Skip to content

“मनात असलेल्या गोष्टींपेक्षा त्या वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणं म्हणजे संयम.”

“मनात असलेल्या गोष्टींपेक्षा त्या वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणं म्हणजे संयम.”


मधुश्री देशपांडे गानू


“Everything comes to you at the right time. Be patient..”

तुम्हांला हवी असलेली, मनात असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हांला मिळेल, पण योग्य वेळ आल्यावरच. तोपर्यंत संयम ठेवा. मग संयम ठेवणे म्हणजे फक्त योग्य वेळेची वाट बघणे का?? तर नाही. संयम ठेवून आपले कर्म, कर्तव्य चोखपणे, प्रामाणिकपणे करत राहणे. स्वतःची प्रगती साधत राहणे. अशा वेळी नकारात्मकतेने खचून जाणे, नैराश्य येणे हे होता कामा नये. आपल्या मनासारख्या गोष्टी आज नाही तर उद्या घडायला हव्या असतील तर प्रयत्न, सातत्य हवंच.

प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य समृद्ध, संपन्न, ऐश्वर्यपूर्ण, आनंदी, सुखी असावं असंच वाटत असतं. आणि यासाठीच त्याचे अथक, अविरत प्रयत्न चालू असतात. आपली सर्वांगीण प्रगती व्हावी, अशीच त्यामागे धारणा असते. स्वतःकडून, जीवनाकडून मनात खूप अपेक्षा असतात. खूप स्वप्नं उराशी बाळगलेली असतात. प्रत्येकाची स्वतःची अशी “बकेट लिस्ट” असतेच. सगळं आपल्या मनासारखं घडावं असंही वाटत असतं. पण नेहमी असं घडतंच असं नाही ना!

अकस्मात अचानक अशा काही नकोशा वेगळ्या घटना घडतात आणि मनातले मनोरे मोडून पडतात. आयुष्य अचानकच वेगळं वळण घेतं. गोष्टी वेगळ्या क्रमाने घडू लागतात. बहुतेक वेळा हे असंच घडतं. उदाहरणार्थ, अगदी हुशार, बुद्धिमान, उत्तम करिअर असणाऱ्या मुलाला अचानक वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर शिक्षण सोडून घरातील शेती सांभाळावी लागते. त्याच्या आयुष्याची, स्वप्नांची दिशाच बदलून जाते. आणि मग पुढे सगळेच वेगळ्या क्रमाने घडतं. मनाविरुद्ध पण वास्तवाला सामोरे जावंच लागतं. वास्तव स्वीकारावंच लागतं. हीच खरी कसोटीची वेळ असते. इथेच जितक्या लवकर आपण वास्तव स्वीकारू, तितकी आपल्याला आपल्या आयुष्याची योग्य दिशा सापडत जाते. निराश, हताश न होता, चिडचिड न करता संयमाने हे वळणही आपण पार करू शकतो. आणि मनातील हव्या असलेल्या गोष्टीही आज नाही तर उद्या पूर्ण करू शकतो.

कित्येकदा मुलींना मनाविरुद्ध लग्न करावं लागतं. शिक्षण, नोकरी, उत्तम करिअर यावर सहज संसारासाठी पाणी सोडलेल्या स्त्रियाच समाजात जास्त पाहायला मिळतात. त्यांची हुशारी, कर्तबगारी फक्त घराच्या चौकटीपुरतीच मर्यादित होऊन राहते. प्रत्येकालाच कधी ना कधी या मनाविरुद्ध वळणाला तोंड द्यावं लागतं, मनातील गोष्टी, स्वप्नं मनातच ठेवून. पण आपण हाही जीवनाचा एक भाग आहे. या वेगळ्या वळणावर, रस्त्यावरही आपण आनंद शोधू शकतो, असं मनाला बजावायला हवं.

आहे त्यात आनंद शोधायला प्रत्येकाने शिकायला हवं. जितक्या लवकर तुम्ही या वेगळ्या क्रमाने घडणाऱ्या गोष्टी स्वीकाराल तेवढे तुम्ही लवकर नवीन अनुभवांना सकारात्मकतेने सामोरे जाल. तुमच्या मनात असलेल्या गोष्टी न विसरता मनात जपून ठेवा. बघा, कित्येक मध्यमवयीन स्त्रिया मुलं मोठी झाली, संसाराची जबाबदारी थोडी कमी झाली की आपल्या बालपणीच्या, तरुणपणीच्या आवडी, छंद जोपासताना दिसतात. नृत्य, गायन, चित्रकला अशा अनेक.. कारण त्यांनी शांतपणे, मनापासून संसाराच्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या असतात. समर्थपणे त्या पार पाडलेल्या असतात. स्वतःच्या आवडीसाठी मनावर संयम ठेवलेला असतो. आणि आता त्या आत्मविश्वासाने मनातील इच्छा पूर्ण करताना दिसतात. कित्येक जण अगदी पन्नाशी, साठीनंतरही आपली शिक्षणाची आवड पूर्ण करताना दिसतात. शेवटी कोणतीही नवीन गोष्ट शिकायला वयाची मर्यादा नसतेच हो!! तुमच्या मनाची इच्छा, आणि मेहनतीची तयारी फक्त हवी.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतूनही संयम राखून, अनेक अपमान सहन करून, अनेक भले बुरे अनुभव घेऊन आज त्या त्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी झालेल्या किती व्यक्ती आपण पाहतो. मेरी कॉम, गीता फोगाट, आद. धीरूभाई अंबानी, आदरणीय अब्दुल कलाम किती किती!! आज तर दिव्यांग व्यक्ती ही आॉलिम्पिक मध्ये सुवर्ण, रजत पदकं मिळवताना दिसतात. केवढा संयम राखला असेल त्यांनी मनावर!

नेहमी आपल्याला हवं तसं मनासारखं सगळं नाहीच मिळत. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, वेगळ्या क्रमाने घडल्या आणि त्या आपण सहज स्वीकार केल्या तर आपलं मन खंबीर होतं. कोणत्याही प्रसंगाला, अनपेक्षित वळणाला सामोरे जायला आपण तयार होतो. आपली निर्णय क्षमता, आपला आत्मविश्वास दुणावतो. मनापासून प्रामाणिक प्रयत्न, मेहनत, इच्छा, अत्यंत सकारात्मक वृत्ती, सुनियोजन याने आपण मनात असलेल्या गोष्टीही नक्कीच प्रत्यक्ष जीवनात खऱ्या करू शकतो. फक्त योग्य वेळ येण्यासाठी संयम मात्र हवा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on ““मनात असलेल्या गोष्टींपेक्षा त्या वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणं म्हणजे संयम.””

  1. He fakta lihayala bolayla khup soppa asta pan pratyakshat he jeevanat utrvna khup kathin

  2. सुंदर लेख आहे… Motivational..👌🏻👌🏻😊

  3. तुमचं प्रत्येक लिखाण सुंदर च असत मधुश्री

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!