Skip to content

स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर न पडल्यास अवतीभवतीची वैचारिक पेरणी जाणवत नाही.

स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर न पडल्यास अवतीभवतीची वैचारिक पेरणी जाणवत नाही.


हर्षदा पिंपळे


“मधुरा….अगं कितीदा तुला आवाज द्यायचा गं,

जरा म्हणून बाहेरच्या जगात तुझं लक्ष नसतं.काय चाललय काय नाही ….काही म्हणजे काही लक्ष नसतं तुझं.कसं होणार गं तुझं?”

शेजारी असलेल्या मंजिरी काकू मधुराला आवाज देऊन अक्षरशः दमल्या.

“काय ओ काकू, का आवाज देताय इतक्या. काही हवय का तुम्हाला?मी माझं काम करतेय मला कसं काही ऐकू येईल. मी माझ्या विश्वात रमलेली असताना माझं लक्ष नसतं इकडेतिकडे. मी कामात नसेल तेव्हा आवाज देत जा.” मधुरा म्हणाली.

“अगं,विश्वात रमणं वेगळं गं बाई, तुझं आपलं नेहमीचच आहे गं.कधीतरी त्या चौकटीबाहेर बघ.तुझी ती मानसिक चौकट आता तरी उघड.असं एकाच चौकटीत राहणं कसं बरं जमतं तुला?तुला काय वाटलं मला काही कळत नाही का?तुझी मंजिरी काकू इतकीही अडाणी नाही गं.चार पुस्तकं शिकली आहे मीही.आणि तुझ्यापेक्षा चार पावसाळेही जास्तच पाहिलेत गं.” मंजिरी काकू म्हणाल्या.

“काकू,का बोअर करताय उगाच,काही काम असेल तर बोला नाहीतर तुम्ही येऊ शकता.”

मधुरा काकूंना म्हणाली.

“नाही, काही नाही गं बाई..करं तुझं काय करायचं ते”.

असं म्हणून मंजिरी काकू तिथून निघून गेल्या.

मधुरा कायम अशीच वागायची.तिने स्वतःभोवती आखून घेतलेल्या चौकटी वेगळ्याच होत्या.तिला कायम तिच्या चौकटीमधील गोष्टी आवडायच्या.आणि तिने अशा काही चौकटी आखून घेतल्या होत्या की ज्यामुळे ती एका कोषातच अडकून राहिली. मधुराची जडणघडण फारशी नीट झाली नाही. जेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली त्यावेळेस मात्र ती खूप गडबडली. सभोवताली असणारं तिच्या चौकटीबाहेरचं होतं.तिला कोणत्याही गोष्टीची सवयच नव्हती.

“मला अशी माणसं आवडत नाही. मला फक्त तशीच माणसं आवडतात.अशांशी मैत्री नकोच.मी अशीच आहे.मला असच रहायला आवडतं.मला याच गोष्टी करायला आवडतात आणि मी त्याच करणार.मला इतकच जमतं.मला एवढच करायला हवं.ते तसच असतं.ती लोकं तशीच असतात. मी इथेच ठीक आहे.”

अशा चौकटीमधून कधीच बाहेर न पडणाऱ्या मधुराला बाहेरची वैचारिक पेरणी कधी जाणवलीच नाही.

चौकट म्हणजे केवळ नियमांचीच चौकट असते असं नाही. आणि चौकट म्हणजे केवळ दुसऱ्यांनी आपल्यासाठी आखलेली नसते.आणि नेहमीच ही चौकट सामाजिकही नसते.वेगवेगळ्या प्रकारच्या चौकटी आपल्या आयुष्यात आहेत. आणि त्यापैकीच एक मानसिक चौकटही आहे.ही चौकट जरी एखाद्या कम्फर्ट झोनसारखं वाटत असेल तरीही ही चौकट काही कम्फर्ट झोन नाही.ही एक चौकटच आहे.आणि कित्येकांनी अशी स्वतःची मानसिक चौकट आखून घेतलेली दिसते.कित्येक लोकं स्वतःच्या मानसिक चौकटीमध्ये इतके अडकलेले असतात की त्यांना बाहेर काय चाललय काहीच कळत नाही. ते स्वतःच्या मानसिक चौकटीतून बाहेर पडत नाहीत म्हणून त्यांना आजूबाजूला असणारी वैचारीक पेरणी जाणवतही नाही.

तुम्हीही अशाच कोणत्या मानसिक चौकटीत राहून आयुष्य जगत आहात का? तुम्हालाही आजूबाजूला असणारी वैचारिक पेरणी जाणवत नाही का?

असं असेल तर थोडा फार बदल स्वतःमध्ये करणं आवश्यक आहे.कारण स्वतःची मानसिक चौकट सोडून बाहेरच जायचं नाही म्हणजे अवघड आहे. जोपर्यंत आपण स्वतःची मानसिक चौकट सोडत नाही तोपर्यंत आपल्याला आजूबाजूची वैचारिक पेरणी जाणवणारच नाही.आणि अशा वैचारिक पेरणीपासून आपण कायमच अलिप्त राहिलो तर आपल्यामध्ये नवीन जाणीवा,नवीन विचार समृद्ध होण्याचे चान्सेस कमी होऊ शकतात.त्यामुळेच आपली स्वतःची मानसिक चौकट सोडून बाहेर येणं महत्वाचं आहे.

मान्य आहे की, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी असते.प्रत्येकाची वागण्या-बोलण्याची पद्धतही वेगळी असते. प्रत्येकाच्या स्वतःविषयीच्या चौकटीही वेगवेगळ्या असतात.आणि सहसा त्या मोडून बाहेर जावं असं कुणाला वाटतही नाही.(अर्थात त्या चांगल्या असतील तर गोष्ट वेगळी आहे.)कुणाच्या चौकटी अत्यंत निरर्थक असतात तर कुणाच्या चौकटींना चांगला अर्थ असतो.चौकटी असणं वाईट आहे असं नाही परंतु त्यामुळे जर आपल्या जडणघडणीत काही अडथळा निर्माण होणार असेल तर त्या चौकटीच्या कोषातून थोडं बाहेर निघणं गरजेचं आहे.

म्हणून, कधीतरी स्वतःची मानसिक चौकट सोडून बाहेरच्या विश्वात डोकावून पहा.

पहा,विचार करा.अनुभव घ्या. अनुभवातून नक्कीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!