Skip to content

‘यामध्ये सुद्धा माझीच चूक होती’.. असं सतत स्वतःला दोषी ठरवू नका.

‘यामध्ये सुद्धा माझीच चूक होती’.. असं सतत स्वतःला दोषी ठरवू नका.


मेराज बागवान


चूक प्रत्येक माणसाकडून होते.कोणी आयुष्यात कधीच कोणतीच चूक केली नाही, हे सहसा होऊच शकत नाही.समाजात, घरात, कार्यालयात, मित्र-परिवारात वावरत असताना अनेकदा आपल्या हातून चुका होतात. कळत-नकळत चुकांचे सत्र हे चालूच असते.पण प्रत्येक वेळी आपलीच चूक असेल असे नाही.

पण तरी देखील आपण काही जण चूक नसली तरी देखील समजूतदारपणा दाखवतो , कारण त्यांना नाती जपायची असतात. काही काही वेळेस आयुष्य चुकांमुळे विस्कळीत होते आणि मग आपण त्रासून, ताणामुळे सतत स्वतःलाच दोष देतो आणि म्हणतो ‘यामध्ये सुद्धा माझीच चूक होती’.

पण खरेच प्रत्येक वेळी असे करणे गरजेचे असते का?

चूक अनेक प्रकारची असते.कधी कार्यालयात काम करीत असताना कामात चूक होते.व्यावसायिक जीवनात देखील नकळत अनेक चुका होतात.नात्यांमध्ये देखील हातून बरयाच वेळेस काही चूक होते.चूक कोणतीही आणि कोणत्याही बाबतीत झालेली असो, त्यामुळे त्रास मात्र नक्कीच होतो.स्वतःला तसेच इतरांना देखील.मात्र अशा वेळेस ही चूक का झाली या वर विचार केला पाहिजे आणि त्यावर योग्य तो मार्ग देखील शोधता आला पाहिजे.तसेच हीच चूक परत घडणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे.

काही काही वेळेस आयुष्यात एखाद्याकडून अशी चूक होते की त्यामुळे संबंध आयुष्यच विस्कळीत होते आणि मोठी उलथापालथ होते. जसे की , नोकरी लावतो असे म्हणणार्याला एक मुलगा लाखभर रुपये देतो.मात्र पैसे घेऊन तो व्यक्ती फरार होतो आणि त्या बिचाऱ्या मुलाची फसगत होते.त्या मुलाने मोठ्या विश्वासाने त्या माणसाला पैसे दिलेले असतात.

पण शेवटी नको ते घडते.मग तो मुलगा सदैव स्वतःलाच दोष देत बसतो.आणि म्हणतो, “सगळी चूक माझीच आहे, मीच अतिविश्वास ठेवला” आणि आयुष्यभर तो स्वतःला दोषी मानतो.या मध्ये मुलाची सुरवातीला चूक जरी असली, की त्याने अतिविश्वास दाखविला, तरी देखील पूर्ण चूक त्याचीच आहे असे नाही.म्हणूनच त्याने स्वतःला दोष देण्याऐवजी , त्या चुकीतून शिकले पाहिजे.आणि कोणावरही विश्वास ठेवण्याआधी पूर्ण खात्री करून घेतली पाहिजे.

नात्यांमध्ये देखील गैरसमज होऊन एकमेकांच्या हातून चुका होतात आणि मग नात्यांमध्ये दुरावा येतो.कधी कधी नाते कायमचे संपते तर कधी नात्यांमध्ये फूट पडते.ह्या सगळ्यांमुळे मनस्ताप होतो, तणाव निर्माण होतो आणि मग वैतागून ती व्यक्ती स्वतःलाच दोष देत बसते.पण टाळी एका हाताने वाजत नाही. नात्यांमध्ये तर फक्त एकाचीच कोणाची तरी चूक आहे असे सहसा होत नाही.

त्यामुळे सतत स्वतःला दोष देत बसने योग्य नाही.मात्र स्वतःच्या हातून खरेच चूक झाली असेल तर मोट्या मनाने ती मान्य करता आली पाहिजे.त्याबद्दल समोरच्याकडे माफी देखील मागितली पाहिजे.पण मनात आयुष्यभर ती गोष्ट धरून ठेवू नये.कारण , चूक प्रत्येकाकडून होते.पण आयुष्यभर त्या चुकीच्या शिक्षा मिळावी असे नसते.म्हणून स्वतःला ‘यामध्ये सुद्धा माझीच चूक होती’.. असं सतत स्वतःला दोषी ठरवू नका.

जे घडणार असते ते घडतेच.चूक झाली तरी ती त्वरित सोडवता आली पाहिजे आणि मान्य देखील करता आली पाहिजे. पण ” माझी यात काय चूक, मी काही केलेले नाही,सर्वस्वी चूक तुझीच आहे” हा दृष्टिकोन देखील योग्य नव्हे. आयुष्यात कधी कधी परिस्थितीच अशी असते की आपण एखादी कृती करतो , कदाचित ती परिस्थिती त्या कृतीसाठी, चुकीसाठी जबाबदार असते. पण अशा वेळेस जी चूक होते ती नकळत झालेली असते.त्यामुळे ही सर्व पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊन स्वतःला दोषी मानणे थांबविले पाहिजे.

आपण जर का सतत स्वतःलाच दोष देत बसलो, ‘नेहमी माझीच चूक असते’ असे म्हणत राहिलो तर नकळत त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो.मन सैरवैर होते.जणू काही आपण खुप मोठा अपराधच केला आहे असे वाटू लागते.कशातच मन लागत नाही.आत्मविश्वास कमी होतो.व्यक्ती समाजापासून दूर राहू लागते.पण एक चूक झाली म्हणून संपूर्ण माणूसच चुकीचा आहे असा होत नाही.म्हणूनच प्रत्येक वेळी स्वतःचीच चूक आहे असे स्वतःला वदवू नका.

आयुष्य विविध घटनांनी भरलेले असते.कोणतीही एक चूक आपले संपूर्ण आयुष्य ठरवत नाही.त्यामुळे एक चूक झाली म्हणजे मी संपूर्ण आयुष्यातच अपयशी झालो/झाले असे काही नसते.मात्र त्या चुकांमधून प्रत्येकवेळी धडा घेता आला पाहिजे आणि आयुष्यात त्या प्रमाणे योग्य ये बदल करता आले पाहिजेत.आणि एकाच चुकीची पुनरावृत्ती केली नाही पाहिजे.

आपण जसा विचार करतो तसे आपण घडतो.म्हणून मनाला काही बाजावण्याआधी नीट विचार करावा.कारण मन हळूहळू तेच करते जे आपण त्याला सांगतो. मग जर ‘माझीच चूक आहे ,माझीच चूक आहे’ असे मनात म्हणत राहिलो तर मन देखील नकारात्मक कृतीच करेल आणि त्यामुळे आयुष्य पुढे सरकण्याआधी नैराश्याने ग्रासले जाईल.

म्हणूनच सारासार विवेकबुद्धी जागृत ठेवून कोणताही विचार केला पाहिजे .कारण आपल्या मनात खूप मोठी ताकद असते. चला तर ‘चूक चूक’ चा गजर करण्यापेक्षा त्याच चुकीतून शांतीमय आणि समाधानी आयुष्याकडे वळूयात.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!