सुखी व्हायला अजिबात खर्च नाही, पण सुखी आहे हे दाखवायला खर्चच खर्च आहे.
मेराज बागवान
सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख हे मानण्यावर असतं. असे सुखाच्या बाबतीत म्हटले गेलेले आहे.आणि ते खरेच आहे. म्हणजेच काय, सुखी व्हायला अजिबात खर्च नाही, पण सुखी आहे हे दाखवायला खर्चच खर्च आहे. तर सुख नक्की कशात असते? आणि सुखी आहे हे दाखविणे म्हणजे काय? दोन्ही एकच गोष्टी आहेत, पण समजल्या मात्र वेगवेगळ्या जातात.
सुख म्हणजे, आत्मिक समाधान,शांती आणि प्रसन्नता.हे असे सुख मिळवायला फार खर्च लागत नाही.आहे त्यात समाधानी वृत्ती असेल आणि विधात्याने जे दिले आहे , किंवा जे तो देत आहे त्याबद्दल धन्यवाद देण्याची वृत्ती असेल तर आपण खऱ्या अर्थाने सुखी आहोत असे म्हणता येईल.पण जगाला तुम्ही सुखी आहे हे दाखवायला अनेक गोष्टींचे जणू प्रदर्शनच करावे लागते. आमच्याकडे ही गाडी आहे, हे घर आहे, अमुक एक ब्रँडेड वस्तू आहे आणि म्हणून आम्ही सुखी आहोत असे जगाला किमान भासवणारे आहेतच.
आजकाल भौतिक सुखवस्तू असतील तर माणूस सुखी आहे असे जणू गृहीतच धरले जाते.सोशल मीडिया वर ट्रिप चे फोटो टाकले की अमुक एक व्यक्ती खूप खुश आणि सुखी आहे असे समीकरण च जणू बनले आहे. म्हणूनच हे सुख दाखवायला खर्चच खर्च होताना दिसतो.पण हे ह्या सगळ्या सुखी समजल्या जाणाऱ्या गोष्टी असतातच असे नाही.किंबहुना अशी माणसे तर आतून फार दुःखी असतात.आणि हेच दुःख लपविण्यासाठी ‘कॅमेरा’ चा आधार घेतला जातो.जवळपास सगळीकडे हीच परिस्थिती आहे.
सुखी हे फार छोट्या छोट्या गोष्टींमुळे होता येते.त्याला विशेष असा काही खर्च येत नाही. जेव्हा कुटुंबियातील सर्वजण एकत्र बसून ,हसत खेळत जेवण घेत असतात, तो क्षण खऱ्या सुखाचा असतो.मग ते जेवण फक्त चटणी-भाकरी किंवा वरण-भात असेल तरी काही फरक पडत नाही. जेव्हा मन मोकळे करण्यासाठी हक्काचे मित्र-मैत्रिणी जवळ असतात तो क्षण सुखाचा असतो.जेव्हा चेहऱ्यावर निखळ हास्य असते तो क्षण सुखांनी भरलेला असतो.जेव्हा ‘आपलं माणूस’ आपल्याबरोबर प्रत्येक्षणी सोबत असतं, तो क्षण खऱ्या सुखाचा असतो.असे हे बिनखर्चचे सुख.
पण वरील सर्व गोष्टी कुठेतरी हरवल्या असतील तर मात्र त्या ओढून ताणून आणल्या जातात.त्याला भौतिक गोष्टींचे कुंपण घातले जाते आणि सुखी आहे हे दाखवत माणूस आयुष्य जगत राहतो.मग ते ‘सिनेमागृहात जाऊन फोटो काढणे असो अथवा भव्यदिव्य मौल मध्ये जाऊन खरेदी करणे असो…अशा विविध गोष्टींचे प्रदर्शनच मांडले जात आहे.तसे पाहायला गेले तर आजकाल हे असे दिखाऊ जीवन दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत आणि कोणालाच यात विशेष असे काही वाटत नाही.आणि यामुळेच खरे सुख कुठेतरी लुप्त पावत आहे.
एखाद्या निसर्गरम्य किंवा शांत ठिकाणी सर्व बाकीच्या भौतिक गोष्टी बाजूला ठेवून फक्त निवांत बसणे आणि स्वतःच्या सानिध्यात थोडा काळ व्यतीत करणे, यात देखील खूप मोठे सुख आहे.हे कधी कधी आपल्या लक्षात येत नाही.आणि सतत आयुष्याकडून , किंवा कोणाकडून ना कोणाकडून अपेक्षा ठेवता ठेवता सुखी आहे दाखविण्यावर खर्चच खर्च होतो.
काही व्यक्ती मात्र असतात ,थोड्या अलिप्त राहणाऱ्या, स्वतःच्या जगात मग्न असणाऱ्या.अशा व्यक्ती कोणाकडून कुठल्याच अपेक्षा ठेवत नाहीत.मात्र इतरांसाठी सदैव उपलब्ध असतात.काही जण अशा व्यक्तींविषयी विचार देखील करतात, “अरे ह्याला काही झाले नाही ना/ती सुखी तर आहे ना..?” .कारण आजकाल ‘सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणे म्हणजे जिवंत असणे’ असे काही जणांना वाटते.आणि हेच जर का तुम्ही नसाल तर तुम्ही जणू अस्तित्वातच नाही, असे काही जण विचार करतात.आजकाल तंत्रज्ञान प्रचंड वाढलेले आहे.आणि त्याचे काही असेही दुष्परिणाम आपण भोगत आहोत.ज्यामध्ये खर्चच खर्च करावा लागतो आहे.
जेव्हा माणूस वैचारिकरित्या स्वतंत्र असतो, आपले मत काय, निर्णयक्षमता असणे, भावनिक समतोल साधता येणे, वर्तमानात जगता येणे आणि कोणत्याही परिस्थितीत फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने सुखी असणे होय.ह्या सगळ्यासाठी फक्त एक ‘हेल्दी मानसिकता’ असणे गरजेचे असते आणि त्यासाठी कोणता खर्च करावा लागत नाही.
मात्र ह्या उलट सुखी आहे हा दाखवायला हट्टच असेल तर मात्र तुम्हाला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतील.मग ते भौतिक खर्च असोत अथवा इतर कोणतेही खर्च असोत.
ह्यातून फक्त आणि फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते.ती म्हणजे, वर्तमानात जो जगतो तोच ह्या जगात टिकतो आणि सर्व प्रकारची सुखे तो स्वतःकडे आकर्षित करतो.
स्वतःची काळजी घ्या….!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khup chan agadi satya paristhiti