एखादी धक्कादायक बातमी कानावर पडल्यावर हळूहळू भानावर यायला शिकूया….
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
उमेश शिक्षणासाठी बाहेरगावी राहत होता. घरी त्याचे मोठे कुटुंब होते. आजोबा आई-बाबा भावंड. लहानपणापासून उमेश त्याच्या आजोबांच्या खूप जवळ होता. होस्टेलवर असताना पण जेव्हा जेव्हा घरी फोन होईल तेव्हा तो त्याच्या आजोबांशी आवर्जून बोलत असे. पण गेल्या काही दिवसांपासून आजोबांची प्रकृती जरा खालावली होती.
वयानुसार त्यांना थकवा आला होता. उमेशच त्यांच्याशी बोलणं वगैरे चालू होतं. पण त्याला इतकी काही कल्पना नव्हती. घरातील माणसांनी पण त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून काही जास्त काही सांगितले नाही. पण एके दिवशी आजोबांनी सर्वांचा निरोप घेतला. जेव्हा उमेश ही बातमी समजली तेव्हा त्याला या गोष्टीचा खूप धक्का बसला.
जरी त्यांचं वय झालं असतं त्यांची प्रकृती थोडीफार खालावली असल्याने उमेशला माहित असलं तरी त्यांचं जाण आहे त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता आणि त्याला आजोबांना भेटताही आल नव्हत. जेव्हा त्याला ही बातमी समजली तेव्हा त्याला असं काही झाल आहे हेच पचवायला वेळ लागला. त्याच्या प्रकृतीवर, अभ्यासावर याचा परिणाम झाला. शेवटी त्याच्या आईबाबांनी त्याला घरी आणले. या पूर्ण घटनेतून सावरायला त्याने खूप वेळ घेतला. त्या त्याच्या घरात त्या व्यक्तीनी, इतरांनी खूप मदत केली.
आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतत ज्याची आपल्याला त्यावेळी कल्पना नसते. या घटना कोणत्याही असू शकतात. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील किंवा बाहेरच्या जगातील. जसे की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, पैशाच खूप मोठे नुकसान, बाह्य घटना जसे की भूकंप, पूर, बॉम्बस्फोट आताच्या काळातील कोरोना. यासारख्या घटना ज्यातून अनेकांच्या मृत्युच्या बातम्या कानावर येतात.
जेव्हा अशा घटना कानावर येतात तेव्हा शरीरात, मनावर त्याचे परिणाम दिसून येतात. जसे की सुन्नपणा येणे, हृदयाची धडधड वाढणे, भीती वाटणे,ताण येणे इत्यादी. त्या वेळी बहुतेक सर्वांच्या बाबतीत हे होत कारण आपल्याला शरीराची रचना तशी आहे. अशा घटनांमधून बरेच लोक हळू हळू सावरतात, भानावर येतात. पण काही जणांना हे जमत नाही. घटना उलटून अगदी दिवस महिने वर्ष झाली तरी काही लोक त्यात अडकतात.
PTSD म्हणजेच post traumatic stress disorder मध्ये हेच होतं. धक्कादायक घटना घडून गेल्यानंतर ही बराच काळ ती व्यक्ती त्या धक्क्यामध्ये राहते. त्या गोष्टीचा ताण तिच्या मनावर असतो. ज्यामध्ये घटने संबंधित स्थळ एखादी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करणे, ती घटना परत आठवली तर सुन्नपणा येणे अशी लक्षणे दिसतात. या सर्वाचा व्यक्तीच्या तिच्या सध्याच्या व पुढच्या आयुष्यावर परिणाम होतो. म्हणून यातून बाहेर पडणे गरजेचे असते.
तर अशी धक्कादायक बातम्या समजल्यानंतर, घटना घडल्यानंतर हळू हळू त्यातून कसे बाहेर पडायचे?
१. परिस्थिती मान्य करा : अनेकदा जे काही ऐकायला मिळत किंवा घडलेलं असतं ते ती व्यक्ती त्या वेळी मान्य करत नाही, टाळत राहते. म्हणून त्याचा अधिक त्रास होतो. म्हणजे काय झाला आहे किंवा ऐकायला मिळत आहे ते समजून घेण्याचा, मान्य करण्याचा प्रयत्न करा.
