Skip to content

स्वतःला आवरलं की सावरायला कोणीतरी यायला हवं ही अपेक्षा उरत नाही.

स्वतःला आवरलं की सावरायला कोणीतरी यायला हवं ही अपेक्षा उरत नाही.


मयुरी महाजन


जर आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूंकडे जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला, तर काही गोष्टी आपल्या नक्कीच लक्षात येतील, जीवनाच्या सुरुवातीचा काळ आपल्या सर्वांसाठी नाजूक असतो , त्यामुळे आपल्या आसपास असणारी सर्वच मंडळी आपल्याला जपते, काळजी घेते, परंतु जसजसे आपण मोठे होत जातो ,तसं तसे आपल्याला शिकवले जाते, की आपली कामे आपण स्वतःच करायला हवीत,ते यासाठी की आपण प्रत्येक वेळेस कोणाच्या ना कोणाच्या आधाराची अपेक्षा ठेवू नये, म्हणून…..

कारण आयुष्याची लढाई आपली असते, त्यामुळे ती आपआपली आपल्यालाच लढावी लागते, त्यासाठी कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहून चालत नसतेच, मान्य आहेत, परिस्थिती रडायला स्वतःला तुटून जायलाही तयार असते ,परंतु कोणीतरी सावरायला येईल, या खोट्या आशेवर थांबण्यापेक्षा, स्वतःला आवरता आलं ,की मग येईल कुणीतरी सावरायला ही अपेक्षा उरत नाही,

प्रत्येक वेळेस आधाराची खरच गरज असते का??? आपण ज्याला आपला आधार म्हणतो ते खरच आपला आधार असतात का???? डुबत्याला काठीचा आधार अस म्हणतात, परंतु त्या आधाराची अपेक्षा तरी कुठपर्यंत करत राहावी, माणसाला माणसाची गरज ही कालही होती, आजही आहे, आणि उद्याही राहील, मग काही ठिकाणी भावनिक आधार असेल, आर्थिक असेल सामूहिक असेल ,असे बरेच काही, पण कुठलाही आधार फक्त आधार हवा आहे, या आशेवर घेऊ नये, कारण आधार देणारा तितकाच नकोप असेल, हे सांगता येत नाही,

त्यासाठी स्वतःचा तोल सावरणं खूप महत्त्वाचं आहे, मग तो भावनिक असेल, वा अन्य कुठल्याही बाबतीतला असेल, स्वतःला स्थिर ठेवण्यासाठीचं मोठी कसरत असते, आणि ती कसरत पार करण्याची क्षमता सुद्धा आपल्या प्रत्येकाकडे असतेच, फक्त त्या शक्तीचा आपल्याला शोध घेता आला आणि स्वतःला आवरता आलं की सावरायला कोणीतरी यायला हवं ही अपेक्षा उरत नाही,

आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ,ज्या माणूस स्वबळावरती पार करू शकतो, फक्त गरज असते ती अविरत मेहनत करण्याची, जिथे व्यक्ती डगमगते, नेमकं तिथेच तोल जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे स्वतःला कधी डगमगू देऊ नका ,त्यासाठी स्वतःला आवरता यायला हवं ,

आपल्या सर्व वस्तू आवरायला नेहमीच आपल्याकडे आई असते, घरातील जबाबदार व्यक्ती असतात, त्यामुळे आपल्याला कधीही ते आवरत बसायचं याविषयी काहीही वाटत नाही, आई मात्र आपल्याला बऱ्याचदा त्याविषयी बोलताना दिसते ,तेव्हा मात्र त्याचं महत्त्व वाटत नाही, परंतु जेव्हा एखाद्या होस्टेलला राहण्याची वेळ आपल्यावर येते, तेव्हा आपण आपल्या वस्तू आवरायला शिकतोच ,सांगायचा हेतू हाच की वस्तू असो वा आपण स्वतः जे आपलं असतं, त्याला आपणच जपायचं असतं, प्रत्येक वेळी आपल्याला कोणाचा आधार मिळेल, प्रत्येक वेळी कोणाचा तरी खांदा मिळेलच, असे नाही ,आणि जी व्यक्ती स्वतःला कणखर बनवते ,स्वतःला आवरायला शिकते ,त्या व्यक्तीला मात्र कुणाकडून सावरण्याची अपेक्षा राहत नाही,

कारण ती व्यक्ती स्वतःला तितकच सक्षम बनवण्यात आपला वेळ खर्च करते ,स्वतःला आवरण्याचा एक फायदा हा सुद्धा असतो ,की ज्यांना वाटते की आपल्या शिवाय यांचं काहीही होणार नाही, अशांना कळून चुकते, की कुणाशिवाय कुणाचं काहीही अडत नाही , विधात्याने प्रत्येकाला शक्ती प्रदान केलेली आहे, आपण निमित्त मात्र असतो, स्वतःला आवरण्यात आपला वेळ घातला ,तर कोणाच्या सावरण्याची अपेक्षा राहतच नाही….


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “स्वतःला आवरलं की सावरायला कोणीतरी यायला हवं ही अपेक्षा उरत नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!