Skip to content

प्रत्येकाचे गैरसमज दूर करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका!

आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, आपण काहीतरी चांगल्या हेतूने बोलतो किंवा वागतो, पण समोरची व्यक्ती त्याचा वेगळाच अर्थ काढते. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जातो, आपल्या हेतूंवर शंका घेतली जाते किंवा आपल्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतले जातात. अशा वेळी आपल्याला अस्वस्थ वाटते. आपली बाजू समजावून सांगावी, आपल्याबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर करावा आणि समोरच्या व्यक्तीला आपले खरे हेतू कळावेत, अशी तीव्र इच्छा निर्माण होते.

पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देत बसणे ही आपली जबाबदारी नाही. कारण प्रत्येकाला आपली बाजू समजून घ्यायचीच असेल असे नाही.

मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर माणूस एखाद्या घटनेचा अर्थ आपल्या पूर्वानुभवांनुसार, विचारसरणीनुसार, भावनिक अवस्थेनुसार आणि स्वतःच्या समजुतीनुसार लावत असतो. त्यामुळे एकाच घटनेकडे दोन व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात. आपण जे बोलतो त्यामागचा हेतू वेगळा असतो आणि समोरची व्यक्ती त्याचा अर्थ वेगळा लावू शकते. यालाच अनेकदा गैरसमज म्हणतात.

अशा वेळी आपण सतत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. आपले म्हणणे पुन्हा पुन्हा सांगतो. आपल्याला चुकीचे समजले जाऊ नये म्हणून प्रत्येक कृतीचे समर्थन करतो. परंतु याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मानसिक थकवा, चिडचिड, चिंता आणि भावनिक अस्वस्थता वाढू शकते.

यामागे एक महत्त्वाचे मानसशास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे इतरांच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा. आपल्याबद्दल इतरांनी चांगलेच विचार करावेत, आपल्याला योग्य समजावे आणि आपली प्रतिमा चांगली राहावी, असे प्रत्येकाला वाटत असते. ही इच्छा नैसर्गिक आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय विचार निर्माण होतील, हे आपल्या नियंत्रणात नसते. आपण फक्त आपले वर्तन, आपले शब्द आणि आपली प्रतिक्रिया नियंत्रित करू शकतो.

म्हणूनच इतरांच्या विचारांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे.

काही लोकांना आपले स्पष्टीकरण ऐकायचेच नसते. त्यांना आधीच आपल्याबद्दल एक मत तयार झालेले असते. अशा वेळी आपण कितीही समजावून सांगितले तरी त्यांचा दृष्टिकोन बदलत नाही. उलट आपण जितके जास्त स्पष्टीकरण देतो, तितके अधिक मानसिक त्रासाला सामोरे जातो. त्यामुळे प्रत्येक वादात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा काही वेळा शांत राहणे अधिक योग्य ठरते.

याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी गप्प बसावे किंवा आपली चूक मान्य करावी. जिथे आपली चूक आहे तिथे ती प्रामाणिकपणे स्वीकारली पाहिजे. जिथे आपल्या बोलण्यामुळे कोणाला त्रास झाला आहे, तिथे माफी मागितली पाहिजे. नातेसंबंध महत्त्वाचे असतील तर संवाद साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र समोरची व्यक्ती वारंवार आपल्याला चुकीचे ठरवत असेल, आपला अपमान करत असेल किंवा आपल्याला मानसिक त्रास देत असेल, तर स्वतःच्या मर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे.

मानसशास्त्रामध्ये याला Emotional Boundaries म्हणजेच भावनिक मर्यादा असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या भावना, विचार आणि प्रतिक्रिया यांची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही. इतरांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःचे मानसिक स्वास्थ्य गमावणे योग्य नाही.

आपले संपूर्ण आयुष्य लोकांना आपण चांगले आहोत हे सिद्ध करण्यात घालवू नका. कारण आपली किंमत प्रत्येकाच्या मतांवर अवलंबून नसते. काही लोक आपल्याला समजून घेतील, काही लोक गैरसमज करून घेतील, तर काही लोक आपल्याला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ही आयुष्याची वास्तविकता आहे.

आपण प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगले विचार निर्माण करू शकत नाही. पण आपण स्वतःशी प्रामाणिक राहू शकतो. आपले वर्तन चांगले ठेवू शकतो. आपल्या चुका सुधारू शकतो आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो.

लक्षात ठेवा, शांत राहणे म्हणजे हार मानणे नाही आणि प्रत्येक वेळी स्पष्टीकरण न देणे म्हणजे अहंकार नाही. कधी कधी शांत राहणे हा स्वतःच्या मानसिक शांततेला दिलेला सन्मान असतो.

म्हणून प्रत्येकाची गैरसमज दूर करण्यात आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचे आहे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. ज्यांना समजून घ्यायचेच नाही, त्यांच्यामागे स्वतःला त्रास करून घेऊ नका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते स्वतःला सिद्ध करण्यात नाही, तर स्वतःला समजून घेत आनंदाने जगण्यात घालवायचे आहे.

धन्यवाद.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयु‌ष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


सर्व लेख व्हिडिओच्या रूपात पहा.

👉🏽 क्लिक करा 👈🏽

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!