Skip to content

जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं, तेव्हा न चिडता स्वतःलाच सोबती बनवा.

जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं, तेव्हा न चिडता स्वतःलाच सोबती बनवा.


हर्षदा पिंपळे


आपल्या आयुष्यात कधी कधी माणसांचा अक्षरशः बाजार असतो.पण गरजेच्या वेळी ही माणसं नेमकी कुठे असतात काहीच कळत नाही. गरजेच्या वेळी एकतर पन्नास जणांमधील केवळ पाचच व्यक्ती सोबत असतात. नाहीतर मग एकही व्यक्ती सोबत नसते.पण जेव्हा आपण एखादं शिखर गाठतो तेव्हा मात्र कौतुक करायला गर्दी जमलेली असते. तेव्हा आपल्याही मनात विचार येतोच की “गरज होती तेव्हा ही सगळी माणसं कुठे होती…?” “आज कौतुक करायला इतकी गर्दी पण मग गरजेच्या वेळी हीच गर्दी का नव्हती..?”

खरं तर अशावेळी मन अस्वस्थ होतं.कधी कधी आपलीच माणसं आपल्याला साथ देत नाहीत याचही वाईट वाटतं. आपण कुणाच्या तरी मदतीला धावून जातो पण आपल्या वेळेला कुणीही सोबतीचा हात द्यायला तयार नसतं म्हणून कधी कधी तर चिडचिडही होते.स्वतःचाच तिरस्कार वाटायला लागतो. आता सगळं संपलय असं वाटायला लागतं.पण अशावेळेस खरं तर कोणतीही चिडचिड न करता आपण संयमाने वागायला हवं.आयुष्यात संयम हा खूप महत्त्वाचा असतो.कोणतीही गोष्ट साध्य करायची झाली तर संयम हा महत्वाचाच असतो.त्यामुळे गरजेला कुणी नसतं तेव्हा चिडचिड करण्यापेक्षा थोडं संयमाने घ्या.आपल्यासोबत कुणी नसलं म्हणून काय झालं आपल्यासाठी आपणच असतो हे लक्षात घ्यायला हवं.

प्रत्येक वेळी आपल्या गरजेला कुणीतरी धावून येईलच अशी आशा तरी का ठेवायची….?आणि अशा आशेवर तरी किती काळ थांबायच…?त्यामुळे कुणीतरी येईलच ही अपेक्षा, आशा आपण सोडून देऊन आपणच आपली सोबत करायला हवी.आपणच आपला सोबती व्हायला हवं.एकदा का आपण स्वतःचेच सोबती झालो तर आपण काहीही करू शकतो. फक्त आपण आपली क्षमता ओळखायला हवी.आणि खरं तर जेव्हा कुणी सोबत नसतं तेव्हाच आपली क्षमता आपल्याला लक्षात येते. कुणीही सोबत नाही म्हंटल्यावर आपल्याला आपल्या समोर असंख्य अडचणींचा डोंगर उभा राहिलेला दिसतो.कदाचित तेव्हाच पावलांचा वेग वाढायला लागतो.अडचणींचा सामना करायला आपल्या अंगात तेव्हाच तर नवं बळ संचारतं.आणि ते संचारणही तितकच आवश्यक आहे.

कधी ना कधी स्वतःलाच स्वतःची सोबत करावी लागेल हे मनाशी पक्क करून ठेवायलाच हवं.आज सगळे असले तरी ऊद्या कुणी असेलच याची शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. त्यामुळे ऊद्यासाठी का होईना आपली सोबत आपणच करण्याची तयारी असायला हवी.गरजेला सगळेच सोबत असतील हा भ्रम आपण विसरायला हवा.कारण भ्रमाचा भोपळा एकदिवस फुटतोच.इतकच नाही तर सोबत करणारे नेहमी प्रामाणिकपणे सोबत करतील असं नाही. कधी कधी त्यांची ती सोबत तुमचा घातही करू शकते.म्हणून इतरांच्या सोबतीची अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःच स्वतःची सोबत केलेली केव्हाही चांगलीच. एकतर अनुभवातून आपण शिकत जातो, जगण्याची वाट एकटं चढायला शिकतो.मग आयुष्यात पुढे कुणाची सोबत मिळो न मिळो आपण आपली लढाई लढत राहतो. आयुष्याच्या या लढाईत बेफिकिरपणे जगायला शिकतो.

काय आहे नं…आयुष्यात सोबत फार महत्वाची आहे.मग ती स्वतःची असो वा दुसऱ्याची.पण हेही तितकच खरं आहे की आपण आज जर आपली स्वतःची सोबत करू शकतो तर आपण उद्या दुसऱ्या कुणाची सोबत करू शकतो. आपण आपलीच सोबत करत नाही तर दुसऱ्याची करूच शकतो याची तरी काय शाश्वती….???म्हणून गरजेला कुणाचीही वाट न पाहता स्वतःच स्वतःची सोबत करायला सुरुवात करा.कधी कधी स्वतःच स्वतःला म्हणून पहा….की

मी आहे तुझ्यासोबत…
मी आहे तुझ्यासोबत
तू नव्याने जगायला सुरुवात कर
अडथळे कित्येक येतील
म्हणून तू जगणं थांबवू नको

तू स्वतःचा आधार बनायला
सुरुवात तर कर
तू स्वतःचा आधार होणं
थांबवू नको
मी आहे तुझ्यासोबत….

मी आहे तुझ्यासोबत
तू हसायला सुरुवात कर
भरला जरी डोह दुःखाने
म्हणून तू हसणं थांबवू नको…

मी आहे तुझ्यासोबत
तू जिंकायला सुरुवात कर
अपयशाच्या भीतीने
तू जिंकणं थांबवू नको…

मी आहे तुझ्यासोबत
तू आयुष्याचा रस्ता चालायला
सुरुवात तर कर
पावलांना वेदना होतील म्हणून
चालण थांबवू नको….. !!

पहा आयुष्यात कुणाची सहसा गरज भासण्याची वेळच येणार नाही.म्हणून चिडणं थांबवून स्वतःच्या हाताचा आधार घेत स्वप्नांचा पाठलाग करायला सुरुवात करा…. आयुष्य सुंदर होईल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं, तेव्हा न चिडता स्वतःलाच सोबती बनवा.”

  1. सागर बैरागी

    खूप छान लेख आहे प्रेरणादायी धन्यवाद मॅडम

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!