Skip to content

स्वतःच्या असण्याला जपण्यासाठी हसणं जपायला हवं.

स्वतःच्या असण्याला जपण्यासाठी हसणं जपायला हवं.


हर्षदा पिंपळे


“Life is too much better when you are laughing…..”

काय पटतय नं….?

मित्रांनो, केवळ शरीराने जिवंत असणं म्हणजे आपलं आयुष्य नाही.त्याने आपलं असणं ‘असणं’ राहत नाही. आपलं असणं म्हणजे आपलं हसणं आहे.आणि स्वतःच असणं जपायच असेल तर आधी आपल्याला आपलं हसणं जपायला हवं.

हसणं हा आपला आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि जर तोच भाग आपण सहजासहजी काढून टाकला तर आयुष्य कसं असेल काही सांगता येत नाही.मला सांगा,सतत रडणाऱ्या चेहऱ्याकडे पाहून कुणाला प्रसन्न वाटतं….?? सतत रडका,हिरमुसलेला चेहरा पहायला कुणाला आवडतं…?? आणि यामुळे तर अवतीभवती असणारं वातावरण देखील गढूळ होऊन जातं.हसणाऱ्यालाही वाटतं की ‘अरे यार हा असा उदास उदास बसलाय मी हसलो तर उगाच ते कसं वाटेल…?’

म्हणून अशावेळी हसणाराही त्याचं हसणं थांबवतो.पण सातत्याने जर असं होत असेल तर हे कसं चालायचं…?

असं म्हणतात फुलपाखरू चौदा दिवस जगतं पण भरभरून जगतं. आता तुम्ही म्हणाल की ‘ आम्ही काही फुलपाखरू नाही…’ मान्य आहे की आपण फुलपाखरू वगैरे नाही. परंतु फुलपाखराकडून आपण आयुष्य कसं जगायच हे नक्कीच शिकू शकतो.वेगवेगळ्या रंगानी सजलेल्या फुलपाखराचा जगण्याचा फंडा काही वेगळाच आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने भिरभिरत रहायच हाच त्याच्या आयुष्याचा साधा सरळ उद्देश असावा.भिरभिरणं ,या फुलांवरून त्या फुलांवर बागडणं म्हणजे त्या फुलपाखराची ओळख आहे. त्याचं असणं म्हणजे त्याचं भिरभिरणं आहे.जोपर्यंत आहे तोपर्यंत बिंधास्त बागडता यायला हवं.श्वास मिटल्यावर बागडता थोडीच येणार आहे….?

पहा,इतकं साधं सोपं जगण्याच ,आपल्या असण्याच सार फुलपाखरू सहज सांगून जातं.त्याच्याकडून काहीतरी शिकायला हवं नं….??

मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच की आपल्या हसण्याचा आणि आरोग्याचा (मानसिक आणि शारीरिक) अगदी जवळचा संबंध आहे. आपलं हसणं तंदुरुस्त असेल तरच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते.त्यामुळे आपलं आरोग्य जपायच असेल तर हसणही जपायला हवं.

विज्ञानानुसार, हसण्याने आपलं आयुष्य वाढतं असं म्हणतात.त्यामुळे माणसाने शक्य होईल तितकं हसायला हवं.चेहऱ्यावरील स्नायू सक्षम राहण्यासाठी हास्य म्हणजे एक उत्तम उपाय आहे.चेहरा ताजातवाना राहणे,रक्ताभिसरण सुरळीतपणे चालू असणे,रोगप्रतिकारशक्ती वाढणे, मन प्रसन्न राहणे यांसारख्या गोष्टींमध्ये हास्याचा खूप मोठा वाटा आहे.

हसण्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य निरोगी राहते.आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपण पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. पण आरोग्य जर निरोगी हवं असेल तर आधी हसायला हवं.सतत नैराश्य, चिंता ,रडणं यामुळे आरोग्य बिघडायला किंचितही वेळ लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने रोज हसणं आवश्यक आहे.

एखाद्या फोटोसाठी आपण सहज स्मितहास्य करतो.परंतु हास्याच्या लहरी ठरवून निर्माण करता येत नाही. त्या अंतर्मनातून याव्या लागतात. ठरवून हसणं नी अंतर्मनातून आलेलं नैसर्गिक हास्य यामध्ये किती फरक आहे हे एकदा अवश्य लक्षात घ्या.नैसर्गिक आलेलं हसू सहज सांगून जातं की आपल्याला ही गोष्ट आवडली आहे.आपण आनंदी आहोत.मित्रांनो हसणं म्हणजे आपल्या जिवंतपणाच लक्षण आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हसणं जपायला हवं.नुसतं काम करून, त्रागा करून, काळजी करून काय होणार आहे…? या धकाधकीच्या जीवनात आपण हसणच विसरत चाललोय.हसणं नसेल तर आपल्या असण्यालाही काहीच अर्थ उरणार नाही.

आपलं हसणं ही आपली एक प्रकारची ओळखच आहे.ती जपता यायला हवी.आपल्या हसण्याकडे पाहून समोरचाही खळखळून असला पाहिजे. आपल्या हसण्याने इतरांच ओझही आपण नकळतपणे हलकं करत असतो.मग हसायला काही प्रॉब्लेम आहे का…??स्वतःच्या , इतरांच्या आयुष्यातील जखमांवर थोडी हास्याची हळूवार फुंकर मारायला काय हरकत आहे…??

हसायला एखादा विनोदच हवा असही नाही आणि हसायला पैसे लागतात असही नाही. पण एक मात्र नक्की… हसण्याचं मोल हे चार अश्रू गाळल्यानंतर कळतं.त्यामुळे सारख सारख रडताना एकदा तरी विचार करा.सारख रडून रडून ताणतणावाला निमंत्रण द्यायच की थोडं हसून ताणतणावाला पळवून लावायच हे प्रत्येकाने ठरवायला हवं. इतकच नाही तर तुम्ही स्वतः आठवून पहा असे काही क्षण जेव्हा तुम्ही खळखळून हसला होता.आठवून पहा, शेवटच पोट दुखेपर्यंत कधी हसला होता…..??? कदाचित तुम्हालाही नक्कीच पटेल की…”Life is too much better when we are laughing..”

चला.. जाता जाता जमलं तर थोडं हसून घ्या….

आठवणींना सखे तू
उरात घे,
पावसाच्या या थेंबांना
एका सुरात घे,
यातलं जर काहीच
नाही जमलं तर सखे
तू वाळत टाकलेले
कपडे आधी घरात
घे…
(- एक पावसाळी कवी – unknown )

हसणं विसरला असाल तर हसायला शिका…हसणं जपायला शिका…हसणं असेल तरच तुम्ही आहात हे लक्षात घ्या.

So…वाचत रहा..हसत रहा..!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!