Skip to content

इतरांचा स्वभाव सांभाळून नातं टिकवण्यापेक्षा या गोष्टी करा!

आपल्या आयुष्यातील अनेक नाती टिकवण्यासाठी आपण स्वतःला किती वेळा बदलतो, याचा कधी विचार केला आहे का? समोरच्या व्यक्तीला राग येऊ नये म्हणून आपण बोलणं टाळतो. त्यांना वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. त्यांच्या स्वभावानुसार वागण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही, तर अनेकदा स्वतःला त्रास होत असतानाही आपण शांत राहतो. कारण एकच असतं, आपलं नातं टिकायला हवं!

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीची नसते. प्रत्येक वेळी तुम्हीच समजून घेत असाल, तुम्हीच माघार घेत असाल आणि तुम्हीच स्वतःला बदलत असाल, तर त्या नात्यात तुमच्या भावनांना महत्त्व किती आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

इतरांचा स्वभाव सांभाळून नातं टिकवण्यापेक्षा पुढील गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

१. स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या.

इतरांना काय वाटेल याचा विचार करताना स्वतःला काय वाटतंय, हे विसरू नका. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल, मनाला पटत नसेल किंवा एखाद्या वागण्यामुळे त्रास होत असेल, तर ते स्पष्टपणे व्यक्त करा. स्वतःच्या भावनांना महत्त्व देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही.

२. प्रत्येक गोष्ट सहन करण्याची सवय सोडा.

नातं टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी सहन करणं आवश्यक नसतं. सतत अपमान, टोमणे, दुर्लक्ष किंवा चुकीचं वागणं सहन केल्यामुळे मनावर ताण निर्माण होतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर सतत भावना दाबून ठेवल्यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे स्वतःची भूमिका ठामपणे मांडा.

३. स्वतःच्या मर्यादा निश्चित करा.

प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात किती स्थान द्यायचं, हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. कोणाला तुमच्याशी कसं बोलता येईल, कोणत्या गोष्टी तुम्हाला मान्य नाहीत आणि कोणत्या वागण्यामुळे तुम्ही दुखावता, हे स्पष्ट करा. यालाच मानसशास्त्रात Personal Boundaries म्हणजेच वैयक्तिक मर्यादा म्हणतात.

४. प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देत बसू नका.

तुम्ही एखादा निर्णय घेतला की तो प्रत्येकाला पटेलच असं नाही. काही लोक तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावतील. काहीजण नाराज होतील. पण प्रत्येक वेळी स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी मानसिक ऊर्जा खर्च करू नका. तुमचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला असेल, तर त्यावर ठाम राहायला शिका.

५. स्वतःचं स्वतंत्र आयुष्य निर्माण करा.

तुमचा आनंद केवळ एखाद्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. स्वतःचे छंद जोपासा, नवीन गोष्टी शिका, मित्रमैत्रिणींशी संवाद साधा आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. तुमचं संपूर्ण आयुष्य एका नात्याभोवती फिरत राहू नये.

६. समोरच्या व्यक्तीकडूनही प्रयत्नांची अपेक्षा ठेवा.

नातं दोघांचं असतं, त्यामुळे ते टिकवण्यासाठी प्रयत्नही दोघांनी करायला हवेत. प्रत्येक वेळी तुम्हीच फोन करायचा, तुम्हीच समजून घ्यायचं आणि तुम्हीच माफी मागायची, असं असेल तर नात्यातील समतोल बिघडू शकतो. समोरच्या व्यक्तीलाही नात्याची जबाबदारी घेऊ द्या.

७. गरज पडल्यास अंतर ठेवायला शिका.

काही नाती टिकवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःलाच हरवून बसतो. अशा वेळी थोडं अंतर ठेवणं चुकीचं नाही. अंतर ठेवल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या भावनांचा विचार करता येतो. कोणतं नातं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं नातं तुम्हाला सतत मानसिक त्रास देत आहे, हे समजायला मदत होते.

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव सांभाळणं ही तुमची जबाबदारी नाही. तुम्ही प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणंही शक्य नाही.

नाती टिकवण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक आहे, पण त्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याची गरज नाही. ज्या नात्यात तुम्हाला तुमच्यासारखं राहण्याचं स्वातंत्र्य मिळतं, तुमच्या भावनांचा आदर केला जातो आणि तुमचं म्हणणं ऐकलं जातं, त्या नात्याला अधिक महत्त्व द्या.

कारण इतरांची मनं सांभाळण्याच्या प्रयत्नात स्वतःचं मन दुखावून घेणं, ही नातं टिकवण्याची योग्य किंमत नाही!

धन्यवाद.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयु‌ष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”


सर्व लेख व्हिडिओच्या रूपात पहा.

👉🏽 क्लिक करा 👈🏽

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!