Skip to content

सततचे रुटीन बदलल्यामुळे सुद्धा काही समस्या सुटतात.

सततचे रुटीन बदलल्यामुळे सुद्धा काही समस्या सुटतात.


मेराज बागवान


रुटीन….रुटीन लाईफ…हा शब्द आपल्या रोजच्या बोलीभाषेतील झाला आहे. मग हे ‘रुटीन रुटीन’ म्हणजे काय? तर रूटीन म्हणजे दिनचर्या.रोजचा आपल्या दिवसाचा कार्यक्रम, वेळापत्रक.प्रत्येकाचे असे एक रुटीन ठरलेले असते. त्यात बहुतांशी लगेच बदल होत नाही.रोजची तीच ती नोकरी, तोच तो अभ्यास, तीच आजूबाजूची मंडळी, रोजचाच मोबाईल फोन, समाज माध्यमे इत्यादी. पण कधी तरी रूटीन पण बदलणे गरजेचे असते.कारण हेच सततचे रुटीन बदलल्यामुळे खूप काही फरक पडू शकतो आयुष्यात आणि काही समस्या देखील सुटू शकतात.

कधी कधी काय होते, आपले मन कशातच रमत नाही.तसे पाहायला गेले तर सर्व गोष्टी जागच्या जागी असतात, पण मानसिक समाधान नसते.मग अशा वेळी नवीन काही तरी छंद जोपासले, जसे की नवीन वाहन शिकणे वगैरे ,तर यामुळे थोडा रुटीन मध्ये बदल घडतो आणि मानसिक स्वास्थ्य जपले जाते.

कधी कधी मात्र खरेच काही समस्या असतात जसे की , नात्यांमधील ताण-तणाव, आजारपण, आर्थिक चणचण, नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या कामाच्या समस्या आणि त्याचे वैयक्तिक जीवनावर होणारे परिणाम, किंवा वैयक्तिक समस्यांमुळे नोकरीत, व्यवसायात होणारे नकारात्मक परिणाम इत्यादी. यामुळे देखील आपले आयुष्य विचलित होत असते.मग अशा वेळी थोडा दिनचर्येत बदल केला, जसे की , बाहेत थोडा काळ फिरायला जाणे, वातावरण, जागा बदलणे यामुळे थोडे शांत वाटते आणि समस्या पूर्ण जरी नाही सुटली , तरी तिला सामोरे जाण्याची आणि ती सोडविण्याची एक नवीन ऊर्जा मिळते.

रुटीन बदलाला आपण ‘ब्रेक घेणे’ देखील म्हणू शकतो.कित्येकदा माणसाला बदल नको असतो.आहे ते बरे चालले आहे, कशाला आणखीन डोक्याला ताप असा विचार करून व्यक्ती बदल नाकारत असते.आयुष्य आपल्याला अनेक संधी देत असते, आपले रुटीन बदलण्यासाठी, पण आपण ते नाकारत असतो.पण ह्या बदलामुळे अनेक फायदे होत असतात.काही वेळ दिनचर्येत बदल केल्यामुळे, नवीन विचार, कल्पना सुचतात.नवीन दिशा सापडते.जसे की , थोडा काळ मोबाईल फोन आणि समाज माध्यमांपासून दूर राहिल्याने स्वतःला ‘क्वालिटी टाइम’ देता येतो.आयुष्यात पुढे काय करायचे आहे, करिअर उद्दिष्ट्ये यावर विचार करता येतो.

गृहिणींना देखील अनेक समस्या असतात.सतत घरात घरात राहून कंटाळा येतो.कधी कधी एकटे पडल्याची जाणीव देखील होते.मग अशा वेळी त्यांनी, दिवसातील थोडा काळ मैत्रिणींसमवेत, किंवा काही सामाजिक संस्थांबरोबर , किंवा इतर काही नवीन छंद , गोष्टी शिकण्यात घालविला तर त्यांच्या अनेक मानसिक समस्या दूर होऊ शकतात.

नोकरीत देखील अनेकदा तोचतोचपणा येतो.मग सुरवातीला आवडणारे काम देखील नंतर नंतर नकोसे वाटते.मग अशा वेळी, ऑफिस मध्ये कामांची अदलाबदल काही काळासाठी केली की कामात बदल होतो आणि गुणवत्ता, क्षमता वाढीस लागते आणि कामे देखील यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात.

नात्यांमध्ये आज अनेक चढउतार चालू आहेत.चिडचीड, राग, संशय, इर्षा अशा गोष्टी अनेकदा घडतात.ह्याला कारण असते ते रुटीन, रोज तेच ते .मग अशा वेळी घरातील प्रत्येकाने ठरविले की , मी तुला ह्या कामात मदत करेन, तू मला ह्या कामात मदत कर , तर हळूहळू वरील काही समस्या कमी होऊ शकतात.कधी कधी ‘फॅमिली गेट टू गेदर’ , वाढदिवस साजरे करणे, इतर नातेवाईकांना भेटणे किंवा त्यांना घरी बोलावणे यामुळे रुटीन बदलते आणि नाती पुन्हा नव्याने बहरू लागतात.

मित्र-मैत्रिणींमध्ये देखील, बाहेर ट्रिप ला जाणे, सिनेमा बघणे,सामाजिक उपक्रम राबविणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणी भेट देणे यामुळे एक प्रकारचे सामाजिक भान येते.आपल्याकडे अनेक सण-उत्सव असतात.मग अशा वेळी विविध स्पर्धा, कार्यक्रम, रक्तदान यांसारखे उपक्रम राबविले, त्यात सहभाग घेतला की व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते.

आज समस्या कोणाला नाही असे नाही.अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्व जण कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला आहे.मग अशा वेळी सर्व उपाय करून झाल्यानंतर किंवा त्यातच त्यात अडकून राहिल्यानंतर ‘रुटीन बदल’ हा एक खूप चांगला उपाय ठरू शकतो समस्या कमी करण्यासाठी हे अनेकदा लक्षात येत नाही.पण अशाच काही छोट्या छोट्या बदलांमुळे, रुटीन बदलामुळे कालांतराने अनेक मोठे आणि सकारात्मक बदल घडून येतात हे आपल्या लक्षात देखील येत नाही.म्हणूनच बदल केले पाहिजेत,स्वतः मध्ये आणि दिनचर्येत देखील.

आणि हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असते. सतत नवीन काही शिकत राहिल्यामुळे माणूस ‘फ्रेश आणि ऍक्टिव्ह’ राहतो.एक प्रकारची सकारात्मकता आयुष्यात येते.आणि ह्या सगळ्या गोष्टी आपले आजारपण, दुःख , ताण तणाव कमी करण्यास खूप उपयोगी ठरतात.म्हणूच प्रत्येक व्यक्तीने सतत चे रुटीन बदलायला शिकले पाहिजे.

अनेकदा काही व्यक्ती स्वतःची चूक मान्य करीत नाहीत.किंवा इतर कुणी त्यांना ती चूक दाखवून दिली तर ते रागावतात, आणि त्या कडे दुर्लक्ष करतात.स्वतःच्या धुंदीत आयुष्य जगत असतात.कधी कधी आपल्यामुळे कुणीतरी नकळत का होईना दुखावले जाते.पण आपण ते स्वीकारत नाही.मग कालांतराने आपण थोडा वेळ रुटीन जीवनापासून दूर गेलो की , ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आपली चूक आपल्या लक्षात येते.मग तेव्हा स्वतःमध्ये बदल घडू लागतात.इतर कुणी सांगितले तर आपण त्यांचे ऐकत नाही.पण स्वतःचे आत्मपरीक्षण केले की सर्व गोष्ट स्पष्ट होतात.

चला तर मग थोडे ‘रुटीन बदलू आणि स्वतःला नव्याने भेटू’.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!