सोडून गेलेल्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ इच्छित असतील तर त्यांना स्वीकारावे का ?
अपर्णा कुलकर्णी
अजय विजय म्हणजे अगदी जय वीरूची जोडी. दिघे एकमेकांचे खूप घट्ट आणि छान मित्र. लांगोटी यार म्हणावे तसे. खरतर अजय विजय कॉलेजमध्ये एकमेकांना भेटले पण काहीच दिवसात इतके घट्ट मित्र झाले की एकमेकांसाठी जीव द्यायला ही मागे पुढे पहात नव्हते. एकदा अजयला रस्त्यावरून जाताना एक गाडी उडवून जाणार होती तितक्यात विजयने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अजयचा जीव वाचवला होता. दोघांनीही कॉलेज संपल्यावर एकत्रित व्यवसाय करायचा असे ठरवले होते. त्यावर दोघेही कायमच होते आणि बघता बघता तो दिवस आला. कॉलेज संपल्यावर दोघांनीही डिग्री सर्टिफिकेट मिळवले आणि व्यवसायाला सुरुवात केली.
दोघांनी मिळून उत्तम टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करायचे ठरवले होते. त्यासाठी लागणारी सगळी गुंतवणूक अजयने केली होती. थोडाफार हातभार विजयने पण लावला होता पण सत्तर टक्के गुंतवणूक ही अजयने केली होती. अजयची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. पण विजय हुशार होता मात्र त्याची आर्थिक बाजू कमकुवत होती. त्याला जरा कसेतरी वाटत होते त्याबाबत पण अजयने समजून सांगितल्यावर त्याने आलेला बेनिफिट त्याला देऊन टाकेन असे म्हटले होते आणि अजयने पण ते मान्य केले होते. झालं आता व्यवसाय सुरू होणार होता. बाकी सगळी व्यवस्था झाली होती.
गुढपाडव्याच्या मुहूर्तावर अजय आणि विजयने व्यवसायाची सुरुवात केली. अजय आणि विजय दोघेही मिळून कामाची जबाबदारी सांभाळत होते. टूर्ससाठी उत्सुक असलेल्या लोकांना व्यवस्थित माहिती सांगणे, त्यांना टूरसाठी तयार करणे, टुरच्या बसची व्यवस्था, तिथले हॉटेल्स, पर्यटकांची खाण्यापिण्याची सोय सगळे सगळे अगदी छान पार पाडत होते दोघेही.
कामाची वाटणी दोघांनी मिळून केली होती आणि त्यानुसार सगळेच उत्तम चालू होते. विजय बोलल्याप्रमाणे त्याने कामातून मिळत असलेला फायदा अजयला द्यायला सुरुवात केली होती. एक दिवस अजयचा आतेभाऊ त्याला भेटायला आला. अजय त्याला घेऊन ऑफिसमध्ये आला आणि त्याची विजय सोबत ओळख करून दिली. तिघांनी छान गप्पा मारल्या. मग अजय त्याला सोडायला घरी आला तेंव्हा तो आतेभाऊ म्हणाला,
अजय तुला एक सल्ला देतो. विजय तुझा खूप चांगला मित्र असेल पण मैत्रीत व्यवहार आणायला नको होतास तू. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. मी पण सुरुवातीला हॉटेल टाकताना माझ्या मित्राला पार्टनरशिपमध्ये घेतले होते सुरुवातीला सगळेच अगदी छान सुरू होते. पण नंतर मात्र तो गल्यातले पैसे चोरून घेऊ लागला, हीशोबात घोळ घालायला लागला. सुरुवातीला माझ्या लक्षात पण आले नाही पण एक दिवस मीच माझ्या डोळ्यांनी त्याला पैसे घेताना पाहिले आणि मग मात्र त्याच्या सोबतची पार्टनरशिप तोडून टाकली. आता माझा व्यवसाय मी एकटाच चालवतो. हे ऐकून अजय म्हणाला, माझा विजयवर खूप विश्वास आहे तो असे काहीही करणार नाही.