२. स्वतःला पुरेसा वेळ द्या: असं काही जेव्हा घडतं तेव्हा व्यक्तीला लगेच नॉर्मल व्हायचं असतं. पण जर आपल्याला अशा घटनेतून त्यावेळी काही त्रास होत असेल उदाहरणार्थ भीती, वाईट वाटणं हे सर्व अनुभवण त्या वेळी नॉर्मल आहे. तुम्ही त्याला प्रतिकार करून स्वतःचा त्रास अधिक वाढवता.
एखाद्या गोष्टीचा त्यावेळी जितका त्रास होणं अपेक्षित आहे तो होणार. म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये एखादी व्यक्ती गेल्यावर बारा दिवसांचा शोक कालावधी ठेवला आहे तो यासाठी. त्यानंतर माणसाने स्वतःला भानावर आणण अपेक्षित आहे. स्वतःला पुरेसा वेळ द्या. वेळ सर्व काही नीट करते. स्वतः वर लगेच नॉर्मल व्हायाची बळजबरी करू नका.
३. सतत बातम्या पाहणं टाळा: बाहेर जगातील घटना भूकंप, पूर, दहशतवादी हल्ला या सर्वाचा अनेक लोकांवर खूप परिणाम होत असतो. आणि त्यात न्यूज चॅनल अशा गोष्टींच खूप जास्त विद्रुपीकरण करून ते सर्व दाखवत असतात. म्हणून सतत अवास्तव न्यूज पाहणे टाळा. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे या घटनेचा सावरत नाही तोपर्यंत अवास्तव न्यूज पाहणे, या संदर्भातल्या बातम्या विनाकारण ऐकणे हे सर्व टाळण्याचा प्रयत्न करा.
४. माईंडफुलनेस: माईंडफुलनेस म्हणजे वर्तमान काळात जगणे. कितीही वाईट घटना घडली असली व कानावर आली असली तरी होऊन गेलेली गोष्ट आपण बदलू शकत नाही. तसच पुढे जाऊन काय होऊ शकत याबद्दलही आपण खात्री देऊ शकत नाही. म्हणून शक्य तितका वर्तमानकाळात जगण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपल्या श्वासावर लक्ष देणे असेल, आपल्या शारीरिक संवेदनांवर लक्ष देणं असेल, आजूबाजूला आत्ता या घडीला जे काही घडत आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे असेल त्यांना अनुभवणं असेल या सर्व गोष्टी येतात.
५. हळू हळू सामना करा: व्यक्तिगत आयुष्यात माणसाला जे काही धक्के लागलेले असतात लागते त्या संदर्भातील गोष्टी तो टाळण्याचा प्रयत्न करतो. तर असे न करता हळूहळू त्या गोष्टीचा सामना करा. कारण तुम्हाला जेवढी गोष्ट भीतीदायक वाटत असते तेवढी कदाचित ती नसेल देखील. म्हणून प्रत्यक्षात त्या घटनेला सामोरं जाणं, आपल्या आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून त्या गोष्टीचा सामना करून, विचारांना योग्य पद्धतीने हाताळून स्वतःची सहनशीलता वाढवा.
६. रूटीनमध्ये या: धक्कादायक घटना घडल्यानंतर, ऐकल्यानंतर आपल्या रूटीनमध्ये बऱ्याच प्रमाणात विस्कळीतपणा आलेला असतो. म्हणून शक्य तितक्या लवकर स्वतःचा दिनक्रम बसविण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये आपलं काम असेल, आपल्या जवळच्या व्यक्तीला वेळ देणं असेल, त्यांच्याशी बोलण असेल, व्यायाम; ज्यामध्ये आपण श्वासाचे व्यायाम करू शकतो, चालायला जाऊ शकतो, पुरेशी झोप घेणं, नीट जेवण, छंद जोपासू शकतो. अशा पद्धतीने जर आपला दिनक्रम आपण परत एकदा नीट बसवला तर हळू हळू त्या गोष्टीतून सावरू शकतो.
अशाप्रकारे परिस्थितीला स्वीकारून, स्वतःला पुरेसा वेळ देऊन, स्वतःवर विश्वास ठेवून, प्रसंगी इतरांची मदत घेऊन तुम्ही या सर्व वाईट अनुभवातून, धक्क्यातून स्वतःला बर करू शकता.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
