Skip to content

सिंगल पालकांसमोर येणारी आव्हान आणि त्यावर अशी यशस्वी मात करा.

सिंगल पालकांसमोर येणारी आव्हान आणि त्यावर अशी यशस्वी मात करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


कुटुंब,आई वडील, पालक हे माणसाला बळकटी देत असतात. मुलाच्या एकंदरीत आयुष्यावर पालकत्वाचा परिणाम हा होतच असतो. मुलांचा सर्वांगीण विकास हा त्याचं पालन पोषण कसं झाल, त्याच्यावर कसे संस्कार झाले, तो कसा वाढला यावरही बऱ्याच अंशी आधारलेलं असत. कारण जन्माला आल्यापासून सर्वात पहिला जर कोणाचा सहवास मुलाला लाभलेला असतो तर तो आई वडील म्हणजेच पालकांचा असतो. त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांचा सहवास मुलासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

आई- वडील म्हणून मुलाचा सांभाळ करण हे खूप आव्हानात्मक काम आहे. अशावेळी जर मुलाचा सांभाळ फक्त कोणा एकट्यालाच करायला लागत असेल तर त्यांच्या समोरची आव्हान अजूनच वाढतात आणि ही सत्य परिस्थिती आहे. आताच्या काळात single parenting खुप वाढत आहेत. याची कारण वेगवेगळी असतात. पार्टनरचे कोणत्यातरी कारणाने निधन होणे, घटस्फोट किंवा मतभेद आहेत म्हणून वेगळेच राहणे. अशी कारण निर्माण होतात जेव्हा एकट्यानेच मुलाचा सांभाळ करायची वेळी येते.

जेव्हा नवरा बायको पालक म्हणून आपल्या मुलाला वाढवत असतात तेव्हा त्या दोघांनाही एकमेकांचा आधार असतो. मी नसले किंवा नसलो तर त्या वेळी माझ्या बाळासोबत कोणतरी असणार आहे ही खात्री असते, मला शारीरिक, मानसिक थकवा आला असेल तर माझा सांभाळ करायला देखील कोणतरी आहे असा एक दिलासा मनाला असतो. त्याचबरोबर मुलाला देखील आई आणि बाबा दोघांचाही सहवास लाभणे गरजेचे असते. लहान असताना इतकं जाणवत नाही.

पण मुल जसजसं मोठ होत जात, शाळेत जाऊ लागत, नवीन नाती निर्माण होतात त्यावेळी पालकत्वाचा मोठा रोल जाणवतो. विशेषकरून भारतासारख्या ठिकाणी जिथे अजूनही मुलाच्या नावापुढे वडिलांचं नाव लावणं गरजेचं असत आणि तिथे आईच नाव दिसला तर भुवया उंचावल्या जातात. त्यामुळे सिंगल पेरेंटिंग ही गोष्ट दिसते तितकी साधी नाही. त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं.

पहिलं आव्हान म्हणजे जिथे दोघांचा एकमेकांना आधार असतो तोच जातो. एकट्यावर सर्व जबाबदारी पडते आणि कामाचा व्याप पण दुप्पट होतो. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडतात. आधी जिथे एक जबाबदारी असते तिथे अचानक चार निर्माण होतात. जसे की घर सांभाळणे, पैसे कमावणे, मुलाला सांभाळणे ही सर्व काम एकट्यावरच येऊन पडतात. बाकीची नाती असतात ती ही पार पाडायची असतात. इतकं सर्व करुनही मनात अपराधीपणा असतोच की आपण आपल्या मुलाला हवं तस बालपण देऊ शकत नाही. सिंगल पालकांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी पण वेगळीच असते.

एकटी बाई जर आपल्या मुलाचा काम करत करत सांभाळ करत असेल तर तिला घरात आणि बाहेर कामाच्या ठिकाणी देखील अनेक गोष्टींना सामोर जावं लागत. कारण अनेक जण जज करत असतात. ज्यात सहानुभूती कमी आणि उपरोध जास्त असतो. त्यामुळे अश्या वातावरणात वावरण हे पण एक आव्हानच असत. सर्वांत जास्त जर कश्याने मानसिक त्रास होत असेल तर तो आहे एकट पडल्याचा. कारण पार्टनर नसतोच पण घरातले पण बऱ्याचदा पाठ फिरवतात. माहेरची लोक पण अनेकदा सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे एकट पडल्याची भावना खूप वाढते.

आर्थिक समस्या हे ही एक खूप मोठं आव्हान ठरतं कारण सर्व खर्च एकट्यावरच पडतो. घर खर्च, मुलांचा खर्च. यात होत काय जितका वेळ मुलांसोबत द्यायला पाहिजे तितका देता येत नाही सर्व वेळ कामात जातो आणि जे क्षण त्या त्या वेळी अनुभवले पाहिजेत ते मात्र राहून जातात. पाळणा घरात ठेवणं किंवा घरी कोणाला तरी सांभाळ करायला ठेवणं हे ही आताच्या काळात म्हणावं तितकं सुरक्षित नाही. त्यामुळे पालक मुलांना अश्या ठिकाणी ठेवायला साशंक असतात.

