शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही.
मेराज बागवान
शांतता सर्वांना हवीहवीशी वाटते.आपलं मन नेहमी शांत राहावं असं प्रत्येकाला वाटतं.अगदी खरं आहे हे.आयुष्यात गडबड,गोंधळ यापेक्षा शांतता हवी असे सर्वांना वाटत असते.आणि ह्यात काही चुकीचे नाही.समस्यांच्या बाबतीत तर आपण अनेकदा ऐकतो की ,शांतता हेच त्यावर औषध. असू शकते असेही.एखादी समस्या दूर होत नसेल,किंवा खूपच गुंतागुंतीची झाली असेल तर शांतता, किंवा थोडा काळ त्या समस्येवर काही न बोलून शांतता राखणे उचित ठरते.हे बऱयाच समस्यांना लागू होते.पण शांतता सर्वच समस्यांवर औषध ठरू शकते का? तर ,शांतता बऱ्याच समस्यांवर औषध असू शकते, पण सर्वच नाही.
आयुष्यात अनेक चढ उतार येतात.वेगवेगळ्या समस्या येतात.तेव्हा महत्वाचा ठरतो तो संयम.पण ह्या संयमाबरोबर कृती देखील महत्वाची असते.म्हणजेच समस्यांवर उत्तर शोधणे आणि ते उत्तर शोधण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असते.फक्त शांत राहून ती समस्या सुटतेच असे नाही.म्हणूनच असे म्हटले आहे की,शांतता सर्वच समस्यांवर औषध असू शकत नाही.काही अशा समस्या असतात की तिथे शांत राहून,नशिबावर सर्व काही सोपवून चालत नाही.तिथे पावले उचलणेच गरजेचे ठरते.
एखाद्या कार्यालयात एखाद्या कर्मचार्यावर विनाकारण अन्याय होत असतो.म्हणजे उगाच बाकी सर्वजण त्याला त्रास देत असतात. त्याच्या कामात अडथळा आणत असतात.त्याला प्रगती करू देत नाहीत.त्याची सतत टिंगल करीत असतात.ही झाली एक समस्या. मग ह्या समस्येत फक्त शांत राहून कसे चालेल. तर त्या कर्मचाऱ्याने हा अन्याय सहन नाही केला पाहिजे.चालले आहे तसे चालले आहे असे म्हणून वागले नाही पाहिजे.त्याने ही गोष्ट त्याच्या वरिष्ठांकडे बोलून सोडविली पाहिजे.ह्या उदाहरणातून इतकेच सांगायचे आहे की , प्रत्येक समस्येला शांतता हे औषध असतेच असे नाही.काही समस्यांना योग्य त्या कृतीची जोड ही द्यावीच लागते.त्याशिवाय तुम्ही शांतपणे जगू शकत नाही.
दुसरे उदाहरण पाहुयात. एकतर्फी प्रेम.मुलाचे मुलीवर प्रेम नाही.पण मुलगी मात्र प्रेम करते त्या मुलावर.मुलाने नकार दिला.मुलीचे प्रेम निस्सीम होते पण एकतर्फी होते.मग विषय इथेच संपतो. पुढील नाते,लग्न वगैरे ह्या गोष्टींचा प्रश्नच उरत नाही.मग ह्या परिस्थितीमध्ये मुलीने शांत राहणे हेच योग्य ठरते.उगाच मुलावर जोर-जबरदस्ती करून तिला तिचे प्रेम मिळू शकत नाही.म्हणून तिने शांत राहणे ह्या समस्येवर योग्य ठरते.
आपण दोन्ही उदाहरणे पहिली,की कुठे शांत राहणे हिताचे ठरते आणि कुठे शांतता सोडावी लागते.अशा बऱ्याच समस्या असतात.जिथे शांती काम करीत नाही.नोकरी,करिअर यामध्ये जम बसवायचा असेल तर शांत राहून फक्त नशिबावर गोष्टी सोडून चालत नाही.तर योग्य प्रकारे कष्ट करावे लागतात.प्रयत्न करावे लागतात.म्हणजेच काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि तिथे शांतताच औषधाचे काम करते आणि ज्या गोष्टी आपल्या हातात असतात तिथे कृती करणे महत्वाचे ठरते.
जेव्हा आपण म्हणतो की शांतता हेच ह्यावर औषध तेव्हा त्या गोष्टी नशिबावर अवलंबून असतात.जसे की एखादे नाते उभारणे.विधात्याच्या मर्जीनेच माणसे आपल्या आयुष्यात ये-जा करीत असतात.तुम्ही एखाद्या व्यक्तीला,तिच्या भावनांना नियंत्रित करू शकत नाही.तिथे शांतताच गरजेची असते.पण ज्या व्यावहारिक गोष्टी असतात तिथे मात्र शांत राहून चालत नाही.किंबहुना कोणी शांत राहू देखील नये.अन्यथा तुम्हाला हे जग फसविल्याशिवाय राहणार नाही.
आजचे युग हे कलयुग म्हटले गेले आहे.कोण कसा केव्हा आपल्याशी कसे वागेल ह्याचा काही भरवसा नाही.म्हणजेच माणसाचे वागणे आपल्या हातात नसते.मग अशा वेळी स्वतः बदलणे, किंवा स्वतःमध्ये बदल करणे रास्त ठरते.ज्या गोष्टी डोळ्यांना दिसत नाही जसे की, प्रेम,आपुलकी,काळजी,जिव्हाळा, आदर,समजुतदारपणा त्या शांत राहिल्यानंतरच लक्षात येतात.आणि ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात जसे की,पैसा, गाडी,पद, बांगला त्या मिळविण्यासाठी कार्य करणे गरजेचे असते.
म्हणूनच आयुष्य जगत असताना,प्रत्येकाला समजले पाहिजे की कुठे शांत राहणे गरजेचे आहे आणि कुठे नाही.ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचा विरोध केलाच पाहिजे.आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत आणि स्वीकारता देखील येत नाहीत त्याबद्दल शांत राहणेच बरोबर असते.जिथे जिथे नकारात्मकता येते तिथे तिथे विचार करणे गरजेचे असते की ,मी शांत राहिले पाहिजे की कृती करून ही परिस्थिती बदलली पाहिजे.
दोन्ही गोष्टी ह्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की ,शांतता हे औषध कुठे वापरायचे आणि कुठे नाही वापरायचे ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