अनेक दिवस मध्ये निघून गेले, एकदा अजय ऑफिसमध्ये आला नेमके त्याच वेळी विजय गल्ल्यातून काही पैसे काढून घेताना त्याने पाहिले आणि त्याच्या आते भावाने सांगितलेले उदाहरण त्याच्या डोक्यात येऊन गेले. विजयने त्याला पाहिले आणि म्हणाला, पर्यटकांसाठी बसची सोय करण्यासाठी मी पाच हजार रु घेतले आहेत. अजय मानेनेच होकार देत हो म्हणाला आणि त्याने संध्याकाळी गल्ला चेक केला तर त्याला पाच हजार हिशोब लागेना. त्याने विजयला सांगितले तेंव्हा तो म्हणाला अरे सकाळी मीच घेऊन गेलो पाच हजार तेंव्हा अजय म्हणाला मी धरले ते पैसे हिशोबात तरीही अजून पाच हजार कमी आहेत. तू तर घेतले नाहीस ना पैसे ??
कारण तुलाच गल्ल्यातून पैसे बाहेर नेण्याची सवय आहे. त्याच्या या बोलण्यावर विजय खूप दुखावला. त्याने परोपरीने अजयला समजावण्याचा प्रयत्न केला पण अजय काही ऐकायला तयार होईना. अजयने त्याला तिथून जायला सांगितले. विजय खूप स्वाभिमानी होता, अजयच्या या आरोपावर त्याने त्याचा व्यवसाय सोडला आणि त्याच्या आयुष्यातून निघून गेला.
सहा सात महिने उलटून गेले, इकडे विजयने स्वतःची टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. आणि त्याला उत्तम प्रतिसाद पण मिळत होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये कामात गुंतून गेला होता तेंव्हा अजय त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला विजय कसा आहेस ?? विजयने लगेच त्याला बसायला खुर्ची दिली, चहा बिस्कीट मागवले. तेंव्हा अजयच्या डोळ्यात पाणी आले आणि तो म्हणाला मी चुकलो विजय. खूप चुकलो.
तुझी काहीही चूक नसताना मी तुला हाकलून दिले आणि तरीही तू माझ्याशी इतका चांगला कसा वागू शकतो ?? तू म्हणत होतास तेच बरोबर होते ते पैसे तू घेतले नव्हते आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने ते पैसे चोरले होते. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तू गेल्यावर पण गल्ल्यातला हिशोब लगात नव्हता अनेकदा पैसे कमी लागायचे. तेंव्हा मी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून त्याकडे नीट लक्ष दिले तेंव्हा माझ्या लक्षात आला खरा प्रकार.
पण मी मात्र तुझ्यावर आरोप करून खूप मोठी चूक केली होती, तुझ्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र गमावला होता. प्लीज माझी चूक पदरात घेशील का ?? मला माफ करशील विजय ?? तेंव्हा विजयने हसत त्याला मिठी मारली आणि मोठ्या मनाने त्याला माफ केले आणि म्हणाला, आज ना माझा मित्र माझ्याकडे परत येईल याची खात्री होती मला.
मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने असे प्रसंग येतात. आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची आणि प्रेमळ व्यक्ती कधीतरी कुठल्यातरी कारणाने दुरावते किंवा कायमची निघुन जाते आणि कालपरत्वे परत येते किंवा परत येण्याचा प्रयत्न करते पण त्या व्यक्तीला पुन्हा एक संधी द्यायची की नको ?? असा प्रश्न आपल्याला पडतो. मग कधी ती व्यक्ती प्रियकर, प्रेयसी असेल, नवरा बायको असतील किंवा मग विवाहापूर्वी चे काही नातेसंबंध असतील.
पण त्या नात्याला एक संधी द्यायची की नाही हे मात्र सर्वस्वी त्या त्या व्यक्तीवर किंवा मग घडलेल्या परिस्थितीवर अवलंबून आहे असे म्हणायला हवे. कशामुळे ती व्यक्ती दुरावली, त्याला आपण कुठे जबाबदार होतो का आणि नात्याला एक संधी देऊन जर सगळे सुरळीत होणार असेल तर ती संधी द्यायला काय हरकत आहे ?? मागे वळून बघताना एक संधी द्यायला हवी होती अशी रुखरुख मानला लागून राहायला नको. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि त्या त्या व्यक्तीची जागा दुसरे कोणीच कधीच घेऊ शकत नाही. नाही का ?? पण आपल्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला या सगळ्यात कुठे धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान!