Skip to content

“सौंदर्याच्या चुकीच्या व्याख्या आयुष्यभरासाठी न्यूनगंड निर्माण करतात.”

“सौंदर्याच्या चुकीच्या व्याख्या आयुष्यभरासाठी न्यूनगंड निर्माण करतात.”


मधुश्री देशपांडे गानू


वाचकहो! तुम्हांला “फेअर अँड लवली” ची वर्षानुवर्षे चाललेली जाहिरात आठवते?? आता ती बदलून “ग्लो अँड लवली” केलीयं. का बरं इतकी वर्षे तुफान खप असेल या उत्पादनाचा??? तुम्हाला गोरं, बारीक, फिट, उंच, सुडौल बनवणारी उत्पादनं खरंच का खपत असतील?? वर्षानुवर्षे चित्रपट, मालिका यात फक्त सुंदर चेहरे का स्वीकारार्ह असतात??? आता कुठे जरा सामान्य शरीरयष्टी आणि बोलका चेहरा असलेले आणि उत्तम अभिनय क्षमता असलेल्या कलाकारांना छान वाव मिळतोयं. हा बदल नक्कीच सुखावह आहे.

पण अजूनही पूर्ण बदल झालेला नाही. कारण आपल्या सौंदर्याच्या जुनाट, चुकीच्या व्याख्या. आपली संकुचित, पूर्वग्रहदूषित सामाजिक मानसिकता. काही काळापूर्वी “बाला” हा अप्रतिम हिंदी चित्रपट आला होता. त्यातही याच विषयावर भाष्य होतं.

आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे आपल्या हातात नसतं. आणि जन्माला येताना काय बरोबर घेऊन यावे, यावरही आपलं नियंत्रण नसतं. आपण कसे दिसतो, हे सर्वस्वी आपल्या आईवडिलांवर अवलंबून असतं. आपण त्यांचे, आधीच्या पिढ्यांचे गुण, दोष, रूप घेऊन जन्माला येतो. आपला रंग, त्वचेचा पोत, उंची, जाडी, सरळ/ कुरळे केस हे सगळं नैसर्गिक आपल्याला बहाल होतं. पण आपल्या समाजाची आणि आपली ही संकुचित मनोवृत्ती, संस्कार, रूढी-परंपरा यामुळे आपली चुकीची मानसिकता घडत जाते.

सौंदर्याची व्याख्या सरसकट “गोरं आणि बारीक म्हणजे सुंदर” अशी असते. कोणत्याही लग्नाळू मुलाला बायको गोरीच हवी असते. हे महाशय कसेही ओबडधोबड असले तरीही..
काळा, सावळा रंग हे तर निषिद्धच.. का??

आजचा विषयच मुळी शरीराबद्दल लज्जास्पद वाटणे, शारीरिक आणि मानसिक प्रतिबंध, आणि न्यूनगंड (body shaming, inhibitons and inferiority complex) यावर आहे. सुंदरतेच्या व्याख्या आपल्याकडे इतक्या चुकीच्या आहेत. काळा सावळा वर्ण असलेली लहान मुलं विशेषतः मुली यांना अगदी लहान, कोवळ्या वयातच तुझा रंग म्हणजे तुझ्यातच काहीतरी कमी आहे. हे जाणवून देण्यात येतं. कोणी काळं, कोणी जाड, कोणी बारीक प्रत्येकालाच आपले शरीर लज्जास्पद वाटत असतं. मुली आणि स्त्रिया तर हे फारच मनाला लावून घेतात. आणि पन्नाशी उलटलेल्या स्त्रियांनाही आपण गोरे नाही याचा भयानक न्यूनगंड असतो. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणं, बाजारु उत्पादनं वापरणं ते थेट आता मोबाईल मध्ये वेगवेगळे ॲप वापरून आपले फोटो गोरे, रेखीव करून ते पोस्ट करणे इथ पर्यंत मजल गेली आहे. स्वतःलाच नाकारण्याचा केवढा हा अट्टाहास! आपण स्वतःलाच जसे आहोत तसे स्वीकारत नाही. आणि समोरच्या व्यक्तीलाही ती आहे तशी स्वीकारत नाही. गोरी, सुंदर मैत्रीण असेल तर असूया वाटते. आपल्याला व्यक्तीचे गुण महत्त्वाचे वाटत नाहीत.

