Skip to content

शांतता नेहमी मनातूनच येत असते, बाहेर शोधाल तर कोठेही मिळणार नाही.

शांतता नेहमी मनातूनच येत असते, बाहेर शोधाल तर कोठेही मिळणार नाही.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“जोपर्यंत आतला संघर्ष शांत होत नाही, बाहेर संघर्ष मोठा असुदे किंवा लहान तो शांत होऊ शकत नाही.”

प्रत्येक व्यक्ती मानसिक शांततेच्या शोधात असते. प्रत्येकाला मनाची शांतता हवी असते. पण ही शांतता मिळणार कुठून? आपण या शांततेच्या शोधात अगदी डोंगर माथ्यावर एखाद्या निश्चल किनाऱ्यावर जाऊन बसायचा देखील विचार करतो. एखादं अस ठिकाण शोधतो जिथे कोणी आपल्याला सतावणार नाही, डिस्टर्ब करणार नाही.
पण खरच असं फक्त एखाद्या शांत ठिकाणी बसून शांतता मिळू शकते का? आपलं मन जर खळबळ करत असेल, तेच जर शांत नसेल तर आपण कितीही शांत ठिकाणी बसलो, कितीही तपश्चर्या केली, ध्यान केलं तरी परिणाम होत नाही.

कारण शांतता ही नेहमी आपल्या आतून येत असते. ज्याला inner peace असं म्हणतात. हा जो inner peace असतो तो आपल्या आतूनच येत असतो. तो आपल्याला बाहेर कुठे मिळत नाही. अनेक जण वेगवेगळ्या शाखांना जॉईन होतात, वेगवेगळ्या पंथामध्ये जातात. पण त्यांना सर्वांना त्याचा फायदा होतो का? नाही.

कारण ते त्यांची शांती बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी ते ही धडपड करतात. पण आतला संघर्ष, आतला त्रास तो कधी कमी होणार?

यासाठी आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या अंतरंगात डोकावल पाहिजे. आपल्या आत काय चलबिचल चालू आहे, काय खळबळ चालू आहे ती फक्त बाहेरच्या वातावरणाने मिळेल की मला वेगळं काही केलं पाहिजे? हे प्रश्न आपल्याला स्वतः ला विचारता आले पाहिजेत. नुसत आजुबाजूच वातावरण शांत असून काय उपयोग जर आपल्या आतील समस्याग्रस्त आपण स्वतःशी भांडत असू.
म्हणून शांतता हवी असेल तर हा आंतरिक संघर्ष कमी करता आला पाहिजे.

आणि यासाठी दर वेळी शांत मय वातावरण पाहिजे अस नाही. कारण ते तसच मिळेल अशी काही शाश्वती नाही. पण आपण आपलं मन आपल्या ताब्यात आहे. ते ताब्यात ठेवता आला पाहिजे. त्यातूनच ही शांतता पण मिळेल.

यासाठी काय करायचं? तर आधी आपलं मन अशांत का आहे हे शोधायचं. त्या त्या प्रसंगात आपण कसे विचार करतो, आपल्या भावनांची तीव्रता आपलं त्यावेळचं वागणं यावर तटस्थपणे विचार करायचा. या विचारांमध्ये काय चुकत आहे, ते कसे बदलायचे यावर विचार करा, त्यासाठी मदत घ्या.

अनेक जण विविध भावना अनुभवतात, जसे की राग, चिंता, दुःख. अश्या वेळी वर वर टी व्यक्ती शांत असली तरी या सर्व भावनांची चलबिचल मनात असते. ती त्यांना आतून शांत ठेवत नाही. मग अश्यावेळी एकटच बसणे, त्या प्रसंगातून बाजुला जाणे यातून तात्पुरतं बर वाटू शकत. पण मन त्या प्रसंगात असल्याने आतून माणूस शांत होत नाही.

म्हणून जरी बाजूला बसलं तरी या प्रसंगाला मी वेगळ्या नजरेतून कस पाहू शकतो. परत अस घडल तर मी चांगल्या पद्धतीने त्याला कसा सामोरा जाऊ शकतो हे विचार केले तर मन तुलनेने लगेच शांत होईल. आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी बिकट प्रसंगी सुद्धा अगदी शांतपणे परिस्थिती हाताळतात. त्याच उलट अशी काही लोक असतात ती छोट्या छोट्या गोष्टींनी लगेच डिस्टर्ब होतात. अस का होत प्रसंग एक असूनही? कारण तो प्रसंग नाही तर त्यांचं व्यक्तित्व त्यावर परिणाम करत असत. आपण जर आतून स्थिर असलो तर बाहेरच्या गोष्टींचा तसा पटकन परिणाम होत नाही. म्हणूनच शांतता शोधा, निर्माण करा पण आपल्या आत बाहेर नाही!!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “शांतता नेहमी मनातूनच येत असते, बाहेर शोधाल तर कोठेही मिळणार नाही.”

  1. खरच खूप छान लेख लिहिलात खूप सुंदर

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!