
जर हा रिमोट कंट्रोल आपल्या हातात नसेल तर काय होत? अगदी तसच होत जसं पियाच्या बाबतीत होत. समोरचा जे दाखवेल, समोरचा जो देईल तेच घेणं इतकं हातात राहत. अस होत देखील. अगदी कळसूत्री बाहुली सारखं आपलं आयुष्य होऊन जर जर त्याच्या दोऱ्या दुसऱ्या कोणाच्या हातात असतील तर! आता आपण म्हणू, माझ्या बाबतीत कुठे अस होत आहे? मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगतोय.
आपण अस म्हणतो पण जर बारकाईने लक्ष दिलं, होणाऱ्या घटनांकडे, त्यातून येणाऱ्या आपल्या प्रतिक्रियांकडे जर आपण त्रयस्थ नजरेने पाहिले तर आपल्याला हे समजेल की बरेचदा हा रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिलेला असतो. म्हणून तर जेव्हा दुसरा काहीतरी उलट सुलट की लगेच आपल्याला राग येतो, कोणी काही आपल्या मनाविरुद्ध वागल की आपल्याला दुःख होत, लोकांनी आपल्याबद्दल जरा चुकीची मत दिली की आपण स्वतःवरच शंका घेऊ लागतो, स्वतःच्या क्षमतांवर शंका घेऊन लागतो.
इतर लोकांचा इतका जास्त परिणाम आपल्या आयुष्यावर करून घेतो की त्यांच्या म्हणण्यावर आपण स्वतःच्या आयुष्याला पाहतो, आपलं स्वतःच मत बनवतो. अगदी रोजचीच उदाहरणं आहेत. आपण नवीन काहीतरी बिझनेस सुरू केला, अरे त्यात किती रिस्क आहे, त्याला कटकटी खूप असतात, आपल्या घराण्यात कोणी केलाय का बिझनेस, कश्याला त्या भानगडीत पडतो आहेस, त्यापेक्षा नोकरी कर ना! एकसारखं अस जर कोणी बोलू लागलं तर अनेकदा मनात येऊन जात, खरच आपल्याला हे जमेल का? बाकीचे म्हणतात तस यात तोटा झाला तर!
कळत नकळत लोकांच्या बोलण्याचा नकारात्मक परिणाम होतोच. हे अस होण्याचं कारण काय? तर आधी म्हट्यल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात नाही. म्हणून आपल्यावर लगेच दुसऱ्याच्या बोलण्याचा परिणाम होतो, त्यांना जे अपेक्षित आहे तस आपण वागतो.
जी माणसं आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य जगतात, यश मिळवतात त्यांना जर त्याचं कारण विचारलं तर हेच उत्तर असत की त्यांच्या आयुष्यात जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतलेली असते. त्यांनी दुसऱ्यांच्या बोलण्याचा परिणाम करूनच घेतलेला नसतो. त्यांना स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असतो. स्वतःच्या शर्थीवर ते आयुष्य जगलेले असतात. जर त्यांना हे जमू शकत तर आपल्याला का नाही. आपण इतक्या नाजूक मनाचं का व्हावं की कोणाही त्यावर त्यांचा हक्क गाजवू शकेल. की कोणाच्याही बोलण्याचा आपल्यावर लगेच परिणाम होईल.
म्हणून वेळीच आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घ्या. आपला आनंद, आपलं दुःख आपल्या हातात असल पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतः ला आहे तस स्वीकारा आणि सांगा “मी दुसऱ्यांच्या म्हणण्याचा स्वतःवर नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही. कारण हे माझं आयुष्य आहे.”
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूपच् छान,माझं आयुष्य पण सेम ह्या कन्सेप्ट वर आधारलेलं आहे,तुमचा मनापासून धन्यवाद,आता मला खूप चांगलं फील होतय, माझ्या डोक्याच्या कक्षा आता रुंदावळ्यात आणि एकदम मोकळ वाटतंय,मी तुमचा नेहमीचा वाचक आहे,मी माझे प्रॉब्लेम तुमचासोबत शेअर करू शकतो का?मला खरंच खूप गरज आहे,मला कळवा,परत एकदा धन्यवाद 🙏