आपली जडणघडणच अशी झालेली असते. लहानपणापासूनच तसे संस्कार झालेले असतात. एखाद्या काळा वर्ण असलेल्या, एखाद्या वजन जास्त असलेल्या मुलीला यामुळे आयुष्यभरासाठी न्यूनगंड निर्माण होतो. समाजात वावरताना तुमच्या साध्या शारीरिक कमतरतेवर ही तुम्हाला टोमणे ऐकावे लागतात. तुमची मस्करी केली जाते. तुमचा आत्मविश्वास कमी होतो. वरवर क्षुल्लक वाटणारी ही कारणं मनावर खोल परिणाम करतात. आणि आयुष्यावरही..

माणूस म्हणून आपण फक्त एक शरीर आहोत का? आपले मन , आपली बुद्धी , आपला आत्मा हेही आपणच आहोत ना! पण फक्त रंगावरून आपण एखाद्याची परिक्षा करतो? एखादी गोरी , सुंदर , टापटीप राहणारी व्यक्ती म्हणजेच सर्वगुणसंपन्न असे समजतो आपण.. परमेश्वराने कोणालाही निर्दोष बनवलं नाही. त्याचप्रमाणे कोणालाही टाकाऊ बनवलं नाही. परमेश्वर इतका दयाळू आहे की त्याने प्रत्येक जीवाला काही विशेष देऊन पाठवले आहे. केवळ दिसण्यावरून , असण्यावरून एखाद्याची पारख करू नये. जर एखादा व्यक्ती सद्गुणी , निर्मळ मनाची शुद्ध अंतरात्मा असणारी असेल तर तिची कदर केलीच पाहिजे. प्रत्येक व्यक्ती वेगळी, विशेष आहे म्हणून तर या जीवनात रंगत आहे..

सर्वात प्रथम आपण स्वतःला , स्वतःच्या शरीराला आहे तसे स्वीकारले पाहिजे. परमेश्वराची प्रत्येक निर्मिती ही सुंदरच आहे. आपल्याला शिकवले जाते ” अहं ब्रह्मास्मि “. म्हणजे परमेश्वर आपल्या शरीरातच वास करत असतो. मग स्वतःच्या शरीराबद्दल नावड का? स्वतःलाच आपण नावे का ठेवतो? सतत दुसर्या बरोबर स्वतःची तुलना का करतो? दुसर्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही याची खंत का बाळगतो? .. सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. परमेश्वराने इतका सुंदर मनुष्य जन्म दिला आहे , शरीर , मन दिले आहे ते छान जपा. शरीरा बरोबरच मनाचेही आरोग्य राखा. .. कोणाही बद्दल कशासाठीही असूया बाळगू नका. मग बघा, तुम्हीं अंतर्बाह्य सुंदर दिसाल. ही सुंदरता, ही शांतता तुमच्या चेहर्यावर दिसेल. तुमचा रंग कोणताही असो तुमचा चेहरा तजेल दिसेल.

आपले कर्तृत्व आणि आपला आनंदी स्वभाव हे आपले खरे सौंदर्य आहे. त्याची झळाळी काही औरच आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. फक्त बाह्य सौंदर्य उपयोगाचे नाही. तर सुदृढ , निरोगी शरीर आणि मन ही आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली आहे. आतून सौंदर्य जपता आले पाहिजे. विचार , कृती सुंदर असले पाहिजेत. ” काय भुललासी वरलिया रंगा ” असे होऊ देऊ नका. केवळ बाह्य रूप आणि पेहराव यावरून कोणाचीही ओळख , कोणाविषयी ठाम मत बनवू नका. लिसा रे या अभिनेत्री चे ” Close To The Bones ” हे पुस्तक आवर्जून वाचा. केवळ व्यवसायाची गरज आणि बारीक होण्याचा अट्टाहास यामुळे तिने आयुष्यभरासाठी रोग ओढवून घेतले. स्वतःचे शरीर , मन याची नीट ओळख करून घ्या. स्वतःवर अमर्याद प्रेम करा. स्वतःला आहात तसे स्वीकारा.. तरच तुम्ही खरे आनंदी व्हाल आणि दुसर्यांनाही आनंद देऊ शकाल.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““सौंदर्याच्या चुकीच्या व्याख्या आयुष्यभरासाठी न्यूनगंड निर्माण करतात.””

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!