अश्यावेळी जेव्हा दिवसभर काम करावं लागतं असेल आणि मुल खूपच लहान असेल तर त्याला ठेवायचं कुठे हे समजत नाही. घटस्फोटासारख्या केस मध्ये तर हा ताण खूप वाढतो. सारखं कोर्ट कचेऱ्या, मुलाची कस्टडी कोण घेणार किंवा ते ठरलं तरी महिन्यातील किती दिवस मुल कोणाकडे असणार यासारख्या गोष्टी खूप तापदायक ठरतात. बऱ्याच जणांना नंतर लग्नासाठी मागण्या येतात पण त्यातली अनेकांची अशी अट असते की मुलांचा सांभाळ आम्ही करणार नाही. अश्या वेळी लग्न करण शक्यच नसतं.

या सगळ्या मध्ये स्वतःची काळजी घेणं, स्वतःसाठी वेळ काढणं याची गणती नसल्यातच जमा होते. सर्व लक्ष मुलाभोवती केंद्रित होत. अपराधीपणा, ताण, अती जबाबदाऱ्या, पैश्याची चणचण, वेळेची कमतरता या सारखी अनेक आव्हान सिंगल पेरेंटना पेलावी लागतात, त्यांना सामोर जावं लागतं. यातून शारीरिक, मानसिक थकवा जाणवतो. आयुष्यातील बरेच क्षण यातच निघून जातात. म्हणून वेळीच यावर मात करता आली पाहिजे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील अपराधीपणा काढून टाका. जरी आपण पुरेसा वेळ देऊ शकत नसलो तरी आपण जे काही करत आहोत ते आपल्या मुलासाठी करत आहोत ही गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे आणि मुल जशी मोठी होतात, त्यांना गोष्टी समजू लागतात तशी ती देखील आपल्याला समजून घेतात. त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचा गिल्ट ठेवू नका. एकट्याने म्हणून तुम्ही जे काही करू शकत आहात ते सर्व तुम्ही करत असता त्याबद्दल स्वतः स्वतःचे कृतज्ञ राहा. दुसरी गोष्ट मदत मागायला शिका.

मदत मागणे म्हणजे कमीपणा नाही. आपण एकटे सर्व काही करू शकत नाही. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे आपल्या घरातल्या लोकांकडून, मित्र मैत्रिणी यांच्याकडून मदत घ्या. आता तर अनेक संस्था पण यासाठी काम करत असतात. त्यांचा शोध घ्या. तिथून मदत मिळवा. आर्थिक उत्पन्न जसं होत आहे त्याप्रमाणे खर्चाचे आकडे ठरवा. अवास्तव खरच टाळा. त्यानुसार सर्व हिशोब घालून मॅनेज करा. या काळात वेळेचं पण व्यवस्थापन करण गरजेच आहे. त्यामुळे स्वतःच्या boundries सेट करायला शिका. काही ठीकणी नाही म्हणायला शिका.

Ex parnter ला भेटल्यावर अनेकदा जुन्या गोष्टी आठवून बोलून वाद होतात ज्याचा त्रास नंतर आपल्याला होतो. त्यामुळे भेटतानाच आपण कोणासाठी आणि का भेटत आहोत याचं भान ठेवून बोला. तितकच बोलण ठेवा आणि बोलण जर दुसरीकडे वळण घेत असेल तर ते थांबवा. पालक म्हणून आपल्याला वाटत असत की आपण आपल्या मुलाचं चांगल संगोपन करावं त्याला कसलाही त्रास होता कामा नये. त्याच आयुष्य टेन्शन फ्री असावं. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये.

या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी मुल जर आनंदी राहायला हवं असेल तर त्यासाठी आपण पण आनंदी असायला हवं. आपल्याला त्याची जर नीट काळजी घ्यायची असेल तर स्वतःची आधी नीट काळजी घेतली पाहिजे. एकट्याने सर्व सांभाळत आपल्यासाठी वेळ काढण जरी आव्हान असल तरी आपल्याला तो काढता आला पाहिजे. जेव्हा मुल बाहेर असेल, एक्स पार्टनर कडे असेल तेव्हा आपल्याला एकट वाटून घ्यायच काही कारण नाही.

आपण तो वेळ आपल्याल दिला पाहिजे. बाहेर थोडावेळ फिरायला जा. काहीतरी छान वाचत बसा. स्वतःसोबत वेळ घालवा. स्वतःचा क्षीण घालावा. पुरेशी झोप, नीट जेवण हे सर्व केल तर आपलं आरोग्य उत्तम राहील आणि आपण मुलाला नीट सांभाळू शकतो.

आव्हान असणारच आहेत पण त्यावर उपाय पण आहेत. आपण फक्त ते शोधले पाहिजेत.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!