एक वेळ अशी सुद्धा येते, स्वतःची समजूत स्वतःलाच घालावी लागते.
अपर्णा कुलकर्णी
नुपूर खूप स्वप्नाळू जगात वावरणारी मुलगी. कळत्या वयापासून लग्नाची हजारो स्वप्ने तिने रंगवली होती. नवरा कसा असावा याची यादी संपता संपत नव्हती तिची. त्यातील अनेक अपेक्षा फिल्मी जरी असल्या तरीही तिचा नवरा समंजस, प्रमाणिक, उच्च शिक्षित आणि सगळ्यात महत्वाचे तिला समजून घेणारा असावा असे तिला वाटत होते. त्यात कॉलेजमध्ये शिकत असताना एका मुलाच्या प्रेमात ती पडली.
खरतर कोणावरही पटकन विश्वास बसत नव्हता तिचा. जरा पारखून निरखून मगच विश्वास ठेवत असे ती माणसांवर. पण एकदा विश्वास ठेवला की मग पुन्हा कसलीही शंका तिच्या मनात येत नसे. तिचा प्रियकर निनाद खूप आवडत होता तिला. नुपूरचा खूप विश्वास होता त्याच्यावर. तिच्या घरातल्या लोकांचा विरोध असूनही तिने त्याच्याशीच लग्न करेन असा हट्ट धरला. तिच्या हट्टापायी घरातले तयार झाले तर आयत्या वेळी निनादने लग्नास नकार दिला.
कधीच वाटले नव्हते असा भयानक अनुभव जगत होती नुपूर. तिचा विश्वास बसत नव्हता तिने ऐकले त्यावर. माज पहिलं प्रेम अयशस्वी ठरले याहीपेक्षा मी माणूस ओळखायला चुकले याचा तिला जास्त त्रास होत होता. चुकीच्या माणसावर मी इतका विश्वास ठेवला की स्वतःच्या आई बाबांच्या विरोधात गेले. मन खात होते तिचे तिला.
आता आई बाबांनी ठरवलेल्या मुलाशी तिने लग्न केले, करावेच लागणार होते तिला. तिने लग्न केले सुरुवातीचे काही महिने चांगले गेले. पण नंतर इतर नवऱ्या प्रमाणे तिचा नवराही विचित्र वागायला लागला. तिच्या अपरोक्ष मोबाईल चेक करणे, कोणाशी बोलत थांबली असेल तर विचित्र नजरेने पाहणे, तिच्या आईशी बोलू नको म्हणून वाद घालने असे प्रकार सुरू झाले. माझ्याच आईशी मला का बोलू देत नाही हा प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालत असे.
शेवटी आईकडे निघून जावे या विचाराने ती माहेरी आली. पण तिच्या प्रेमभंगाची बातमी तिच्या माहेरी सगळ्यांना समजली होती त्यामुळे फार दिवस तिथे राहिल्यामुळे तिचे असे माहेरी रहाणे चर्चेचा विषय झाला होता. आणि आता असे नवऱ्याशी भांडून माहेरी रहाणे शक्य नव्हते. त्यामुळे नाईलाजाने ती पुन्हा नवऱ्याकडे आली होती.
तिचा नवरा स्वभावाने तसा बरा होता. म्हणजे कधी कधी तिची काळजी घेई, खायला प्यायला काय हवं नको ते बघत असे, तिला सोडून कधीच कोणतीच गोष्ट खात नसे. पण ती ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला तिचे स्वतंत्र विचार आहे, व्यक्तिमत्व आहे, मतं आहेत हे मात्र त्याला मान्य नव्हते. इतकेच काय पण तिने तिच्या घरातील कोणत्याही व्यक्तीशी बोललेले त्याला चालत नव्हते. त्यामुळे फक्त त्याच्या मनाप्रमाणे वागणारी एक बाहुली त्याला हवी होती. जी कधीही, कोणत्याही गोष्टीत त्याला विरोध करणार नाही, प्रतीप्रश्न विचारणार नाही, त्याची प्रत्येक गोष्ट मुकाट्याने ऐकेल.
आयुष्यातला प्रत्येक दिवस तिला एका वर्षाप्रमाणे वाटत असे. रोज तिच्या नवऱ्याच्या अशा वागण्याने तिचे पाहिले प्रेम तिला आठवत असे. निनादने तिच्याशी प्रतारणा केली होती पण तिने मात्र ते नातं, ते प्रेम, त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण अतिशय मनापासून घालवला होता, जगली होती. त्यामुळे तो काळ तिच्यासाठी खूप सुखद होता. मात्र त्याचा शेवट तिला हवा तसा गोड झाला नव्हता. जेंव्हा जेंव्हा ती निनादच्या खांद्यावर डोके ठेवत असे तेंव्हा सगळ्या जगाचा विसर तिला पडत असे. त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत ती सगळ्या जगाचा भार त्याच्या खांद्यावर टाकून निर्धास्त होत असे. निनाद पण तिच्या भावना मुक्याने समजून घेऊन हातांची पकड घट्ट करत तिला मी आहे तुझ्यासोबत असा स्पर्शाने आधार देत मिठीत घेत असे. तशी ती त्याला जास्तच बिलगत असे. पण हा अनुभव तिच्या नवऱ्याच्या बाबतीत आजवर तिला कधीही जगता आला नव्हता आणि इथून पुढे ही कधीच ती जगू शकणार नव्हती हे तिला चांगलेच माहीत होते.
ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, ज्याच्यासाठी आई बाबांना दूर लोटले त्यानेच तिला दूर लोटले आणि पुन्हा ज्याच्यावर विश्वास ठेवून हात हातात दिला त्याने कधीच तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता.
त्यामुळेच आयुष्यातला प्रत्येक येणारा दिवस एक नवी तडजोड घेऊन येत होता. कारण तिचा नवरा बदलेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणा होता. जितके शक्य होईल तितके स्वतःला बदलणे आणि त्यानुसार जगणे इतकेच काय ते तिच्या हातात होते. त्यामुळे उगाच नवऱ्याच्या नादाला लागू नकोस, शांत रहा, त्याचं बोलणं दुर्लक्ष कर असे स्वतःच स्वतःची समजूत घालत होती नुपूर.
कधी कधी आपण विचार एक केलेला असतो आणि घडते मात्र भलतेच. आयुष्याचे चित्र एक रंगवलेले असते पण परिस्थिती किंवा घटना असे काही वेगळेच वळण घेतात की भलत्याच दिशेला घेऊन जाते आयुष्य. अशा वेळी असे वाटते की काय विचार केला होता आणि काय होऊन बसले. असेच काहीसे नुपूरचेही झाले होते. कधी कधी अनपेक्षित घटना घडतात आणि कल्पनाही न केलेले आयुष्य जगणे भाग पडते. पण म्हणून हार मानू नका, खचू नका, जे जसे वाट्याला आले आहे तसे आयुष्य समाधानाने जगा, वास्तव स्वीकारा. कदाचित आयुष्याला तुमच्याकडून काही तरी अजून अपेक्षित असेल.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
