ध्येय ही मोठी नाहीत तर स्मार्ट असावीत !!!
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
अशी खूप कमी लोक असतील ज्यांच आयुष्यात काही ध्येय नसेल. कारण प्रत्येक माणूस काही ना काही मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. यातून आपल्या आयुष्याला दिशा मिळत असते.
धेय्याची जर व्याख्या पाहिली तर असे दिसून येईल की ही अशी गोष्ट आहे जी मिळवण्यासाठी व्यक्ती काहीतरी विचार करते,तिच्या मनात ती गोष्ट मिळवण्याचं चित्र असत, कल्पना असते. त्यासाठी ती प्रयत्न करते. त्यासाठी प्लॅनिंग करते आणि हे मिळवत असताना ज्या काही अडीअडचणी येतात, संकट निर्माण होतात त्यांना सामोरे जाते.
अशी प्रत्येकाची काही ना काही ध्येय असतात. ध्येयहीन आयुष्य म्हणजे एक प्रकारे दिशाहीन आयुष्य. ज्याला काही अर्थ नसतो. आपण का आलो आणि आपल्या आयुष्यात काय केलं याचं उत्तर जर आपल्याकडे नसेल तर ते फक्त जिवंत राहणं होत. म्हणून जगण्याची इच्छा सतत ठेवण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मला का जगायचं आहे याचं उत्तर मला काहीतरी मिळवायचं आहे यात दडलेले आहे. आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम ही ध्येय करतात. पण अनेकदा असं होतं की लोकं ध्येय ठरवतात पण ते पूर्ण होतच असं नाही. ध्येय ठरवूनही, त्याविषयी विचार करून प्रयत्न करून ते का पूर्ण होत नाही? याचं कारण म्हणजे ध्येय लहान असो व मोठ मिळवायला कठीण असो वा सोप ते महत्वाच नाही.
या सगळ्यापेक्षा ध्येय हे smart पाहिजे. त्याच प्लॅनिंग smart असलं पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट मिळवायचा विचार करता म्हणजे ध्येय ठरवता तेव्हा ते स्मार्ट पद्धतीने ठरवलं पाहिजे. आताही नेमके स्मार्ट म्हणजे काय ते पाहू. तर या शब्दात सर्व काही दडलेल आहे.
S: (specific)- तर कोणतेही ध्येय तुम्ही ठरवत असाल तर ते स्पेसिफिक म्हणजे स्पष्ट आणि विशिष्ट पाहिजे. आपल्याला काय मिळवायचे आहे याची स्पष्टता पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे. नुसते मला मार्क मिळवायचे आहे त्यातून काही नीट स्पष्ट होत नाही. म्हणून ध्येय ठरवताना ते स्पेसिफिक असल तर पूर्ण करताना अडचणी येत नाहीत. उदाहरणार्थ, सहा महिन्यात वीस kg वजन कमी करणे.
M:(measurable)- कोणतेही ध्येय तुम्ही ठरवत आहात तर त्याचे मापन करणे गरजेचे आहे. त्याचं मापन करता आलं पाहिजे. ध्येय ठरवल्यापासून मी काल कुठे होतो आणि आत्ता त्यातून किती पुढे आलो, काय बदल झाले याचं मोजमाप करता आल पाहिजे, आपली प्रगती मोजता आली पाहिजे.
जर वजन कमी करायचं असेल तर सुरुवात केल्यापासून माझ्या वजनात काही फरक पडतोय का, त्यानुसार मी प्रयत्न करतोय का? याचं नियमित मोजमाप जर तुम्ही केलं तर आपल्याला आपल्या कामाची गती समजते व त्यानुसार आपण वाटचाल करतो.
A:(achievable)- कोणतेही ध्येय साध्य करता येईल असं असावं. अनेकदा आपण ठरवतो की मला हे मिळवायच आहे, ते मिळवायच आहे. पण यावेळी माझ्या त्या गोष्टी करण्यासाठीच्या क्षमता काय आहेत, त्या जर कमी पडत असतील तर त्यासाठी वेगळे काय प्रयत्न केले पाहिजेत, आजूबाजूचं वातावरण कस आहे? ती गोष्ट मिळवण्यासाठी जे घटक मला लागतील ते आहेत का? याचा विचार करा. कारण असाध्य ध्येय बाळगून ती अनेकदा पूर्ण होत नाहीत आणि परिणामी निराशा येते.
R:(realistic)- ध्येय ही वास्तववादी असली पाहिजेत. ती प्रत्यक्षात पूर्ण होतील अशी असावीत. दोन दिवसात मला वीस किलो वजन कमी करायचं आहे हे शक्य आहे का? वास्तवाला धरून आहे का? नाही. म्हणून अशा प्रकारची अवास्तव ध्येय ठेवू नयेत जी पूर्ण करता येणार नाहीत. वास्तविक असतील अशी ध्येय ठरवा.
T:(time bounded)- ध्येय जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा त्याला टाईम लिमिट लावा. असं केल्याने तुम्ही तेवढ्या वेळात होते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहता. तुमच्या समोर एक मर्यादा तयार होते. तेवढ्या कालावधीत आपल्याला ती गोष्ट मिळवायची आहे हे स्वतःला सांगता. त्यामुळे कामाला एक प्रकारची शिस्त येते आणि ते काम पूर्ण करण्याची शक्यता वाढते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट दिले जातात. ते पूर्ण करण्यासाठी ठराविक कालावधी दिलेला असतो तो यासाठीच.
अशाप्रकारे ध्येय ठरवताना ते अगदी स्पष्ट म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे अशा पद्धतीने, मापन करण्याजोगं, साध्य करण्याजोग, वास्तववादी आणि वेळ मर्यादा आखून ठरवलं तर नक्की यश मिळण्याची शक्यता वाढेल.
कारण कोणतीही गोष्ट करायची आहे, मिळवायची आहे असं म्हणणं सोप आहे पण ते कशा पद्धतीने मिळवायचं यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
So be efficient and make your goals smart!!!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Jabrdast
अतीशय सुंदर
छान