Skip to content

स्वतःचा हसरा फोटो ठेवणारी ही आपली एक उदास पिढी आहे.

स्वतःचा हसरा फोटो ठेवणारी ही आपली एक उदास पिढी आहे.


हर्षदा पिंपळे


“किती छान आहे गं डीपी…..आणि स्माईल तर विचारूच नको गं..! क्या कमाल की स्माईल हैं तुम्हारी…!अशीच हसत रहा कायम.”

“कोणता बरं डीपी ठेवू ? हा ठेवू की तो परवा काढलेला ठेवू ? नको नाहीतर त्यात इतकी काही हसले नाही.त्यापेक्षा आज काढलेलाच फोटो ठेवते.जरा जास्त हसरा आहे तो.तोच बेस्ट वाटेल.”

“चाईल्डहूड मेमरीझ् जाग्या होतील हा फोटो ठेवला की.किती छान वाटेल नं?आत्तापेक्षा तो लहानपणीचा चेहरा किती निरागस, क्युट आहे यार..”

“नको यार हाच फोटो ठेवते.रडका ठेवला तर उगाच लोकं बोलायची काहीतरी.वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण करायची.”

“अगं,तिने काय तो भारी फोटो ठेवलाय.

माझी स्माईल बघ ना यार,नीटच नाही दिसत.मलाही ठेवायचा आहे तसा फोटो.”

यातील काहीतरी नक्कीच प्रत्येकाला रिलेट होत असावं.

[Display Picture-DP]

डिस्प्ले पिक्चर अर्थात ज्याला आपण सगळे डीपी म्हणून संबोधतो.वेगवेगळ्या प्रकारचे डीपी आपण स्वतः ठेवतो किंवा इतरांचे डीपी आपण पाहतो.अनेकदा यामध्ये स्वतःचा फोटो ठेवला जातो.आपण यामध्ये किती आनंदी आहोत किंवा किती सुखात आहोत याचा अंदाज लोकं सहजपणे बांधतात.आपणही अनेकदा खूप सुखात आहोत,आनंदी आहोत असं भासवतो.

आता ते स्वतःसाठी की इतरांसाठी? हे ज्याचं त्यालाच ठाऊक !

[वाचकहो, आधी असं काही नव्हतं.काळानुसार सगळच बदलत चाललय. प्रगत तंत्रज्ञानामुळे तर अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. मोबाईल ज्यामुळे आपण दूरवरच्या व्यक्तीशीही कनेक्टेड राहू शकतो.आपल्या सगळ्या गोष्टी सहजपणे एका क्लिकवर शेअर करू शकतो.हाच मोबाईल ज्यामध्ये इन्स्टा, फेसबुक, व्हाट्सएप सारखी विविध प्रकारची एप्लिकेशन्स आहेत. आणि यामध्ये वेगवेगळी फिचर्स देखील उपलब्ध असतात.आणि त्यापैकीच एक म्हणजे डीपी.आणि याच डीपीमुळे अनेक गोष्टीही घडून गेल्या.]

असो,

तर खरचं आपण स्वतःचा हसरा फोटो ठेवतो.परंतु आपण आतून खरच आनंदी असतो का ? खरच मनापासून हसत असतो का ? आपलं हसणं ते केवळ स्वतःला आणि इतरांना आपण आनंदी आहोत असं भासवण्यासाठी असतं का ?

अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा इथे अवश्य विचार करावासा वाटतो.

आपण आतून एक आणि बाहेरून एक असं आयुष्य जगत असतो.आनंदी असणारी लोकं एकीकडे आणि आनंदी आहे असं भासवणारी लोकं एकीकडे.आपण कोणत्या प्रकारात मोडतो तेवढं मात्र प्रत्येकाने बघायला हवं.

जितका हसरा फोटो आपण ठेवतो तितकं आनंदी अनेकदा आपण नसतोच. आता प्रत्येकाचा हा हसरा डीपी ठेवण्यामागचा उद्देश नक्कीच वेगळा असू शकतो.

[◆आपण आनंदी नसलो म्हणून काय झालं ? पण आपल्या चेहऱ्यावर असणारं हसू पाहून कुणीतरी नक्कीच आनंदी होऊ शकतं.

◆आपला रडका चेहरा इतरांना का दाखवायचा ?आपली दुःखं जगासमोर का मांडायची ? ]

साधारणपणे अशी विचार करणारी बरीचशी लोकं आपल्या अवतीभवती आपण पाहतो.अनेकदा आपणही यामध्येच मोडतो.

हसरा फोटो ठेवणारी ही पिढी फक्त फोटोतच हसते.मात्र त्यांच्या अंतर्मनात काहीतरी वेगळच चालू असतं.आयुष्यात दुःखं, कलह कोणते ना कोणते प्रॉब्लेम हे चालू असतात. खरं तर

वर वर हसू आणि मनामध्ये आसू अशी आपली अवस्था असते.या अशा खोट्या वागण्याला काय अर्थ ? हसण्याचं खोटं नाटक कशासाठी?

मित्रांनो, हसरे चेहरे ठेवून स्वतःचं दुःखं[स्वतःसाठीही] लपवून ठेवणारी, आतल्या आत कुढत राहणारी ही आपली उदास पिढी आहे असचं वाटतं.

हा असा मुखवटा घेऊन का वावरत असतो या जगात तेच कळत नाही.आपलं आभासी जगही इतकं फसवं,खोटं असतं का हो ?

हसरा फोटो फक्त नावाला.त्या हसऱ्या फोटोमागे कितीतरी उदासीनता दडलेली असते.असं हे उदास आयुष्य अजून किती दिवस जगायचं ? हा असा खोटा खेळ स्वतःच स्वतःशी किती दिवस खेळत रहायचा ?

सॉरी मित्रमैत्रिणींनो पण चुकतोय आपण…. !

हसणं म्हणजे आपलं असणं आहे.आणि या हसण्याला आपणच जपायला हवं.पण ते हसणं नैसर्गिक हवं.नेहमीच उसणं हसू काय उपयोगाचं ? आणि किती दिवस हं असं हसरे फोटो लावून उदास आयुष्य जगायचं ?

त्यापेक्षा ते फसवे फोटो काढून टाका…नाहीतर मग जरा मनापासून हसायला शिका.स्वतःच्या असण्यासाठी, हसण्यासाठी थोडी मेहनत घ्या. थोडं खरं खरं हसून पहा.ते हसरे फोटो अजून हसरे दिसतील.स्वतःचा हसरा फोटो ठेवणारी ही आपली एक उदास पिढी आहे असं तरी वाटणार नाही.

अर्थात कसा डीपी ठेवायचा आणि कसा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही या विषयावर थोडा विचार करून पहायला कुणाची हरकत नसावी. थोडा विचार करून पहा.आपण स्वतःशीच कसे वागतोय हे तपासून पहा.

शेवटी प्रत्येकाने छान, स्वच्छ आणि पारदर्शी आयुष्य जगावं असं वाटतं.बाकी काही नाही.

म्हणून,काळजी घ्या, हसत रहा,आपलं आयुष्य खूप सुंदर आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *